Play Audio Mp3
Ekadashi Vrat Puja Vidhi in Marathi [Ekadashi Che Niyam]
- दशमीला पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच भोगविलासापासूनही दूर रहावे.
- एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नये. कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी.
- एकादशीला झाडाची पाने तोडणेदेखील वर्ज्य आहे, म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत. हे शक्य नसल्यास पाण्याने बारा चुळा भराव्यात. मग स्नानादीतून निवृत्त होऊन मंदिरात जावे, गीतापाठ करावा किंवा पुरोहिताकडून ऐकावा.
- भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की ‘आज मी चोर, पाखंडी व दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखविणार नाही. गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन-कीर्तन करेन. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या द्वादशाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन. राम, कृष्ण, नारायण वगैरे श्रीविष्णूंच्या सहस्र नामांना कंठाचे आभूषण बनवेन.’ – असा शुभ संकल्प करून श्रीविष्णूंचे स्मरण करून प्रार्थना करावी की ‘हे त्रिलोकीनाथ ! माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या.’
- मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात.
- एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कोल्डड्रिंक्स, फळांचे डबाबंद रस, आइसक्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत. दोनदा जेवण करू नये. फळे, घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध वा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या तीन दिवसात (दशमी, एकादशी व द्वादशी) काशाच्या भांड्यात जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इ. चे सेवन करू नये. जास्त पाणीसुद्धा पिऊ नये.
- एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी (दशमीला) व तिसऱ्या दिवशी (द्वादशीला) हविष्यान्न (जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इ.) चे एकदा सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इ.चे सेवन करू नये. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते इ. अमृतफळांचे सेवन केले पाहिजे.
- जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध, खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे.
- चुकून एखाद्या निंदकाशी बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूप-दीपाने श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी. एकादशीला घरात झाडलोट करू नये. यामुळे कीडे मुंग्या वगैरे सूक्ष्म जीवांच्या मृत्यूची भीती असते. या दिवशी केस कापू नये. गोड बोलावे, पण कमीच बोलावे. जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शब्दही बोलले जातात. सत्य बोलावे. या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. प्रत्येक वस्तूत तुळशीदल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावी.
- एकादशीला एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे. गंगेत अस्थीविसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे. प्राणिमात्राला अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही लबाडी, कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटू वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनात दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इ.नी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी.
व्रताचे पारणे सोडण्याचा विधी
- द्वादशीला पूजेच्या जागी बसून सात फुटाण्यांचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे. ‘माझी सात जन्मांची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली’ – अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात फुटाणे खाऊन व्रत सोडावे.