Sant Eknath Maharaj Information Mahiti in Marathi
- श्री एकनाथ महाराज एकनिष्ठ गुरुभक्त होते. एकनाथ महाराजांचा जन्म चैत्र कृष्ण षष्ठी शके 1455 (इ.स. 1533) मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मानंतर काही काळाने त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचे पालनपोषण केले. एकनाथ बाल्यावस्थेपासूनच अतिशय बुद्धिमान व श्रद्धाळू होते. संध्या, हरिभजन, पुराणांचे श्रवण, ईश्वरपूजा इत्यादींची त्यांना फार आवड होती. ते आनंदमग्न होउ कधीकधी हाती चिपळ्या घेऊन किंवा खांद्यावर मोठी पळी वा अशीच एखादी वस्तू वीणेप्रमाणे ठेवून भजन करायचे. कधी दगड समोर ठेवून त्यावर फूल अर्पण करायचे आणि भगवन्नाम संकीर्तन करीत नृत्य करायचे. जेव्हा गावात भागवत कथा असायची तेव्हा ते ती अगदी तन्मयतेने ऐकायचे. इतक्या कोवळ्या वयातही ते त्रिकाळ संध्यावंदन करण्यास कधी चुकत नव्हते. स्तोत्रपाठ, सकाळ-सायंकाळ भगवंत व गुरुजनांना नमस्कार करणे वगैरे नियम-निष्ठेतही ते तत्पर रहायचे.
- या सर्व गोष्टींचा परिणाम हा झाला की भगवद्प्रेमाच्या रसाने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या जीवनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत झाली. त्यांच्या बालमनात वारंवार हा विचार येऊ लागला की ‘जसे ध्रुव व प्रल्हादला भगवंताची प्राप्ती करविणारे सद्गुरू देवर्षी नारद भेटले, तसे समर्थ सद्गुरू मला केव्हा भेटतील ?’ एके दिवशी 12 वर्षांचे एकनाथ शिवालयात हरिगुण गात बसले होते. रात्रीचा चौथा प्रहर सुरू झाल्यावर त्यांच्या हृदयात अंतःप्रेरणा झाली की ‘देवगडला जनार्दन पंत नावाचे एक सत्पुरुष राहतात. त्यांच्याकडे जा, ते ‘तुला कृतार्थ करतील !’
- एकनाथ देवगडला गेले. तेथे त्यांना श्री जनार्दन स्वामींचे दर्शन झाले. गद्गद होऊन नाथांनी आपला देह गुरुचरणी अर्पण केला. ते क्षण संसाराचे अत्यंत सोनेरी क्षण असतात जेव्हा सद्गुरूंचे सशिष्याशी मिलन होते, कारण या संगमाने जनहिताच्या पावन गंगेचा उदय होतो.
- गुरुद्वारी राहून एकनाथ गुरुसेवेत संलग्न झाले. गुरुजी झोपून उठण्याआधीच ते उठायचे. जी सेवा समोर दिसायची ती आज्ञेची वाट न पाहताच करून टाकायचे ! रात्री गुरुजींचे पाय चेपायचे, कधी पंख्याने वारा घालायचे. गुरुजी जेव्हा समाधीत बसायचे तेव्हा द्वाराजवळ उभे राहून पहारा करायचे. गुरुदेवांच्या समाधीत कोणतीही बाधा येऊ नये याकडे लक्ष द्यायचे. गुरूंच्या द्वारी आणखीही काही सेवक होते पण नाथ कोणाचीच वाट न पाहता स्वतःच मोठ्या प्रेमाने, उत्साहाने व तत्परतेने सेवाकार्यात मग्न रहायचे. त्यांच्यासाठी गुरूंचा संतोषच स्वसंतोष होता, गुरूंचे शब्दच शास्त्र होते, गुरुद्वारच नंदनवन होते आणि गुरूंची मूर्तीच परमेश्वराचा श्रीविग्रह होता. ‘गुरुर्साक्षात् परब्रह्म…’ यात त्यांची दृढ निष्ठा होती. निरंतर सहा वर्षेअविश्रांत सेवेने प्रसन्न होऊन गुरूंनी एके दिवशी त्यांना अनुष्ठान करण्याची आज्ञा दिली. ती शिरोधार्य करून एकनाथांनी अनुष्ठान सुरू केले.
