Bhagavad Gita Chapter 5 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 5 in Marathi PDF Download

पाचवा अध्याय : कर्मसंन्यासयोग

  • तिसऱ्या व चौथ्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून कर्माची विविध प्रकारे प्रशंसा ऐकून व त्यानुसार कर्म करण्याची प्रेरणा आणि आज्ञा घेऊन हेदेखील जाणून घेतले की कर्मयोगाद्वारे भगवद्स्वरूपाचे तत्त्वज्ञान आपोआपच होते. चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने अर्जुनाला कर्मयोग करण्याची आज्ञा दिली, परंतु अधूनमधून ‘ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुन्हति ।’ ‘तद्विद्धि प्रणिपातेन…’ इ. वचनांद्वारे ज्ञानयोगाची (कर्मसंन्यासाची) प्रशंसा केली. यामुळे अर्जुन या दोहोंपैकी कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, हे ठरवू शकला नाही. म्हणून याचे उत्तर भगवंताच्या श्रीमुखातूनच ऐकायला मिळावे, या हेतूने अर्जुन विचारतो.

।। अथ पंचमोऽध्याय: ।।

  • अर्जुन उवाच :

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।1।।

  • अर्जुन म्हणाला : हे कृष्ण ! मागे तुम्ही कर्मांच्या संन्यासाची आणि आता पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करीत आहात. तरी या दोहोंपैकी एकच, जे माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक साधन असेल, तेच मला सांगावे.
  • श्रीभगवानुवाच :

संन्यास: कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ।।2।।

  • श्रीभगवान म्हणाले : कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याणकारी आहेत. परंतु या दोहोंपैकी कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा आचरण करायला सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ।।3।।

  • हे अर्जुन ! जो कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही, तो कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे, कारण आसक्ती-द्वेषादी द्वंद्वांपासून रहित पुरुष अगदी सुखपूर्वक भवबंधनातून मुक्त होतो.

सांख्ययोगौ पृथग्बाला: प्रवदन्ति न पण्डिता: ।
एकमप्यास्थित:सम्यगुभयोर्विन्दते फलम् ।।4।।

  • मूर्ख लोक संन्यास व कर्मयोग यांना निरनिराळी फळे देणारी मानतात. ज्ञानीजनांना मात्र तसे वाटत नाही. कारण दोहोंपैकी एका मार्गाचेच उत्तम प्रकारे आचरण करणारा पुरुष दोहोंचेही फळस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.

यत्सांख्यै: प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च य: पश्यति स पश्यति ।।5।।

  • सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे परम धाम मिळते, तेच कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही मिळते. म्हणून जो पुरुष ज्ञानयोग व कर्मयोग यांना फळरूपाने एक पाहतो, तोच यथार्थ पाहतो.

संन्यासस्तु महाबाहो दु:खमाप्तुमयोगत: ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ।।6।।

  • हे महाबाहू ! कर्मयोगाशिवाय होणाऱ्या संन्यासाची अर्थात् मन, इंद्रिये व शरीराद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या त्यागाची प्राप्ती होणे कठीण आहे. परंतु भगवद्स्वरूपाचे मनन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याची शीघ्र प्राप्ती करतो.

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रिय: ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ।।7।।

  • ज्याने मन वश केले आहे, जो जितेंद्रिय व शुद्ध अंत:करणाचा आहे तसेच प्राणिमात्रांच्या आत्म्याशी ज्याचा आत्मा एकरूप झाला आहे, असा कर्मयोगी सर्व कर्मे करीत असूनही अलिप्त राहतो.

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ।।8।।
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।।9।।

  • तत्त्ववेत्ता सांख्ययोगी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, देणे, घेणे, डोळ्यांची उघडझाप करणे – या सर्व क्रिया इतरांप्रमाणेच करीत असला तरी सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरतात असे समजून ‘मी काहीच करीत नाही’ असे नि:संदेह मानतो.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।10।।

  • जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती त्यागून कर्मे करतो, तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो.

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।11।।

  • कर्मयोगी ममत्वबुद्धिरहित होऊन केवळ शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे आसक्ती त्यागून अंत:करणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतात.

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।12।।

  • कर्मयोगी कर्मफळांचा त्याग करून भगवद्प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि सकाम पुरुष फलाकांक्षेने कर्मफळात आसक्त होऊन बंधनात पडतो.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।।13।।

  • ज्याने आपले अंत:करण वश केले आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष तर कर्म न करता आणि न करविता नऊ द्वारांच्या या शरीररूपी नगरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून (अर्थात् इंद्रियेच आपापल्या विषयांत वर्तत आहेत असे मानून) आनंदपूर्वक सच्चिदानंदघन परमात्मस्वरूपात स्थित होऊन राहतो.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।14।।

  • परमेश्वर कोणाचा कर्तेपणा आणि कर्म उत्पन्न करीत नाही तसेच कर्माचे फळही कोणाला देत नाही. ही सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांद्वारेच केली जातात.

