Bhagavad Gita Chapter 4 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 4 in Marathi PDF Download

चौथा अध्याय : ज्ञानकर्मसंन्यासयोग [Chapter 4 With meaning in Marathi]

  • तिसऱ्या अध्यायाच्या 4 ते 29व्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारच्या नियोजित कर्मांच्या आचरणाची आवश्यकता सांगितली. त्यानंतर 30व्या श्लोकात भक्तिप्रधान कर्मयोगाद्वारे ममता, आसक्ती व कामनांचा पूर्णत: त्याग करून भगवद्प्रीत्यर्थ कर्म करण्याची आज्ञा दिली. 31 ते 35व्या श्लोकांत त्या सिद्धांतानुसार कर्म करणाऱ्यांची प्रशंसा आणि न करणाऱ्यांची निंदा केली. आसक्ती-द्वेषाच्या अधीन न होता स्वधर्मपालनाविषयी 36व्या श्लोकात अर्जुनाने विचारल्यावर 37व्या श्लोकापासून अध्याय समाप्तीपर्यंत काम हाच सर्व अनर्थांचे मूळ कारण असल्याचे सांगण्यात आले आणि बुद्धीद्वारे मन-इंद्रिये वश करून त्याचा नाश करण्याची आज्ञा दिली. परंतु कर्मयोगाचा महिमा अगाध आहे, म्हणून भगवंत पुन्हा त्याबाबत अनेक दृष्टान्त देतात. प्रथम 3 श्लोकांमध्ये कर्मयोगाची परंपरा सांगून त्याची अनादिता सिद्ध करून त्याची प्रशंसा करतात.

।। अथ चतुर्थोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : मी हा अविनाशी योग कल्पाच्या आरंभी सूर्याला सांगितला होता. पुढे सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकू राजाला सांगितला.

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदु: ।
स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ।।2।।

  • अशा रितीने परंपरेने प्राप्त झालेला हा योग पुष्कळ राजर्षींनी जाणून घेतला, परंतु हे परंतप ! काळाच्या ओघात परंपरा खंडित झाली आणि या जगात हा योग लोप पावला.

स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन: ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ।।3।।

  • तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून हा प्राचीन योग आज मी तुला सांगितला. कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात् मार्मिक विषय आहे.
  • अर्जुन उवाच :

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वत: ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ।।4।।

  • अर्जुनाने विचारले : तुमचा जन्म तर हल्लीच झाला आहे आणि सूर्याचा जन्म अतिशय प्राचीन आहे. मग तुम्ही कल्पारंभी सूर्याला या योगाचा उपदेश केला होता, हे मी कसे समजावे ?
  • श्रीभगवानुवाच :

बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ।।5।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप ! त्या सर्वांना तू जाणत नाहीस, पण मी जाणतो.

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ।।6।।

  • मी अजन्मा, अविनाशी आणि सर्व भूतप्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन स्वतःच्या योगमायेने साकार रूपात प्रगट होत असतो.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।7।।

  • जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा हे भारत ! मी स्वत:ला सगुण-साकार रूपात लोकांसमोर प्रगट करतो.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।8।।

  • साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी, दुष्ट कर्मे करणाऱ्यांच्या नाशासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी स्वत: युगोयुगी (प्रत्येक युगात) प्रगट होतो.

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत: ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।।9।।

  • हे अर्जुन ! माझा तो जन्म आणि कर्म दिव्य अर्थात् निर्मळ व अलौकिक आहेत, असे जो मनुष्य तत्त्वत: जाणतो, तो देहत्यागानंतर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच प्राप्त होतो.

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता: ।।10।।

  • आसक्ती, भय आणि क्रोध यातून सर्वथा मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले, माझा आश्रय ग्रहण करणारे, आत्मज्ञानरूप तपश्चर्येने पवित्र झालेले – असे बरेचसे पुरुष यापूर्वी सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत अर्थात् मला प्राप्त झाले आहेत.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।11।।

  • जे मला जसे भजतात, मीसुद्धा त्यांना तसाच भजतो अर्थात् त्यांच्या भावनेनुरूप त्यांना फळ देतो. कारण हे अर्जुन ! सर्वजण सर्वप्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

कांक्षन्त: कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता: ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ।।12।।

  • या मनुष्यलोकी कर्मांचे फळ इच्छिणारे लोक देवतांची उपासना करतात, कारण त्यांना त्यांच्या त्या कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ।।13।।

  • गुण व कर्म यांच्या भेदानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण माझ्याद्वारे उत्पन्न करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जरी मी त्या सृष्टिरचनादी कर्मांचा कर्ता असलो तरी मज अविनाशी परमेश्वराला तू वास्तविक अकर्ताच जाण.

