संकल्प शक्तीचा विकास कसा करावा ? [Will Power]

  • संकल्पाचा शुद्ध व निरंतर अभ्यास केल्यास अद्भुत कार्ये सुद्धा सिद्ध केली जाऊ शकतात. प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्तीसाठी या जगात काहीच अशक्य नाही. वासनेने संकल्प अशुद्ध व दुर्बळ होतो. इच्छांना वश केल्याने संकल्पशक्ती वाढते. इच्छा जितक्या कमी असतील, संकल्प तितकाच दृढ होतो. मनुष्यात अनेक प्रकारच्या मानसिक शक्ती आहेत. उदा.- धारणाशक्ती, विवेकशक्ती, अनुमानशक्ती, मनःशक्ती, स्मृतिशक्ती, प्रज्ञाशक्ती इ. या सर्व संकल्पशक्ती विकसित झाल्यावर क्षणार्धात काम करू लागतात.
  • ध्यानाचा नियमित अभ्यास, सहिष्णुता, विघ्नबाधांमध्ये धैर्य, तपश्चर्या, स्वभावावर विजय, तितिक्षा, दृढता तसेच सत्याग्रह, घृणा, खिन्नता आणि चिडचिडेपणावर नियंत्रण हे सर्व संकल्पाच्या विकासाला सुगम बनवितात. धैर्याने सर्वांचे बोलणे ऐकून घेतले पाहिजे. यामुळे संकल्पाचा विकास होतो आणि दुसऱ्यांचे मन जिंकता येते.
  • प्रतिकूल परिस्थितींबाबत कधीही तक्रार करू नका. तुम्ही कोठेही रहा आणि कोठेही जा, स्वतःसाठी अनुकूल मानसिक जग निर्माण करा. सुख-सुविधांच्या प्राप्तीमुळे तुम्ही मजबूत बनू शकत नाही. प्रतिकूल आणि अभावग्रस्त वातावरणापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या शीघ्र उन्नतीसाठी भगवंताने तुम्हाला तेथे ठेवले आहे. म्हणून सर्व परिस्थितींचा सदुपयोग करा. कोणत्याही वस्तू वा व्यक्तीमुळे उद्विग्न होऊ नका. यामुळे तुमच्या संकल्पशक्तीचा विकास होईल. प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक परिस्थितीत प्रसन्न राहण्याचा स्वभाव बनवा. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली व तेजस्वी होईल. मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास संकल्पाच्या उन्नतीत सहाय्यक आहे. मनाचा स्वभाव कसा आहे, हे यथायोग्य जाणून घ्या. मन कशाप्रकारे इतस्ततः विचरण करते आणि कशाप्रकारे आपल्या सिद्धांतांचे प्रतिपादन करते, हे सर्व योग्यप्रकारे आत्मसात करा. मनाच्या चंचलतेला वश करण्यासाठी सुलभ व प्रभावशाली उपाय शोधा.
  • व्यर्थ बोलणे कायमचे सोडून द्या. सर्वांनी वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. संकल्प तेव्हाच प्रभावशाली होईल जेव्हा वेळेचा सदुपयोग केला जाईल. व्यवहारकुशलता आणि दृढता, तत्परता व ध्यान, धैर्य व सतत प्रयत्न, विश्वास आणि स्वावलंबीपणा इ. सद्गुणांमुळे तुम्ही सर्व कार्यांमध्ये यशस्वी व्हाल.
  • तुम्ही आपल्या संकल्पांचा वापर योग्यतेनुसार केला पाहिजे, नाहीतर संकल्प क्षीण होईल आणि तुम्ही हतोत्साहित व्हाल. दैनंदिन नियम किंवा कामकाज आपल्या योग्यतेनुसार ठरवावे आणि सावधगिरीने ते पार पाडावे. सुरुवातीला आपल्या दैनंदिन कामकाजात मोजक्याच बाबींचा समावेश करावा अन्यथा तुम्ही ते यथायोग्यरित्या पार पाडू शकणार नाही आणि तत्परतेसह आवडीने करू शकणार नाही. तुमचा उत्साह क्षीण होत जाईल. शक्ती विखुरली जाईल. म्हणून तुम्ही जे काही करण्याचा निश्चय केला आहे, दररोज त्याचे काटेकोरपणे पालन करा.
  • अधिक विचारांमुळे संकल्पित कार्यामध्ये अडथळा येतो. यामुळे भ्रांती, संशय आणि दीर्घसूत्रतेचा उदय होतो. संकल्पातील दृढता क्षीण होते. म्हणून हे आवश्यक आहे की काही वेळ विचार करून मग निर्णय घ्यावा. यात निष्कारण उशीर लावू नका.
  • कधीकधी विचार तर करता पण त्यानुसार आचरण करीत नाही. यथायोग्य विचार व अनुभवांच्या अभावीच असे होत असते. म्हणून यथायोग्य विचार केला पाहिजे आणि योग्यच निर्णय घेतला पाहिजे, तेंव्हाच संकल्पाचे साफल्य अनिवार्य आहे. परंतु केवळ संकल्पानेच एखाद्या वस्तूची प्राप्ती होत नाही. संकल्पाबरोबर निश्चित उद्देशही जोडावा लागेल. इच्छा किंवा कामना तर मानस-सरोवरातील एका लहानशा तरंगाप्रमाणे आहेत, परंतु संकल्प ती शक्ती आहे जी इच्छेला कार्यरूपात परिणत करते. संकल्प निश्चय करण्याची शक्ती आहे.
  • जो मनुष्य संकल्प-विकासाचा प्रयत्न करीत आहे, त्याने सदैव आपले मन शांत ठेवले पाहिजे. सर्व परिस्थितींमध्ये आपले मानसिक संतुलन टिकवून ठेवले पाहिजे. मनाला शिक्षित व शिस्तबद्ध बनविले पाहिजे. जो मनुष्य सदैव मानसिक संतुलन टिकवून ठेवतो आणि ज्याचा संकल्प दृढ आहे तो सर्व कार्यांमध्ये अपेक्षातीत यश मिळवेल.
  • अनुद्विग्न मन, समभाव, प्रसन्नता, आंतरिक बळ, कार्य-संपादनाची क्षमता, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, सर्व कार्यांत यश, ओजस्वी चेहरा, निर्भयता इ. लक्षणांवरून समजावे की संकल्पोन्नती होत आहे.

    – ऋषी प्रसाद, ऑगस्ट 2006