Bhagavad Gita Chapter 1 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 1 in Marathi PDF Download

पहिला अध्याय : अर्जुनविषादयोग

  • भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे. हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे. कौरव-पांडव या दोन्ही पक्षांतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यत: अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे.

।। अथ प्रथमोऽध्याय: ।।

  • धृतराष्ट्र उवाच :

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ।।1।।

  • धृतराष्ट्र म्हणाला : हे संजय ! धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते, त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग.
  • संजय उवाच :

दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ।।2।।

  • संजय म्हणाला : हे राजन् ! पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला.

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ।।3।।

  • हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा.

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ।।4।।
धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ।।5।।
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा: ।।6।।

  • या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत. सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, बलवान उत्तमौजा, सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र – हे सर्वच महारथी आहेत.

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ।।7।।

  • हे ब्राह्मणश्रेष्ठ ! आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्त्वाचे सेनानी आहेत, ते लक्षात घ्या. तुमच्या माहितीकरिता मी त्यांची नावे सांगतो.

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय: ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ।।8।।

  • येथे तुम्ही स्वत: आणि पितामह भीष्म, कर्ण, संग्रामविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तकुमार भूरिश्रवा आहेत.

अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युद्धविशारदा: ।।9।।

  • याशिवाय निरनिराळ्या शस्त्रास्त्रविद्यांत निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत. हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत.

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।।

  • भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे.

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता: ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त: सर्व एव हि ।।11।।

  • तुम्ही सर्वांनी सर्व व्यूहद्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचेच सर्व दृष्टींनी रक्षण करावे.
  • संजय उवाच :

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: ।
सिंहनादं विनद्योच्चै: शंखं दध्मौ प्रतापवान् ।।12।।

  • संजय म्हणाला : हे राजन् ! कुरुवंशातील सर्वांत वयोवृद्ध, महापराक्रमी भीष्मपितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुंकला.

तत: शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ।।13।।

  • त्यानंतर अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या. त्या आवाजाने प्रचंड हलकल्लोळ माजला.

तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु: ।।14।।

  • त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले.

पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजय: ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर: ।।15।।

  • हृषीकेशांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला.

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: ।
नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।।16।।

  • कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला.

काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ:।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ।।17।।
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहु: शंखान्दध्मु: पृथक्पृथक् ।।18।।

  • हे राजन् ! महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुपद, द्रौपदीपुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले.

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।।19।।

  • आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदये भेदून टाकली.

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज: ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव: ।।20।।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

  • अर्जुन उवाच :

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।।21।।
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ।।22।।

  • हे राजन् ! ज्याच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले :
    हे अच्युत ! माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या ठाकलेल्या आणि ज्यांच्याशी मला लढावे लागणार आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागता: ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव: ।।23।।

  • दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे हे राजेलोक या ठिकाणी आले आहेत, त्यांना मला पहायचे आहे.
  • संजय उवाच :

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ।।24।।
भीष्मद्रोणप्रमुखत: सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ।।25।।

  • संजय म्हणाला : राजन् ! अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म, द्रोणाचार्य व सर्व राजेलोकांच्या उपस्थितीत म्हटले की हे पार्थ ! युद्धासाठी येथे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा.

तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ।।26।।
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेय: सर्वान्बन्धूनवस्थितान् ।।27।।
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।

  • यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यांत असलेले आपले वाडवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक यांना पाहिले. तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाइकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकूळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला.
  • अर्जुन उवाच :

दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ।।28।।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।।29।।

  • अर्जुन म्हणाला : हे श्रीकृष्ण ! युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, घशाला कोरड पडली आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत.

गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: ।।30।।

  • हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे. माझे मन चक्रावून गेले आहे, त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही.

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।31।।

  • हे केशव ! मला फक्त विपरित घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे, हेसुद्धा मला कळत नाही.

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ।।32।।

  • हे कृष्ण ! मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद ! यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे ? भोगसाधने काय करायची ? किंवा जगून तरी काय करायचे ?

येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा: सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ।।33।।

  • ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धन-संपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत.

आचार्याः पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: ।
मातुला: श्वशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा ।।34।।

  • ते सर्व गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे व इतर नातलगच आहेत.

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ।।35।।

  • हे मधुसूदन ! यांनी मला मारले तरी बेहत्तर परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही.

निहत्य धार्तराष्ट्रान्न: का प्रीति: स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिन: ।।36।।

  • हे जनार्दन ! कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे ? या आततायींना मारून तर आम्हाला पापच लागणार आहे.

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिन: स्याम माधव ।।37।।

  • म्हणून हे माधव ! आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही, कारण आपल्याच कुटुंबीयांना मारून आम्ही सुखी तरी कसे होऊ ?

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतस: ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ।।38।।
कथं न ज्ञेयमस्माभि: पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ।।39।।

  • जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले, तरी हे जनार्दन ! कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये ?

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा: सनातना: ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ।।40।।

  • कुळनाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय: ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर: ।।41।।

  • हे कृष्ण ! कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैर वर्तन घडते आणि हे वार्ष्णेय ! स्त्रिया बिघडल्यामुळे जातींची सरमिसळ होते आणि वर्णसंकर उत्पन्न होतो.

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रिया: ।।42।।

  • वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्यांना नरकातच जावे लागते. एवढेच नव्हे तर पिंडदान, तिलोदक इत्यादी न मिळाल्याने त्या कुळातील पितरांचीही अधोगती होते.

दोषैरेतै: कुलघ्नानां वर्णसंकरकारकै: ।
उत्साद्यन्ते जातिधर्मा: कुलधर्माश्च शाश्वता: ।।43।।

  • वर्णसंकर घडविणाऱ्या दोषांमुळे कुळघातक्यांचे सनातन (पूर्वापार चालत आलेले) जातिधर्म व कुळधर्म नाहीसे होतात.

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।44।।

  • हे जनार्दन ! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो, असे आम्ही ऐकत आलो आहोत.

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता: ।।45।।

  • अरेरे ! किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत. राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांनाच मारण्यास सज्ज झालो आहोत.

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणय: ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ।।46।।

  • जर शस्त्रधारी कौरवांनी मज निःशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणांगणावर मारले तर ते मारणेही मला अधिक सुखावह वाटेल.
  • संजय उवाच :

एवमुक्त्वार्जुन: संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानस: ।।47।।

  • संजय म्हणाला : एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि योद्ध्याच्या आसनावरून उडी मारून खाली सारथ्याच्या आसनाजवळ जाऊन बसला.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ।।1।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या व योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘अर्जुनविषादयोग’ नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला.

Bhagavad Gita Chapter 1 in Marathi Free Download PDF