Bhagavad Gita Chapter 10 in Marathi PDF Download

दहावा अध्याय : विभूतियोग [Chapter 10 With meaning in Marathi]

  • सातव्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत विज्ञानासह ज्ञानाचे जे वर्णन केले ते खूपच गूढ असल्याने पुन्हा तो विषय स्पष्टपणे समजाविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायाचा आरंभ केला. येथे पहिल्या श्लोकात ते पूर्वोक्त विषयाचे पुन्हा वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात.

।। अथ दशमोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच: ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे महाबाहू ! पूर्वी सांगितलेला परम रहस्यमय व प्रभावयुक्त अभिप्रायच मी तुला पुन्हा सांगतो, ऐक. तू मला अतिशय प्रिय असल्याने तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी तुला हे सांगत आहे.

न मे विदु: सुरगणा: प्रभवं न महर्षय: ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ।।2।।

  • माझ्या उत्पत्तीला अर्थात् विभूतीसह लीलेने प्रगट होण्याला देवगण जाणत नाहीत आणि महर्षीसुद्धा जाणत नाहीत. कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचेही आदिकारण (मूळ) आहे.

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढ: स मर्त्येषु सर्वपापै: प्रमुच्यते ।।3।।

  • जो मला अजन्मा अर्थात् वास्तविकपणे जन्मरहित, अनादी व सर्व लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वत: जाणतो, तो मनुष्यांमधील ज्ञानवान पुरुष सर्व पापांतून मुक्त होतो.

बुद्धिर्ज्ञानमसम्मोह: क्षमा सत्यं दम: शम: ।
सुखं दु:खं भवोऽभावो भयं चाभयमेव च ।।4।।
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयश: ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा: ।।5।।

  • हे अर्जुन ! बुद्धी (निश्चय करण्याची शक्ती), यथार्थ ज्ञान, संशय व मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रियसंयम, मनोनिग्रह तसेच सुख-दु:ख, जन्म-मृत्यू, भय व निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तपश्चर्या, दान, कीर्ती आणि अपकीर्ती – असे हे जीवांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात.

महर्षय: सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा: प्रजा: ।।6।।

  • सप्तर्षी व त्यांच्याही पूर्वी झालेले सनकादिक चार महर्षी तसेच स्वायंभुवादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच्या सर्व माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत आणि हे सर्व जग त्यांचीच प्रजा आहे.

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वत: ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय: ।।7।।

  • जो पुरुष माझ्या या परम ऐश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वत: जाणतो, तो निश्चल भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच संशय नाही.

अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता: ।।8।।

  • मी वासुदेवच या सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग कर्म करीत आहे, असे तत्त्वत: जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मज परमेश्वरालाच निरंतर भजतात.

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ।।9।।

  • निरंतर माझ्याच ठायी मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे (अर्थात आपले जीवन मज वासुदेवासाठीच अर्पण करणारे) भक्तजन सदासर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करवीत तसेच गुण व प्रभाव यांच्यासह माझेच कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवाच्या ठायीच निरंतर रममाण होतात.

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ।।10।।

  • त्या निरंतर माझ्या ध्यानादीत मग्न झालेल्या आणि प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो की ज्यायोगे ते मलाच प्राप्त होतात.

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तम: ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ।।11।।

  • हे अर्जुन ! त्यांच्यावर अनुग्रह (कृपा) करण्यासाठीच त्यांच्या अंत:करणात वास करणारा मी त्यांच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा तत्त्वज्ञानरूपी तेजस्वी दीपाने नाश करतो.
  • अर्जुन उवाच :

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ।।12।।
आहुस्त्वामृषय: सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे ।।13।।

  • अर्जुन म्हणाला : हे भगवन् ! तुम्हीच परम ब्रह्म, परम धाम आणि परम पवित्र आहात. कारण तुम्हाला सर्व ॠषिगण सनातन, दिव्य पुरुष व देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. त्याचप्रमाणे देवर्षी नारद, असित व देवल ॠषी आणि व्यास महर्षींनी तुमच्याविषयी पूर्वी असेच सांगितले होते आणि तेच आता तुम्ही स्वत:ही सांगत आहात.

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: ।।14।।

  • हे केशव ! तुम्ही मला जे काही सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन् ! तुमच्या लीलामय स्वरूपाला तर देवतागणही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत.

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।।15।।

  • हे भूतभावन (भूतांना उत्पन्न करणारे) ! भूतेश (भूतांचे ईश्वर)! देवाधिदेव ! हे जगत्पते ! हे पुरुषोत्तम ! खरोखर, तुम्ही स्वत:च स्वत:ला जाणू शकता.

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतय: ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ।।16।।

  • म्हणून ज्या विभूतींनी तुम्ही या सर्व लोकींना व्यापून स्थित आहात, त्या आपल्या दिव्य विभूती संपूर्णपणे सांगण्यास तुम्हीच योग्य आहात.

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ।।17।।

  • हे योगेश्वर ! मी तुमचे निरंतर चिंतन कसे करावे आणि तुम्हाला कसे जाणावे ? आणि हे भगवन् ! कोणकोणत्या भावांनी अर्थात् कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचे चिंतन करावे ?

