Play Audio Mp3
Rama Ekadashi 2022 Date
- एकादशी व्रत : शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (उपवास)
- एकादशी तिथी आरंभ : गुरुवार, 20 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 04:05 वाजता पासून
- एकादशी तिथी समाप्त : शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 05:22 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी
Rama Ekadashi Vrat Katha in Marathi
- धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : जनार्दन ! आपला माझ्यावर स्नेह आहे, म्हणून आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
- भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘रमा’ नामक प्रसिद्ध व परम कल्याणकारक एकादशी येते. ही अति उत्तम एकादशी असून महापापांचा नाश करणारी आहे.
- प्राचीन काळी मुचुकुंद नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेले. ते श्रीविष्णूंचे परम भक्त आणि सत्यनिष्ठ होते. निष्कंटक राज्य करणाऱ्या त्या राजाकडे नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी ‘चंद्रभागा’ मुलीच्या रूपात जन्मली होती. राजाने चंद्रसेनकुमार शोभनशी तिचे लग्न लावून दिले. एकदा शोभन दशमीला सासरी आला आणि त्याच दिवशी संपूर्ण नगरात नेहमीप्रमाणेच दवंडी पिटविण्यात आली की ‘एकादशीला कोणीही भोजन करू नये.’
- हे ऐकून शोभन आपली प्रिय पत्नी चंद्रभागेस म्हणाला : “प्रिये ! आता मी यावेळी काय केले पाहिजे, ते मला सांग.”
- चंद्रभागा म्हणाली : पतिदेव ! माझ्या वडिलांकडे एकादशीला मनुष्य तर सोडाच, पाळीव प्राणीसुद्धा भोजन करीत नाहीत. प्राणनाथ ! जर तुम्ही भोजन केले तर तुमची खूप निंदा होईल. म्हणून विचारपूर्वक एकादशी करण्याचा दृढ निश्चय करा.
- शोभन म्हणाला : प्रिये ! तू म्हणतेस ते खरे आहे. मीसुद्धा उपवास करेन. दैवाचे जसे विधान असेल तसेच होईल.
- भगवान श्रीकृष्ण म्हणतात : अशा प्रकारे दृढ निश्चय करून शोभनने व्रताच्या नियमाचे पालन केले, परंतु सूर्योदय होताच त्याचा मृत्यू झाला. मुचुकुंद राजाने शोभनचा राजोचित अंत्यसंस्कार केला. पतीच्या अंत्यविधीनंतर चंद्रभागा माहेरीच राहू लागली.
- नृपश्रेष्ठ ! तिकडे शोभन या व्रताच्या प्रभावाने मंदराचल पर्वताच्या शिखरावर वसलेल्या परम रमणीय देवपुरीत पोहोचला आणि तेथे कुबेरांप्रमाणे शोभायमान होऊ लागला.
- एकदा मुचुकुंद राजाच्या नगरातील सोमशर्मा नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण तीर्थयात्रा करीत मंदराचल पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना शोभन दिसला. राजाच्या जावयाला ओळखून ते त्याच्या जवळ गेले. भूदेव सोमशर्माला आपल्याकडे आल्याचे पाहून शोभनने त्वरित आपल्या आसनावरून उठून त्यांना वंदन केले. मग आपले सासरे, प्रिय पत्नी आणि सर्व प्रजेचे क्षेमकुशल विचारले.
- सोमशर्मा म्हणाले : राजन् ! तिकडे सर्वजण आनंदात आहेत. परंतु आपण येथे कसे काय आलात ?… आश्चर्य आहे ! असे सुंदर आणि विचित्र नगर तर कोणीही कोठे पाहिले नसेल… !!
- शोभन म्हणाला : द्विजेंद्र ! आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘रमा’ नामक एकादशी येते. तिचे व्रत केल्याने मला हे नगर मिळाले आहे. भूदेव ! मी हे उत्तम व्रत अश्रद्धेने केले होते, म्हणून मी असे मानतो की हे नगर स्थायी नाही. तुम्ही चंद्रभागेला हा संपूर्ण वृत्तांत सांगावा.. यानंतर सोमशर्मा ब्राह्मण मुचुकुंदपूरला परतले आणि चंद्रभागेला संपूर्ण वृत्तांत सांगितला.
- सोमशर्मा म्हणाले : मुली ! मी तुझ्या पतीला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे इंद्रपुरीसारखे भव्य नगरही पाहिले, परंतु ते नगर अस्थिर आहे. तू आपल्या सामर्थ्याने ते स्थिर कर.
- चंद्रभागा म्हणाली : ब्रह्मर्षी ! मी पतिदर्शनासाठी आतुर झाले आहे. आपण मला तेथे घेऊन चलावे. मी माझ्या एकादशी व्रताच्या पुण्याईने त्या नगराला स्थिर करेन.
- भगवान श्रीकृष्ण म्हणतात : राजन् ! सोमशर्मा चंद्रभागेला सोबत घेऊन मंदराचल पर्वताजवळील वामदेव मुनींच्या आश्रमात गेले. तेथे ऋषींच्या मंत्राची शक्ती व एकादशी व्रताच्या प्रभावाने चंद्रभागेचे शरीर दिव्य बनले आणि तिने दिव्य गती प्राप्त केली. त्यानंतर ती पतीकडे गेली. प्रिय पत्नी आल्याचे पाहून शोभनला अत्यानंद झाला. त्याने तिला जवळ बोलावून आपल्या डाव्या बाजूला सिंहासनावर बसविले.
- त्यानंतर चंद्रभागा शोभनला म्हणाली : ‘नाथ ! मी आपल्या हिताचे बोलते.
- माझ्या वयाच्या आठव्या वर्षापासून आतापर्यंत एकादशीचे उपवास करून जो पुण्यसंचय झाला आहे, त्याच्या प्रभावाने हे नगर कल्पाच्या अखेरपर्यंत स्थिर व सर्व प्रकारच्या मनोवांछित वैभवाने समृद्धशाली राहील.’
- नृपश्रेष्ठ ! अशा प्रकारे ‘रमा’ एकादशीच्या प्रभावाने चंद्रभागा दिव्य भोग, दिव्य रूप व दिव्य आभूषणांनी विभूषित होऊन पतीसह मंदराचल पर्वताच्या शिखरावर विहार करू लागली. राजन् ! ही ‘रमा’ एकादशी चिंतामणी व कामधेनूसारखी सर्व मनोरथे पूर्ण करणारी आहे.
Rama Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022
द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here
एकादशी तिथी आरंभ : गुरुवार, 20 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 04:05 वाजता पासून शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 05:22 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी