लाभपंचमी : 18 नोव्हेंबर 2023
- कार्तिक शुक्ल पंचमीला ‘लाभपंचमी’ म्हणतात . हिला ‘ सौभाग्य पंचमी ‘ सुद्धा म्हणतात. जैन लोक हिला ‘ ज्ञान पंचमी ‘ म्हणतात . व्यापारी लोक आपल्या धंद्याचा मुहूर्त वगैरे लाभपंचमीलाच करतात . लाभपंचमीच्या दिवशी धर्मसंमत जो काही उद्योग-धंदा सुरू केला जातो त्यात खूप- खूप समृद्धी मिळते . हे सर्व तर ठीक आहे पण संत- महापुरुषांच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा निश्चय करून भगवद्भक्तीच्या प्रभावाने काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या पाच विकारांचा प्रभाव नष्ट करण्याचा दिवस आहे लाभपंचमी . महापुरुष म्हणतात :
दुनिया से ऐ मानव !
रिश्त-ए-उल्फत (प्रीति) को तोड़ दे।
जिसका है तू सनातन सपूत,
उसीसे नाता जोड़ दे ॥
- ‘मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत ‘- अशा प्रकारे थोडे भगवदचिंतन, भगवद्प्रार्थना, भगवद्स्तुती करून सांसारिक आकर्षणांपासून, विकारांपासून स्वतःला वाचविण्याचा संकल्प करा .
(1) लाभपंचमीच्या दिवशी ही पाच अमृतमय वचने ठेवा :
- पहिली गोष्ट : ‘ भगवंत माझे आहेत, मी भगवंताचा आहे ‘- असे मानल्याने भगवंताप्रती प्रेम जडेल . ‘ शरीर, घर, कुटुंबीय वगैरे जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतरही राहणार नाहीत, परंतु परमात्मा सदैव माझ्या सोबत आहे ‘- असा विचार केल्याने तुम्हाला लाभपंचमीच्या पहिल्या आचमनाद्वारे अमृतपानाचा लाभ मिळेल.
- दुसरी गोष्ट : आपण भगवंताच्या सृष्टीत राहतो, भगवंताने बनविलेल्या जगात राहतो . तीर्थभूमीत राहिल्याने आपण पुण्य मानतो, मग जेथे आम्ही- तुम्ही राहतो ती भूमी तर भगवंताची आहे ; सूर्य, चंद्र, हवा, श्वास, हृदयाचे ठोके वगैरे सर्वच्या सर्व भगवंताचे आहेत. …तर आपण भगवंताच्या जगात, भगवंताच्या घरात राहतो. मगन निवास, अमथा निवास, गोकुळ निवास हे सर्व निवास वरवरचे आहेत परंतु सर्वच्या सर्व भगवंताच्या निवासातच राहतात . हे सर्वांनी पक्के लक्षात ठेवले पाहिजे . असे केल्याने तुमच्या अंतःकरणात भगवद्धामी राहण्याचा पुण्यभाव जागृत होईल.
- तिसरी गोष्ट : तुम्ही जे काही खाता ते भगवंताचे स्मरण करून, भगवंताला मानसिक रूपाने नैवेद्य दाखवून खा . यामुळे तुमचे तर पोट भरेल, हृदयही भगवद्भावाने परितृप्त होईल.
- चौथी गोष्ट : आई-वडिलांची, गरिबाची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, कोणाचीही सेवा कराल तर ‘ हा बिचार आहे… मी याची सेवा करतो… मी नसतो तर याचे काय झाले असते…’ – असा विचार करू नका. भगवंताच्या नात्याने सेवाकार्य करा आणि स्वतःला कर्ता मानू नका.
- पाचवी गोष्ट : आपल्या तन-मनाला, बुद्धीला विशाल बनवित जा . घर, परिसर, गाव, राज्य, राष्ट्राहूनही पुढे विश्वात आपल्या मतीचा व्याप वाढवित जा (मतीला विश्वव्यापी बनवा) आणि ‘ सर्वांचे मंगल, सर्वांचे हित होवो, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना सुख शांती मिळो, ‘सर्वे भवन्तु सुखिन: …’ अशा प्रकारची भावना करून आपले हृदय विशाल बनवित जा . कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या कल्याणाचा आग्रह सोडून द्या. गावासाठी परिसराचा, राज्यासाठी गावाचा, राष्ट्रासाठी राज्याचा, विश्वासाठी राष्ट्राचा मोह सोडून द्या आणि विश्वेश्वराशी एकाकार होऊन बदलत जाणाऱ्या विश्वात सत्यबुद्धी तसेच त्याचे आकर्षण व मोह सोडून द्या. तेव्हा अशी विशाल मती जगजीत प्रज्ञेची धनी बनेल.
