Play Audio Mp3
Indira Ekadashi 2023 Date
- मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023
Indira Ekadashi Vrat Katha in Marathi
- धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : हे मधुसूदन ! भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
- भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘इंदिरा’ एकादशी येते. तिच्या व्रताच्या प्रभावाने महापातकांचा नाश होतो. ही एकादशी अधम योनीत पडलेल्या पितरांनाही सद्गती देणारी आहे.
- राजन् ! प्राचीन काळातील गोष्ट आहे. सत्ययुगात इंद्रसेन नामक एक प्रसिद्ध राजकुमार होऊन गेला. माहिष्मतीपुरीचा राजा बनल्यावर त्याने धर्मानुकूल आचरणाने प्रजेचे पालन केले, त्यामुळे त्याची सत्कीर्ती चोहीकडे पसरली होती. इंद्रसेन राजा वैकुंठपती श्रीहरींच्या भक्तीत तल्लीन राहून त्यांच्या मोक्षदायक नामांचा जप करीत विधिवत् अध्यात्म-तत्त्वाच्या चिंतनात संलग्न राहत असे. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले व यथासांग पूजा केली. मग त्यांना उच्चासनावर बसवून राजा म्हणाला :
- “मुनिश्रेष्ठ ! आपल्या कृपेने माझे सर्व कुशलमंगल आहे. आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञकर्म सार्थक झाले. देवर्षी ! आपल्या आगमनाचे कारण सांगून माझ्यावर कृपा करावी.”
- देवर्षी नारद म्हणाले : नृपश्रेष्ठ ! ऐका. माझे बोलणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. मी ब्रह्मलोकातून यमलोकी गेलो होतो. तेथे मला यमराजाने एका उच्चासनावर बसवून माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांनाही पाहिले. ते व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन् ! त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप पाठविला आहे, तो ऐका. त्यांनी सांगितले आहे .
- ‘पुत्र ! इंदिरा एकादशीच्या व्रताचे पुण्य प्रदान करून मला स्वर्गात पाठव.’ त्यांचा हा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. राजन् ! तुमच्या वडिलांना स्वर्गात पाठविण्यासाठी इंदिरा एकादशीचे विधिवत् व्रत करा.
- राजाने विचारले : देवर्षी ! इंदिरा एकादशीचा विधी सांगण्याची कृपा करावी. कोणत्या पक्षात, कोणत्या तिथीला आणि कशा प्रकारे हे व्रत केले पाहिजे ? देवर्षी नारद म्हणाले : राजन् ! ऐका. मी तुम्हाला या व्रताचा शुभकारक विधी सांगतो. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीला पहाटे उठून अगदी श्रद्धेने स्नान करावे. पुन्हा मध्यान्ही स्नान करून एकाग्रचित्ताने एक वेळ भोजन करावे आणि रात्री भूमिशयन करावे. एकादशीला सुप्रभात होताच स्नानादीनंतर भक्तिभावाने या मंत्राचे उच्चारण करून उपवासाचा संकल्प करावा :
अद्य स्थित्वा निराहार: सर्वभोगविवर्जित: ।
श्वो भोक्ष्ये पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्युत ॥
- ‘हे कमलनयन भगवान नारायण ! आज मी सर्व भोगांपासून अलिप्त व निराहार राहून द्वादशीला भोजन करेन. हे अच्युत ! मी आपणास शरण आलो आहे.’ (पद्म पुराण, उत्तर खंड : 60.23)
- दुपारी पितरांच्या प्रसन्नतेसाठी शाळिग्रामसमोर विधिवत् श्राद्ध करावे. दक्षिणा देऊन ब्राह्मणांचा आदर-सत्कार करावा आणि त्यांना भोजन करवून संतुष्ट करावे. पितरांना दिलेल्या अन्नमय पिंडाला हुंगून ते गाईला खाऊ घालावे. मग धूप-दीप व गंधादीने श्रीहरींची पूजा करून रात्री जागरण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने त्यांची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे, मग आपल्या कुटुंबीयांसह मौनपूर्वक भोजन करावे. राजन् ! अशा प्रकारे प्रसन्नचित्ताने विधिवत् हे व्रत करावे. यामुळे तुमची पितरे वैकुंठात जातील.
- भगवान श्रीकृष्ण म्हणतात : राजन् ! इंद्रसेन राजाला असे सांगून देवर्षी नारद अंतर्धान पावले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजाने अंतःपुरातील राण्या, पुत्र आणि सुनांसह एकादशीचे विधिवत् व्रत केले.
- कुंतिनंदन ! व्रताची पूर्णाहुती झाल्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. इंद्रसेनचे पिता गरुडावर आरूढ होऊन वैकुंठात गेले आणि इंद्रसेन राजासुद्धा निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन नंतर राजकुमाराचा राज्याभिषेक करून स्वर्गात गेला. अशा प्रकारे मी ‘इंदिरा’ एकादशीचे हे माहात्म्य सांगितले. याचे पठण व श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.