- द्वापर युगातील गोष्ट आहे. एकलव्य नामक भिल्ल जातीचा एक मुलगा होता. एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव-पांडवांचे गुरु श्री द्रोणाचार्यांकडे गेला. परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाहीत. एकलव्याने मनोमन द्रोणाचार्यांना आपले गुरू मानले होते. म्हणून त्यांनी नकार दिल्यावरही त्याच्या मनात गुरूंप्रती तक्रार वा दोषदर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरूप्रती श्रद्धासुद्धा कमी झाली नाही.
- तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला. तेथे त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली. तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा, मग त्या मूर्तीकडे एकटक पाहत-पाहत ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा. स्वस्तिक अथवा इष्टदेव वा गुरुदेवांच्या श्रीचित्राकडे एकटक पाहिल्याने एकाग्रता वाढते. एकाग्रता आल्याने तसेच गुरुभक्ती, आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली. अशा प्रकारे अभ्यास करीत करीत तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला.
- एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव-पांडवांना घेऊन जंगलात गेले. त्यांच्यासोबत एक कुत्रासुद्धा होता, तो पळत पळत पुढे निघून गेला. जेथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता तेथे तो पोहोचला. एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला.
- कुत्र्याला इजाही होऊ नये आणि त्याचे भुंकणेसुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले. जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की “कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही !”
- अर्जुनाने गुरू द्रोणाचार्यांना विचारले : “गुरुदेव ! तुम्ही तर म्हटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही, परंतु अशी विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही.”
- द्रोणाचार्यही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धर कोण असेल ? पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्यधनूचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला. द्रोणाचार्यांनी विचारले: “वत्स ! तू ही विद्या कोठून शिकलास ?”
- एकलव्य : “गुरुदेव ! आपल्या कृपेनेच शिकलो आहे.”
- द्रोणाचार्यांनी तर अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही. परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला. एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले : “माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा…?”
- एकलव्य म्हणाला : “गुरुदेव ! आपण जे मागाल.”
- द्रोणाचार्य म्हणाले : “तुझ्या उजव्या हाताचा अंगठा…”
- एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला.
- द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले : “वत्स ! अर्जुन धनुर्विद्येत सर्वांत पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे; परंतु जोपर्यंत सूर्य-चंद्र आणि नक्षत्र राहतील, तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील.”
- एकलव्याची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलेच, त्याचबरोबर संतांच्या हृदयातही त्याच्याप्रती आदर प्रगट केला. धन्य आहे एकलव्य ! ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळविले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला.
-
– ‘चला सुसंस्कारी होऊया’ सहित्यातून