- मनाच्या सांगण्यानुसार चालण्याने लाभ तर सोडा, हानी अवश्य होईल कारण मन इंद्रिय अनुगामी (इंद्रियांच्या मतानुसार चालणारे) आहे, ते मतीला विषय- सुखाकडे घेऊन जाते . परंतु मतीला मतिश्वराच्या ध्यानाने, स्मरणाने पुष्ट बनवाल तर ती परिणामाचा विचार करेल, मनाच्या वाईट आकर्षणाशी सहमत होणार नाही. यामुळे मनाला विश्रांती मिळेल, मनसुद्धा शुद्ध सात्त्विक होईल आणि मतीला परमात्म्यात प्रतिष्ठित होण्याची संधी मिळेल, परम कल्याण होईल . लाभपंचमीच्या दिवशी हे पाच लाभ आपल्या जीवनात आणा.
(2) लाभपंचमीच्या दुसऱ्या पाच गोष्टी
- 1. आपल्या जीवनात सत्कर्म करा.
- 2. आहार शुद्ध ठेवा.
- 3. मनाला थोडे नियंत्रित करा की इतका वेळ जप करण्यासाठी, ध्यानासाठी बसायचे आहे तर बसायचे आहे, इतकी मिनिटे मौन रहायचे आहे तर रहायचे आहे.
- 4. शत्रू व मित्राच्या भितीचा प्रसंग आला तर सतत जागृत रहा . मित्र नाराज होऊ नये, शत्रू तर असे करणार नाही ना या भितीला लगेच दूर करा.
- 5. सत्य आणि असत्यामधील भेद दृढ करा . शरीर मिथ्या आहे . शरीर सत् देखील नाही, असत् देखील नाही . असत् कधीही राहत नाही आणि सत् कधीही मिटत नाही, मिथ्या होऊन- होऊन मिटून जाते . शरीर मिथ्या आहे, मी आत्मा सत्य आहे . सुख- दुःख, मान- अपमान, रोग- आरोग्य सर्व मिथ्या आहे परंतु आत्मा-परमात्मा सत्य आहे . लाभपंचमीच्या दिवशी हे समजून सावध झाले पाहिजे .
(3) पाच कामे करण्यात कधीही उशीर करू नये :
- 1. धर्माचे कार्य करण्यात कधीही उशीर करू नका.
- 2. सत्पात्र मिळाला तर दान- पुण्य करण्यात उशीर करू नका.
- 3. ब्रह्मनिष्ठ संतांचा सत्संग, सेवा इत्यादींमध्ये उशीर करू नका.
- 4. सत्शास्त्रांचे वाचन, मनन, चिंतन तसेच त्यानुरूप आचरण करण्यात उशीर करू नका.
- 5. भीती वाटत असेल तर भितीला मिटविण्यात उशीर करू नका . निर्भय नारायणाचे चिंतन करा आणि भीती ज्या कारणाने होते ते कारण दूर करा . जर शत्रू समोर आला असेल, मृत्यूचे भय असेल अथवा शत्रू जीवघेणा हल्ला वगैरे करीत असेल तर त्यापासून वाचण्यात अथवा त्याच्यावर वार करायला घाबरू नका . हे स्कंद पुराणात लिहिलेले आहे….तर विकार, चिंता, पापाचे विचार हे सर्वच शत्रू आहेत, यांना दूर करण्यात उशीर करता कामा नये.
(4) पाच कर्मदोषांपासून वाचले पाहिजे :
- 1. अविवेकी कर्म करण्यापासून वाचा, यथा- योग्यरित्या समजून मग कार्य करा.
- 2. अभिमानपूर्वक कर्म करण्यापासून वाचा.
- 3. आसक्तीने स्वतःला कोठे फसवू नका, कोणाशी संबंध जोडू नका.
- 4. द्वेषमय व्यवहारापासून वाचा.
- 5. भयभीत होऊन कार्य करण्याचे टाळा.
- या पाच दोषांपासून रहित तुमचे कर्मसुद्धा लाभपंचमीच्या दिवशी ‘ पंचामृत ‘ बनतील.
(5) बुद्धीत पाच खूप मोठे सद्गुण आहेत, ते समजून त्यांचा लाभ घेतला पाहिजे.
- 1. अशुभ वृत्तींचा नाश करण्याची, शुभ वृत्तींचे रक्षण करण्याची ताकद बुद्धीत आहे.
- 2. चित्ताला एकाग्र करण्याची शक्ती बुद्धीत आहे. श्वासोच्छ्वासाच्या गणतीने, गुरुमूर्ती, ॐ कार अथवा स्वस्तिकच्या चित्रावर त्राटक केल्याने चित्त एकाग्र होते आणि भगवंताचा रसही येतो.
