Nag Panchami Katha
- सिंधी लोकांमध्ये एक कथा प्रचलित आहे : एका गरीब मुलीला धनलाभाची खूप लालसा होती. एके दिवशी तिला स्वप्नात सर्पदेवतेचे दर्शन झाले आणि ते म्हणाले : “अमुक ठिकाणी धन गाडलेले आहे, तू तेथून घेऊन जा. मला कोणी बहीण नाही आणि तुला कोणी भाऊ नाही, तेव्हा आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ.’ सर्पदेवतेने सांगितलेल्या जागी तिला खूप धन मिळाले आणि ती श्रीमंत बनली. मग तर ती दररोज आपल्या भावासाठी तेथे दूध ठेवत असे. सर्पदेवता येऊन दुधात अगोदर आपली शेपूट बुडवायचे आणि मगच दूध प्यायचे. एकदा घाईघाईत बहिणीने दूध थंड न करताच ठेवले. सापाने येऊन त्यात आपली शेपूट बुडवताच गरम दुधामुळे त्याला चटका बसला. सापाला वाटले की ‘मी बहिणीला एवढे धन दिले, पण ही दुधाची वाटीसुद्धा व्यवस्थित ठेवत नाही. आता हिला धडा शिकवावाच लागेल.’
- ती बहीण श्रावण महिन्यात आपल्या कुटुंबियांसोबत काहीतरी खेळत होती. सापाला वाटले की ‘हिच्या नवऱ्याला यमसदनी पोहोचवितो, मग हिला समजेल की निष्काळजीपणाचा सूड कसा असतो !’ सर्पदेवता तिच्या पतीच्या जोड्यांजवळ दडून बसले. एवढ्यात खेळता-खेळता काहीतरी चूक झाली. एक मुलगी म्हणाली : “येथे चार आणे ठेवले नव्हते.”
- सापाची बहीण म्हणाली : “अगदी खरं सांगते की येथेच ठेवले होते. मी माझ्या लाडक्या भावाची… सर्पदेवतेची शपथ घेऊन सांगते.”
- हे ऐकून सापाला वाटले की हिला माझ्याप्रती इतके प्रेम आहे ! ज्याप्रमाणे लोक भगवंताची किंवा देवाची शपथ घेतात, अगदी त्याचप्रमाणे ही माझी शपथ घेते ! म्हणून ते प्रगट होऊन म्हणाले : “तू चूक केली होती पण मी तर त्याहूनही मोठी चूक करायला जात होतो, परंतु माझ्याप्रती तुझे जे प्रेम आहे ते पाहून मी तुला असे वरदान देतो की आजच्या दिवशी जी स्त्री माझे स्मरण करेल तिचा पती अकाल मृत्यूला तसेच सर्पदंशाला बळी पडणार नाही.” तेव्हापासून स्त्रिया या दिवशी नागपंचमीचे व्रत आणि नागदेवतेची पूजा करतात.
- नागपंचमी साजरी करण्याचे कारण जरी काहीही असले तरी ही गोष्ट तर निश्चित आहे की आपली संस्कृती हिंसक जीवांप्रतीसुद्धा वैरभाव न ठेवण्याचा, त्यांच्याप्रती सदभाव जागृत करण्याचा आणि त्यांना अभयदान देण्याचा संकेत करते. नागांना दूध पाजण्याची व त्यांच्यातही आपल्या परमात्म्याला न्याहाळण्याची दृष्टी देणे, हे सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे. भगवान शंकराच्या गळ्यातील सर्प, गणपतीच्या कंबरेला गुंडाळलेले सर्प आणि श्रीविष्णूंची शय्या बनलेले शेषनाग याच गोष्टीचे प्रमाण देतात की कोणी नागदेवतेलाही आपल्याच आत्मदेवाच्या सत्तेने चालणारा मानून प्रेमाने न्याहाळत असेल तर कसाही भयंकर साप असो, त्या माणसासमोर तो आपला विषारी स्वभाव विसरून पाळीव प्राण्यासारखा बनतो. मनुष्याव्यतिरिक्त जेवढे काही जीव आहेत, मग जरी त्यांचे संस्कार आपापल्या स्वभावानुसार असले तरी त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. स्वभाव आणि संस्कारात तर बदल होतो, परंतु स्वभाव आणि संस्कारांचा जो साक्षी आहे, त्याला न्याहाळून जो आपल्या आत्मा-परमात्म्यात जागृत होतो तो शिवस्वरूप बनतो, निर्भय स्वरूपात प्रतिष्ठित होतो. जो आपल्याला दंश करून मारू शकतो, अशा सापातही भगवंताला पाहण्याची प्रेरणा या सणाद्वारे मिळते. किती सुंदर व्यवस्था आहे आपल्या सनातन धर्मात, ज्यायोगे मृत्यू जीवनात, द्वेष प्रेमात आणि मनमुखता मुक्तिदायी विचारांमध्ये बदलू शकते. ➢ ऋषी प्रसाद, ऑगस्ट 2009