सूर्याच्या आराधना - उपासनेचे पावन पर्व : मकर संक्रांत
- भारतीय संस्कृतीत दैनिक सूर्यपूजेचा नियम प्राचीन काळापासून चालत आला आहे. प्रभू श्रीरामांद्वारे नित्य सूर्यपूजेचा उल्लेख रामकथेत येतो. श्रीराम सूर्यवंशी होते.
- सूर्यनारायण मकर संक्रांतीला दरवर्षी धनू राशीचे भ्रमण पूर्ण करून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून देवांचा ब्राह्ममुहूर्त आणि उपासनेचा पुण्यकाळ सुरू होतो. या काळालाच परा-अपरा विद्येच्या प्राप्तीचा काळ असेही म्हटले जाते. याला साधनेचा सिद्धिकाळही म्हटले गेले आहे. मकर संक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे – जीवनात सम्यक् क्रांती. या दिवशी आपले चित्त विषय- विकारांपासून हटवून निर्विकारी नारायणात लावण्याचा शुभ संकल्प केला पाहिजे. शरीराला ‘मी’ आणि संसाराला माझे मानण्याची चूक सोडून आत्म्याला ‘मी’ आणि ब्रह्मांडव्यापी परमात्म्याला आपले मानण्याची सम्यक् क्रांती केली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इ. विकारांपासून स्वतःला वाचविण्यासाठी भगवंताला आर्तभावाने प्रार्थना करावी आणि प्रेमाने भगवंताचे चिंतन करावे. विकारांमध्ये सत्यबुद्धी करू नये. गुरफटून गेलात तरीही सत्यबुद्धी करू नये आणि सावरले तरीही सत्यबुद्धी करू नये. आपल्या सत्यस्वरूपात, साक्षी चैतन्यस्वभावात सत्यबुद्धी करावी. यासाठी सत्संग आणि जीवन्मुक्त महापुरुषांचे सान्निध्य अत्यंत आवश्यक आहे. जीवन्मुक्त महापुरुषच आपल्या क्रांतीला योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन देऊ शकतात.
- मकर संक्रांतीच्या दिवशीच कपिल मुनींच्या आश्रमात गंगा मातेचे आगमन झाले होते. भीष्म पितामहांनी सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच माघ शुक्ल अष्टमीला स्वेच्छेने देहत्याग केला होता. त्यांचे श्राद्धही सूर्याच्या उत्तरायण गतीत झाले होते.
- मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष माहात्म्य आहे. पद्म पुरणानुसार ‘अयन- परिवर्तनाच्या (उत्तरायण व दक्षिणायन) दिवशी, विषुव नामक योग आल्यावर, चंद्र आणि सूर्य ग्रहणात तसेच संक्रांतीच्या शुभ प्रसंगी दिलेले दान अक्षय होते.’ या दिवशी गरिबांना यथायोग्य अन्नदान करावे. सत्साहित्यसुद्धा दान करू शकता आणि काहीच नसले तरी भगवन्नाम-जपाचा गजर करून वातावरण पवित्र जरूर केले पाहिजे….. आणि या सर्वांहून चांगले आहे- आपले काम- क्रोधादी सर्व विकार तसेच आपला अहंकार भगवंताच्या, सद्गुरूंच्या श्रीचरणी अर्पण करून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प कराल तर याहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही दान असू शकणार नाही. जर स्वतःला सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले तर मग त्यांचे मार्गदर्शन, शक्ती- संप्रेक्षण व परम हितकारी शिस्त तुम्हाला जन्म- मरणाच्या चक्रातून मुक्त करेल.