- 3. कोणतेही कार्य उत्साहाने केले तर त्यात सफलता अवश्य मिळते.
- 4. अमुक कार्य करायचे आहे की नाही, सत्य- असत्य, चांगले- वाईट, हितकर- अहितकर यांचा निर्णय बुद्धीच करेल, म्हणून बुद्धी स्वच्छ ठेवा.
- 5. निश्चय करण्याची शक्तीसुद्धा बुद्धीत आहे . म्हणून बुद्धी जितकी पुष्ट बनवाल, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तितकेच उन्नत व्हाल.
- …तर बुद्धिप्रदाता भगवान सूर्यनारायणांना दररोज अर्घ्य द्या आणि त्यांना प्रार्थना करा की ‘ माझ्या बुद्धीत तुमचा निवास होवो, तुमचा प्रकाश होवो.’ अशा प्रकारे केल्याने तुमच्या बुद्धीत भगवद्सत्तेचा, भगवद्ज्ञानाचा प्रवेश होईल.
(6) लाभपंचमीला भगवद्प्राप्तीचे पाच उपायही समजून घ्या :
- 1. ‘मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत . मला याच जन्मात भगवद्प्राप्ती करायची आहे.’ हा भगवद्प्राप्तीचा भाव जितकी मदत करतो, तितका तीव्र लाभ उपवास, व्रत, तीर्थ, यज्ञ इत्यादींनीही होत नाही….आणि मग भगवंताच्या नात्याने सर्वांची सेवा करा.
- 2. भगवंताच्या श्रीविग्रहाला पाहून प्रार्थना करीत- करीत सद्गदीत झाल्याने हृदयात भगवदाकार वृत्ती बनते.
- 3. सकाळी झोपेतून उठाल तर एक हात तुमचा आणि एक भगवंताचा मानून बोला : ‘ माझ्या भगवंता ! मी तुझा आहे आणि तू माझा आहेस ना… माझा आहेस ना…. आहेस ना… ?’ असे करीत जरा एकमेकांचा हात दाबा आणि भगवंताशी वार्तालाप करा . पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या, पंधराव्या दिवशी अंतर्यामी परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आवाज येईल की ‘ हो भाऊ ! तू माझा आहेस. ‘ बस, तुमचे काम फत्ते !
- 4. गोपिकांप्रमाणे भगवंताचे हृदयात आवाहन, चिंतन करा आणि शबरीप्रमाणे ‘ भगवंत मला मिळतील ‘ अशी दृढ निष्ठा ठेवा.
- 5. कोणाप्रती आपल्या हृदयात द्वेषाची गाठ बांधू नका : बांधली असेल तर लाभपंचमीचे पाच- पाच अमृतमय उपदेश ऐकून ती गाठ सोडून द्या.
- ज्याच्याप्रती द्वेष आहे तो तर मिठाई खात असेल, आपण द्वेषबुद्धीने त्याला आठवून आपले हृदय का जाळावे ! विष ज्या बाटलीत असते तिचे तर काही बिघडत नाही पण द्वेष ज्या हृदयात असतो त्या हृदयाचाच सत्यानाश करतो . निःस्वार्थपणे सर्वांच्या कल्याणाची कामना करा आणि सर्वांप्रती भगवंताच्या नात्याने प्रेमभाव ठेवा . जसे आई मुलाला प्रेम करते तर त्याच्या कल्याणाची इच्छा असते, हिताची भावना असते आणि कल्याण करण्याचा अभिमान मनात आणत नाही, असेच आपले हृदय बनवाल तर तुमचे हृदय भगवंताचे प्रेमपात्र बनेल.
- हृदयात दया ठेवली पाहिजे . आपल्याहून लहान वयाच्या लोकांनी चूक केली तर दयाळू बनून त्यांना समजवा, ज्यामुळे त्यांचे पुण्य वाढेल, त्यांचे ज्ञान वाढेल. जो दुसऱ्यांचे पुण्य, ज्ञान वाढवित हित करतो तो यशस्वी होतो आणि त्याचेही आपोआपच हित होते.
- लाभपंचमीच्या दिवशी या गोष्टी मनात पक्क्या ठसविल्या पाहिजेत.
- धन, सत्ता, पद- प्रतिष्ठा मिळणे वास्तविक लाभ नाही . वास्तविक लाभ तर जीवनदात्याची भेट घालून देणाऱ्या सद्गुरूंच्या सत्संगाने जीवन जगण्याची युक्ती मिळवून, त्यानुसार चालून लाभ- हानी, यश- अपयश, विजय- पराजय या सर्वांमध्ये सम राहत आत्मस्वरूपात विश्रांती मिळविण्यात आहे.
-
– ऋषी प्रसाद, ऑक्टोबर 2009