Play Audio
तुळशी नामाष्टक
- भगवान नारायण देवर्षी नारदांना म्हणतात :
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी ।
पुष्पसारा नन्दिनी च तुलसी कृष्णजीवनी ॥
एतन्नामाष्टकं चैव स्तोत्रं नामार्थसंयुतम् ।
य: पठेत् तां च सम्पूज्य सोऽश्वमेधफलं लभेत् ॥
- ‘वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळस आणि कृष्णजीवनी – ही तुळशी देवीची आठ नावे आहेत. ही सार्थक नामावली स्तोत्ररूपातही आहे. जो मनुष्य तुळशीची पूजा करून या नामाष्टकाचा पाठ करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.'(ब्रह्मवैवर्त पुराण, प्रकृती खंड : 22.33-34)
- कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला तुळशी देवीचे मंगलमय प्रागट्य झाले आणि सर्वप्रथम श्रीहरींनी तिची पूजा केली. जो या पौर्णिमेच्या दिवशी विश्वपावनी तुळशीची भक्तिभावाने पूजा करतो, तो संपूर्ण पापांपासून मुक्त होऊन वैकुंठात जातो. जो कार्तिक महिन्यात श्रीविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करतो, तो दहा हजार गाईंना दान केल्याचे फळ निश्चितच प्राप्त करतो. या तुळशी नामाष्टकाच्या नित्य स्मरणाने निपुत्रिक मनुष्य पुत्रवान होतो. ज्याचा विवाहाचा योग येत नसेल त्याचा योग जुळतो आणि बंधुहीन मनुष्याला अनेक बांधव मिळतात. याच्या स्मरणाने रोगी रोगमुक्त होतो, बंधनात पडलेल्याची बंधनातून मुक्ती होते. भयभीत मनुष्य निर्भय होतो आणि पापी पापांपासून मुक्त होतो.
- नारद ! वेदाच्या ‘कण्व’ शाखेत तुळशीच्या ध्यानाच्या विधीचे वर्णन केलेले आहे. ध्यानात संपूर्ण पाप नष्ट करण्याची अद्भुत शक्ती आहे.
- ध्यान : ‘परम साध्वी तुळस फुलांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ही पूजनीय तसेच मनोहारिणी आहे. संपूर्ण पापरूपी इंधन भस्मीभूत करण्यासाठी ही अग्नीच्या ज्वाळेसमान आहे. हिची सर्व फुलांमध्ये वा देवींमध्ये कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. म्हणून त्या सर्वांमध्ये पवित्ररूप असलेल्या या देवीस ‘तुळस’ म्हटले गेले आहे. ही सर्वांद्वारे स्वत:च्या मस्तकावर धारण करण्यायोग्य आहे. विश्वाला पवित्र करणारी ही देवी जीवन्मुक्त आहे. मुक्ती आणि श्रीहरींची भक्ती प्रदान करणे हिचा स्वभाव आहे. अशा भगवती तुळशीची मी उपासना करतो.’ ध्यान केल्यानंतर आवाहन न करता भक्ति-भावाने तुळशीच्या रोपट्याला देवीस्वरूप मानून षोडशोपचाराने या देवीची पूजा करावी.
- विद्वान मनुष्याने अशा प्रकारे ध्यान, भजन, पूजा आणि तुळशी – नामाष्टकाचे पठण करून तुळशी देवीला नमस्कार करावा. (ब्रह्मवैवर्त पुराणातून)
- – ऋषी प्रसाद, नोव्हेंबर 2004