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूय: कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ।।18।।

  • हे जनार्दन ! कृपया आपल्या योगशक्तीचे आणि परम ऐश्वर्यरूप विभूतीचे पुन्हा सविस्तर वर्णन करून सांगावे. कारण तुमच्या अमृतमय वचनांना ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही अर्थात् ऐकण्याची उत्कंठा तशीच कायम राहते.
  • श्रीभगवानुवाच :

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय: ।
प्राधान्यत: कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ।।19।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे कुरुश्रेष्ठ ! तू माझ्या ज्या विभूतींविषयी विचारले आहेस, त्यांतील मुख्य-मुख्य दिव्य विभूती मी तुला सांगतो, कारण माझ्या विस्ताराचा अंतच नाही.

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित: ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ।।20।।

  • हे अर्जुन ! मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतसुद्धा मीच आहे.

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ।।21।।

  • बारा आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. एकोणपन्नास मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये त्यांचा अधिपती चंद्र मी आहे.

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासव: ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ।।22।।

  • वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये अकरावे मन आणि प्राणिमात्रांमधील चेतना अर्थात् जीवनशक्ती मी आहे.

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरु: शिखरिणामहम् ।।23।।

  • अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये धनपती कुबेर मी आहे, आठ वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे.

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्द: सरसामस्मि सागर: ।।24।।

  • हे पार्थ ! पुरोहितांमध्ये मुख्य अर्थात् देवांचा पुरोहित बृहस्पती मलाच जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये समुद्र मी आहे.

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय: ।।25।।

  • महर्षींमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात् ओमकार मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे.

अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद: ।
गन्धर्वाणां चित्ररथ: सिद्धानां कपिलो मुनि: ।।26।।

  • सर्व वृक्षांमध्ये पिंपळवृक्ष आणि देवर्षींमध्ये नारदमुनी मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सर्व सिद्धांमध्ये कपिलमुनी मी आहे.

उच्चै:श्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ।।27।।

  • घोड्यांमध्ये अमृतप्राप्तीकरिता केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नामक घोडा आणि हत्तींमध्ये ऐरावत नामक हत्ती मी आहे तसेच मनुष्यांमध्ये राजा मलाच जाण.

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्प: सर्पाणामस्मि वासुकि: ।।28।।

  • सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गाईंमध्ये कामधेनू मी आहे. शास्त्रोक्तरितीने प्रजोत्पादनास कारण असलेला कामदेव (मदन) मी आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे.

अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यम: संयमतामहम् ।।29।।

  • मी नागांमध्ये शेषनाग (अनंत) आणि जलचरांचा अधिपती वरुण देव आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे.

प्रह्लादश्चास्मि दैत्यानां काल: कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ।।30।।

  • दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांचा काळ (वेळ) तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह व पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे.

पवन: पवतामस्मि राम: शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ।।31।।

  • पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आणि शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे. सर्व जलचरांमध्ये मगर आणि सर्व नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा मी आहे.

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वाद: प्रवदतामहम् ।।32।।

  • हे अर्जुन ! संपूर्ण सृष्टीचा आदी, अंत व मध्यदेखील मीच आहे. मी सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या अर्थात् ब्रह्मविद्या व परस्परांत विवाद करणाऱ्यांचा तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे.

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्व: सामासिकस्य च ।
अहमेवाक्षय: कालो धाताहं विश्वतोमुख: ।।33।।

  • अक्षरांमध्ये ‘अ’कार आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षय काळ अर्थात् काळाचाही महाकाळ आणि चारी दिशांना मुखे असणारा, विराटस्वरूप, सर्वांचे धारण-पोषण करणाराही मीच आहे.

मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा ।।34।।

  • सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मीच आहे.

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: ।।35।।

  • गायन करण्यायोग्य श्रुतींमध्ये बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे तसेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ॠतूंमध्ये वसंत ॠतू मी आहे.

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ।।36।।

  • फसविणाऱ्यांमध्ये द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव मी आहे. मी विजेत्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आणि सात्त्विक पुरुषांचा सात्त्विक भाव आहे.

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजय: ।
मुनीनामप्यहं व्यास: कवीनामुशना कवि: ।।37।।

  • वृष्णीवंशियांमध्ये वासुदेव अर्थात् मी स्वत: तुझा सखा, पांडवांमध्ये धनंजय अर्थात् तू, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीसुद्धा मीच आहे.

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ।।38।।

  • दमन करणाऱ्यांचा दंड अर्थात् दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे, गुप्त ठेवण्यायोग्य भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवंतांचे तत्त्वज्ञानही मीच आहे.

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ।।39।।

  • तसेच हे अर्जुन ! सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण अर्थात् संपूर्ण सृष्टीचे बीजसुद्धा मीच आहे, कारण असे चर किंवा अचर कोणतेही भूत नाही जे माझ्याखेरीज असू शकेल.

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशत: प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ।।40।।

  • हे परंतप ! माझ्या दिव्य विभूतींचा अंतच नाही, मी आपल्या विभूतींचा हा विस्तार तर तुझ्यासाठी संक्षेपाने सांगितला आहे.

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ।।41।।

  • जी काही विभूतियुक्त अर्थात ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तिसंपन्न वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशानेच उत्पन्न झालेली जाण.

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवोर्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।।42।।

  • परंतु हे अर्जुन ! या सविस्तर ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे ? मी हे संपूर्ण जग आपल्या योगशक्तीच्या केवळ एकाच अंशाने धारण करून स्थित आहे.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्याय: ।।10।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘विभूतियोग’ नामक दहावा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 10 मराठी