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ।।14।।

  • मला कर्मफळाची आकांक्षा नसते, म्हणूनच कर्मे मला लिप्त करीत नाहीत – अशाप्रकारे जो मला तत्त्वत: जाणतो, तोसुद्धा कर्मांनी बद्ध (लेपायमान) होत नाही.

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभि: ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै: पूर्वतरं कृतम् ।।15।।

  • पूर्वीच्या मुमुक्षूंनीही याप्रमाणे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून पूर्वजांनी पूर्वापार जसे कर्म केले, तसेच कर्म तू कर.

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता: ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।16।।

  • कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ? याबाबत निर्णय घेताना बुद्धिमान पुरुषही गोंधळून जातात. म्हणून ते कर्मांचे तत्त्व मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो. ते जाणल्यावर तू अशुभातून अर्थात् कर्मबंधनातून मुक्त होशील.

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण: ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ।।17।।

  • कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे (निषिद्ध कर्माचे) स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माची गती गहन (गूढ) आहे.

कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य: ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ।।18।।

  • जो सर्व कर्मे करीत असूनही वास्तविक आपण काही करीत नाही, हे जाणतो तसेच नैष्कर्म्य अंगी बाणूनही सर्व कर्मे उत्तम प्रकारे करतो, तोच मनुष्यांमध्ये बुद्धिमान आणि तोच योगी समजावा तसेच त्याने काही न करताही सर्वकाही केल्याप्रमाणेच आहे.

यस्य सर्वे समारम्भा: कामसंकल्पवर्जिता: ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु: पण्डितं बुधा: ।।19।।

  • ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात आणि ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीद्वारे भस्म झाली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानीजनही ‘पंडित’ म्हणतात.

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रय: ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति स: ।।20।।

  • जो पुरुष सर्व कर्मे व त्यांच्या फळाच्या आसक्तीचा सर्वथा त्याग करून सांसारिक आश्रयापासून रहित झालेला आहे आणि परमात्म्यातच सदैव तृप्त आहे, तो उत्तम प्रकारे कर्म करीत असूनही वास्तविक काहीच करीत नाही.

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह: ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ।।21।।

  • ज्याने आपले शरीर व अंत:करण वश केले आहे आणि सर्व भोगसाधनांचा त्याग केलेला आहे, असा आशारहित पुरुष केवळ शरीराने होणारी कर्मे (पाहणे, ऐकणे इ.) करीत असला तरी त्यांचा दोष त्याला लागत नाही.

यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सर: ।
सम: सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ।।22।।

  • कोणत्याही इच्छेविना आपोआप जे काही प्राप्त होईल त्यातच सदैव संतुष्ट असणारा, हर्ष-शोकादी द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला, निर्मत्सर अर्थात् ईर्ष्यारहित आणि कार्याच्या सिद्धी-असिद्धीत सम राहणारा कर्मयोगी कर्मे करूनही कर्मबंधनात पडत नाही.

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस: ।
यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ।।23।।

  • ज्याची आसक्ती सर्वथा नष्ट झाली आहे, जो देहाभिमान व ममतारहित झाला आहे, ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थित आहे, असा मुक्त पुरुष यथासांग यज्ञादिक कर्मे करीत असला तरी ती सर्व कर्मे विलीन होतात (अर्थात् कर्मबंधन करीत नाहीत).

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।24।।

  • ज्याच्या दृष्टीने होमसाधन ब्रह्म, हविर्द्रव्य ब्रह्म, अग्नी ब्रह्म, यजमान ब्रह्म आणि हवनक्रियाही ब्रह्म – असे सर्व कर्म ब्रह्मच असते, त्या ब्रह्मरूप कर्मांत स्थित झालेल्या योग्याला प्राप्त होण्यायोग्य फळसुद्धा ब्रह्मच आहे अर्थात् तो ब्रह्मलाच प्राप्त होतो.

दैवमेवापरे यज्ञं योगिन: पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ।।25।।

  • काही योगिजन देवपूजारूप यज्ञाचीच चांगल्या प्रकारे उपासना करतात, तर दुसरे योगिजन परब्रह्म परमात्मारूप अग्नीत अभेद-दर्शनरूप यज्ञाद्वारे आत्मारूप यज्ञाचे हवन करीत असतात.

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ।।26।।

  • काही योगिजन संयमरूपी अग्नीत श्रोत्रादी सर्व इंद्रियांचे हवन करतात (अर्थात् इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आपल्या वश करून घेतात), तर दुसरे काही योगी इंद्रियरूपी अग्नीत त्यांच्या शब्दादी विषयांची आहुती देतात (अर्थात् शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेतात).

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ।।27।।

  • काही योगिजन ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम योगरूपी अग्नीत इंद्रियांच्या व प्राणांच्या सर्व क्रियांचे हवन करीत असतात.