- सहस्रांशूच्या सहस्र किरणांचा वेगवेगळा प्रभाव आहे. सूर्याचा पहिला किरण आसुरी संपत्तिमूलक भौतिक उन्नतीचा विधेयक आहे. तर सूर्याचा सातवा किरण भारतात दैवी संपत्तिमूलक आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देणारा आहे. सातव्या किरणाचा प्रभाव भारतात गंगा-यमुनेच्या मध्य भागात दीर्घकाळ राहतो. या भौगोलिक स्थितीमुळेच हरिद्वार आणि प्रयागमध्ये माघ कुंभमेळा अर्थात् मकर संक्रांतीचा विशेष उत्सव आयोजित केला जातो. तत्त्वदर्शी महर्षींनी पर्व आणि व्रत-विज्ञानाचा विशेष महिमा सांगितला आहे. त्यानुसार व्रतांच्या प्रभावाने जीवाचे अंतःकरण शुद्ध होते. संकल्पशक्ती वाढते तसेच ज्ञानतंतू विकसित होतात. अंतःस्तलात सच्चिदानंद परमात्म्याप्रती श्रद्धा व भक्तिभावाचा संचार होतो. मकर संक्रांत आत्मचेतना विकसित करणारे व्रत- पर्व आहे.
मकर संक्रांत व्रताचा विधी [Makar Sankranti Puja Vidhi in Marathi]
- पहाटे तिळमिश्रित उटणे लावून तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे.
- स्नानानंतर आपल्या आराध्यदेवाची पूजा-अर्चना करावी.
- तांब्यात लाल चंदन, कुंकू, लाल रंगाचे फूल टाकून पूर्वाभिमुख होऊन तीन वेळा सूर्यगायत्री मंत्राचे उच्चारण करून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे आणि त्याच जागी उभे राहून सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
- सूर्य गायत्री मंत्र :
ॐ आदित्याय विद्महे भास्कराय धीमहि । तन्नो भानु: प्रचोदयात् ।
- मग गायत्री मंत्र व आदित्यह्रदय स्तोत्राचा पाठ करावा.
- पक्ष्यांना धान्य आणि गाईला गोग्रास, तिळगूळ खाऊ घालावा.
- पद्म पुराणानुसार ‘जो मनुष्य पवित्र होऊन सूर्यनारायणाचे आदित्य, भास्कर, सूर्य, अर्क, भानू, दिवाकर, सुवर्णरिता, मित्र, पूषा, त्वष्टा, स्वयंभू व तिमिराश – या 12 नामाचे उच्चारण करतो, तो सर्व पाप आणि सर्व व्याधींपासून मुक्त होऊन परम गतीस प्राप्त होतो.’
- आजपासून तिळातिळाने दिवस वाढू लागतो. म्हणून हे पर्व तीळ संक्रांतीच्या रूपातही साजरे केले जाते, विष्णु धर्मसूत्रात असे म्हटले आहे की पितरांच्या आत्मिक शांतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कल्याणासाठी तिळाचे सहा प्रयोग पुण्यदायक व फलदायक असतात :
- तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे दान, तिळमिश्रित भोजन, तिळमिश्रित अर्घ्य देणे, तिळाची आहुती देणे तसेच तिळमिश्रित उटणे अंगाला लावणे. परंतु या गोष्टीची काळजी घ्यावी की सूर्यास्तानंतर तीळ व तिळाच्या तेलापासून बनविलेले पदार्थ खाणे वर्ज्य आहे.
- हे पावन पर्व परस्पर स्नेह आणि माधुर्याच्या वृद्धीचा महोत्सव आहे, म्हणून या दिवशी लोक एकमेकांना स्नेहाचे प्रतीक तीळ व माधुर्याचे प्रतीक गूळ अर्थात् तिळगूळ देतात.
- या मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त आपण हा संकल्प करूया की ‘आजपासून आपण आपसातील मतभेद व वैमनस्य विसरून सत्शास्त्र व सद्गुरूंचे ज्ञान आत्मसात करु आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर अग्रेसर होऊन शाश्वत सुख, शाश्वत आनंद मिळवू.’
-
– ऋषी प्रसाद, डिसेंबर 2010