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।15।।

  • सर्वव्यापी परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्य ग्रहण करीत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकून टाकले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी मनुष्य कर्तेपणाच्या मोहात पडत आहेत.

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।16।।

  • परंतु जेव्हा त्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या तत्त्वज्ञानाने नाहीसे होते, तेव्हा जसे पूर्वेला उगवलेला सूर्य सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, तसे ते ज्ञान परमात्म्याच्या स्वरूपाला स्पष्ट दाखवून देते.

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।17।।

  • ज्यांची बुद्धी तद्रूप झाली आहे, ज्यांचे मन तदाकार झाले आहे आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांची निरंतर ऐक्यभावाने स्थिती आहे, असे तत्परायण पुरुष आत्मज्ञानाने निष्पाप होऊन अपुनरावृत्तीला अर्थात् परम गतीला प्राप्त होतात.

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।18।।

  • ते ज्ञानीजन विद्या आणि विनयाने संपन्न ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतात.

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।19।।

  • ज्यांचे मन समभावात स्थित आहे, त्यांनी या जन्मीच संसाराला जिंकले आहे अर्थात् जन्म-मृत्यूच्या बंधनावर विजय मिळविला आहे. ते ब्रह्मप्रमाणेच निर्दोष आहेत आणि ब्रह्ममध्येच स्थित आहेत.

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।20।।

  • जो प्रिय वस्तू मिळाल्याने हर्षित होत नाही तसेच अप्रिय वस्तू मिळाल्याने उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धीचा, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।21।।

  • बाह्य विषयसुखांमध्ये आसक्ती नसलेला पुरुष आपल्या अंत:करणातच भगवद्ध्यानजन्य सात्त्विक सुख मिळवितो. त्यानंतर परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूपी योगात ऐक्यभावाने स्थित झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव करतो.

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।22।।

  • विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे सर्व भोग विषयी पुरुषांना सुखरूप भासत असले तरी ते नि:संशय दुःखालाच जन्म देणारे आहेत तसेच ते उत्पन्न होऊन नाहीसे होणारे अर्थात् अनित्य आहेत. म्हणून हे कौंतेय ! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांच्यात रमत नाही.

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।23।।

  • इहलोकी या देहात असतानाच काम-क्रोधापासून उत्पन्न होणारे आवेग ज्याने आपल्या स्वाधीन (वश) केलेले असतात अर्थात् काम-क्रोधाला ज्याने पूर्णपणे जिंकले आहे, तोच योगी आहे आणि तोच या जगात सुखी आहे.

योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य: ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।24।।

  • जो अंतरात्म्यातच सुखी आणि आत्म्यातच रममाण झाला आहे तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञानप्रकाश मिळाला आहे, तो परब्रह्म परमात्म्याशी ऐक्य पावलेला योगी शांत ब्रह्मला प्राप्त होतो.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।
छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।25।।

  • ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्यांचे सर्व संशय ज्ञानाने निवृत्त झाले आहेत, जे सर्व प्राणिमात्रांच्या हितात रत आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलभावाने परमात्म्यात स्थित आहे, ते ब्रह्मवेत्ते पुरुष शांत परब्रह्मला प्राप्त होतात.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।26।।

  • काम-क्रोधापासून अलिप्त, चित्ताला वश केलेल्या व परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार केलेल्या आत्मज्ञानी पुरुषांसाठी सर्वत्र शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण आहे.

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।27।।
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।
विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।28।।

  • ज्या मोक्षपरायण मुनीने बाह्य विषयांना वैराग्याच्या आश्रयाने बाहेरच ठेवले, दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर केली, प्राण व अपान यांची उजव्या-डाव्या नाकपुड्यांतील ये-जा बंद करून त्यांचे सुषुम्नेत ऐक्य केले आणि इंद्रिये, मन व बुद्धी यांना स्वाधीन केले; त्यामुळे ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नाहीसे झाले, तो या शरीरात असतानाही सदा मुक्तच आहे.

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।29।।

  • हे अर्जुन ! माझा भक्त मला सर्व यज्ञ व तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर तसेच सर्व प्राणिमात्रांचा सुहृद अर्थात् नि:स्वार्थ दयाळू व प्रेमी- असे तत्त्वत: जाणून शांतीस प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय: ।।5।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘कर्मसंन्यासयोग’ नामक पाचवा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 5 मराठी