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय: संशितव्रता: ।।28।।

  • काहीजण ईश्वरार्पण बुद्धीने लोकसेवेसाठी द्रव्ययज्ञ करतात, काहीजण स्वधर्मपालनरूप तपोयज्ञ करतात, काहीजण अष्टांग योगरूपी यज्ञ करतात. काहीजण अहिंसा वगैरे कठोर व्रत धारण करतात तर काही प्रयत्नशील पुरुष भगवंताच्या नावाचा जप व शास्त्रांचे अध्ययनरूप ज्ञानयज्ञ करतात.

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणा: ।।29।।

  • प्राणायामाची साधना करणारे काही योगिजन अपानरूप अग्नीत प्राणद्रव्याचे हवन (पूरक) करतात तसेच काही प्राणरूप अग्नीत अपानद्रव्याचे हवन (रेचक) करतात आणि दुसरे योगिजन प्राण व अपान यांच्या गतींचा निरोध (कुंभक) करतात.

अपरे नियताहारा: प्राणान्प्राणेषु जुह्वति । 
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा: ।।30।।

  • काहीजण सर्व विषयरूप आहारांचा संयम करून प्राणांतच प्राणांचे हवन (केवली कुंभक) करतात. याप्रमाणे यज्ञाने ज्यांच्या पापांचा नाश झाला आहे, असे हे सर्वच पुरुष यज्ञाचे प्रयोजन उत्तम रितीने जाणणारे (अर्थात् यज्ञवेत्ते) आहेत.

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्य: कुरुसत्तम ।।31।।

  • हे कुरुश्रेष्ठ ! अशा यज्ञकर्मांच्या फळस्वरूपात जे ज्ञानामृत मिळते, त्याचे सेवन करणारे योगिजन सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी इहलोकही सुखदायक होत नाही, मग परलोकाची गोष्टच कशाला ?

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ।।32।।

  • अशा प्रकारचे पुष्कळ यज्ञ वेदांनी सविस्तर सांगितलेले आहेत. त्या सर्वांना तू मन, इंद्रिये व शरीराच्या क्रियांद्वारेच उत्पन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्त्वत: जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे कर्मबंधनातून तू सर्वथा मुक्त होशील.

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञ: परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ।।33।।

  • हे परंतप ! द्रव्यमय यज्ञांपेक्षा ज्ञानरूप यज्ञ सर्वप्रकारे श्रेष्ठ आहे. कारण हे पार्थ ! ज्ञानात सर्व कर्मांची पूर्णपणे समाप्ती होते अर्थात् ज्ञान त्यांची पराकाष्ठा आहे.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: ।।34।।

  • ते ज्ञान तू तत्त्वदर्शी आत्मज्ञानी पुरुषांकडे जाऊन समजून घे. त्यांना यथायोग्य साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट भावाने, सरलतेने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म-तत्त्वाला जाणणारे ते आत्मज्ञानी महात्मा तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ।।35।।

  • त्यांच्याकडून ते ज्ञान जाणल्यानंतर तू पुन्हा अशा प्रकारे मोहात पडणार नाहीस आणि हे पांडव ! त्या ज्ञानाच्या योगाने तू स्वत:सहित सर्व चराचर निरंतर माझ्या स्वरूपात पाहशील.

अपि चेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ।।36।।

  • जरी तू सर्व पापी माणसांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही ज्ञानरूपी नौकेनेच नि:संशय संपूर्ण पापसागर उत्तम प्रकारे तरून जाशील.

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।।37।।

  • हे अर्जुन ! प्रज्वलित अग्नी जसे सरपणाची राखरांगोळी करतो, तसेच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात् करून टाकतो.

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ।।38।।

  • या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे असे काहीही नाही. ते ज्ञान कर्मयोगाद्वारे उत्तम प्रकारे अंत:करण शुद्ध झालेल्या मनुष्याच्या अंतरंगात कालांतराने आपोआप प्रगट होते.

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ।।39।।

  • जितेंद्रिय, साधनतत्पर व श्रद्धाळू मनुष्यालाच असे ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्त होताच त्याला तत्काळ भगवद्प्राप्तीरूपी परम शांती मिळते.

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।।40।।

  • विवेकहीन, श्रद्धारहित व संशयी पुरुष परमार्थापासून अवश्य भ्रष्ट होतो. अशा संशयी पुरुषाला तर सुखही मिळत नाही तसेच त्याचे इहलोकही साधत नाही आणि परलोकही साधत नाही अर्थात् तो दोन्ही लोकी भ्रष्ट होतो.

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।।41।।

  • हे धनंजय ! ज्याने कर्मयोगाद्वारे आपली सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्ञानाद्वारे ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधनकारक ठरत नाहीत.

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मन: ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।42।।

  • म्हणून हे भारत ! तू आपल्या हृदयातील या अज्ञानजन्य संशयाचा ज्ञानरूप खड्गाने नाश करून समत्वबुद्धिरूप कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धासाठी सज्ज हो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय: ।।4।। 

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ नामक चौथा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 4 मराठी