- एके दिवशी ते समाधीत लीन होते. एका भयंकार सापाने फुत्कार करीत त्यांच्या देहाला विळखा घातला. नाथांच्या स्पर्शाने तो त्याचा हिंसक भाव विसरला आणि त्यांच्या मस्तकावर फणा पसरवून डोलू लागला. ज्यांचे चित्त सम झाले आहे, त्यांच्यासमोर साप, विंचू चित्ते, सिंह वगैरे हिंसक पशूसुद्धा क्रूरता विसरून आनंदमग्न होऊ लागतात. स्वामी रामतीर्थांचे जीवनही या गोष्टीची साक्ष देते.
- तो साप मग नाथांचा सोबती बनला. तो नेहमी त्यांच्या जवळ येऊ लागला. ते समाधिस्थ व्हायचे तेव्हा तो त्यांच्या शरीराला विळखा घालून डोक्यावर फणा पसरवून डोलू लागायचा आणि ते समाधितून जागे होण्याचा संकेत मिळताच निघून जायचा. नाथांना हे माहीतच नव्हते. त्यांच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने एक दिवस नाथांना विळखा घातलेल्या सापाला पाहिले तेव्हा तो ओरडला. ताबडतोब नाथ समाधितून उठले, तेव्हा त्यांनी सापाला निघून जाताना पाहिले.
- या प्रसंगाचा उल्लेख करताना एकनाथांनी एक अभंग लिहिला, त्याचा भावार्थ : ‘मला दंश करण्यासाठी काळ आला होता, पण येताच कृपाळू झाला. आता चांगली ओळख पटली. त्यामुळे चित्त अच्युतात जाऊन मिळाले. देहात जो संशय होता तो दूर झाला आणि काळापासून कायमची मुक्ती मिळाली. ‘एका’ची श्री जनार्दन स्वामींशी जी भेट झाली, त्यामुळे आवागमनाच्या चक्रातूनच सुट्टी मिळाली.’
- अनुष्ठान पूर्ण करून त्यांनी मग सर्व परिस्थिती गुरूंना सांगितली. खूप प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादरूपी पुष्पांचा वर्षाव केला. गुरूंना हे समजण्यास वेळ लागला नाही की आता माझा ‘एका’ निद्वंद्व नारायणात पूर्णतः प्रतिष्ठित झाला आहे.
- यानंतर एकनाथ ‘संत एकनाथ महाराज’ म्हणून पूजले जाऊ लागले. त्यांनी ‘एकनाथी भागवत’ सारख्या ग्रंथाची रचना करून समाजात परमात्मरसाची गंगा प्रवाहित केली. ते म्हणतात : ‘गुरूच माता, पिता, स्वामी आणि कुळदेवता आहेत. गुरूंशिवाय आणखी दुसऱ्या देवतेचे स्मरण होत नाही.
- शरीर, मन, वाणी व प्राणाने गुरूंचेच अनन्य ध्यान होणे, हीच गुरुभक्ती आहे. तहान पाण्याला विसरावी, भूक मिष्ठान्नाला विसरावी आणि गुरुचरणांची सेवा करताना झोपही उडून जावी. मुखी सद्गुरूंचे नाम असावे, हृदयात सद्गुरूंचे प्रेम असावे, देहात सद्गुरूंचेच अहर्निश अविश्रांत कर्म असावे.
- गुरुसेवेत मन असे लागावे की पत्नी, पुत्र व धनाचेही विस्मरण व्हावे, आपल्या मनाचेही विस्मरण व्हावे, हेसुद्धा लक्षात राहू नये की मी कोण आहे ?’ सद्गुरूंचे सामर्थ्य आणि सद्सेवेचे सुख कसे असते, याविषयी एकनाथ महाराज म्हणतात :
- ‘सद्गुरू जेथे वास्तव्य करतात ती सुखाची सृष्टी असते. ते जेथे बोलतात तेथेच महाबोध (ब्रह्मज्ञान) स्वानंदाने राहतो. अशा सद्गुरूंच्या चरणारविंदाच्या दर्शनाने त्याच क्षणी तहान-भूक पळून जाते. मग कोणतीही कल्पना मनात उठत नाही. आपले वास्तविक सुख गुरुचरणांतच आहे.’
- गुरुसेवेचा महिमा गाताना ते आपला अनुभव सांगतात : ‘सेवेप्रती असे प्रेम जडले की त्यातून अर्धा तासही वेळ मिळत नसायचा. सेवेत आळस तर अजिबात नसायचाच, कारण या सेवेमुळे विश्रांतीच्या स्थानाने घशाच गुंडाळला. तहान पाण्यालाच विसरली, भूक मिष्ठान्नाला विसरली. जांभई घेण्याचीही फुरसत राहिली नाही. सेवेत मन असे रमून गेले की ‘एका’ जनार्दन स्वामींच्या शरणी लीन झाला.’ ➢ ऋषि प्रसाद, मार्च 2007