Diwali Laxmi Puja Vidhi Marathi [दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे]

Diwali Laxmi Puja Vidhi Marathi [दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे]

दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन ?

  • दिवाळीच्या दिवशी रात्री सरस्वती आणि लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते . तुमच्याकडे धन असेल, खूप धन मिळाले, त्याला मी ‘ लक्ष्मी ‘ मानत नाही . महापुरुष त्याला ‘वित्त’ मानतात . वित्ताद्वारे मोठे बंगले मिळतील, मोठमोठ्या गाड्या मिळतील, लांबलचक प्रशंसा होईल पण अंतरी रस येणार नाही . दिवाळीच्या रात्री सरस्वती देवीची पूजा करतात, जेणेकरून विद्या मिळावी पण ती विद्या फक्त पोट भरण्याची विद्या नाही, ऐहिक विद्येसोबतच तुमच्या चित्तात विनय यावा, तुमच्या जीवनात ब्रह्मविद्या यावी यासाठी सरस्वती देवीची पूजा करायची असते आणि तुमचे वित्त तुम्हाला बांधणारे ठरू नये, तुम्हाला विषय-विलास आणि विकारांमध्ये फरफटत घेऊन जाऊ नये यासाठी लक्ष्मी- पूजन करायचे असते .
  • लक्ष्मी पूजन म्हणजे वित्त महालक्ष्मी बनून यावे . जे वासनांचा वेग वाढविते ते ‘ वित्त ‘ आणि जी वासनांना श्रीहरीच्या चरणी पोहोचविते ती ‘ महालक्ष्मी ‘ ! वित्त असेल तर भांडण घडवून आणेल, अनर्थ सर्जित करेल . लक्ष्मी असेल तर व्यवहारात कामी येईल आणि महालक्ष्मी असेल तर नारायणाशी एक करवून देईल . भारताचे ऋषी म्हणतात की लक्ष्मी- पूजन करा . आम्ही धन किंवा लक्ष्मीचा तिरस्कार करीत नाही पण जे मिळवून लोक असुरांसारखे जीवन जगतात असे वित्त, असे धन, अशी लक्ष्मी नाही तर नारायणाशी मिळवून देईल असे धन, अशी लक्ष्मी, महालक्ष्मी पाहिजे .

दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे

  • दिवाळी लक्ष्मीपूजन ची माहिती : सनातन धर्मात दिवाळीला श्रीसद्गुरू, श्रीगणपती, लक्ष्मीदेवी, सरस्वती देवी व कुबेर या देवी देवतांच्या पूजेचे विधान आहे.
  • वैदिक मान्यतेनुसार दिवाळीला मंत्रोच्चारणासह या पंचदेवांच्या स्मरणाने व पूजेने आंतरिक व बाह्य महालक्ष्मीची अभिवृद्धी होऊन जीवनात सुख-शांतीचा संचार होतो. सर्वसाधारण श्रद्धाळूलाही भावपूर्वक वैदिक विधी-विधानाचा लाभ घेता यावा, यासाठी लक्ष्मीपूजनाचा संक्षिप्त विधी येथे देत आहोत.

दिवाळी लक्ष्मीपूजन विधी [diwali laxmi puja in marathi]

  • दिवाळी लक्ष्मी पूजन घरी कसे करावे : सर्वप्रथम स्वच्छ व पवित्र अशा खोलीत वा देवघरात ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या समोर उजव्या बाजूला लाल रंगाचे व डावीकडे पांढऱ्या रंगाचे कापडी आसन अंथरावे. लाल आसनावर गव्हाचे स्वस्तिक बनवावे आणि पांढऱ्या आसनावर तांदळाचे अष्टदल कमळ बनवावे. गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्या समोर उजव्या बाजूला ठेवावे.
ॐ दीपस्थ देवताय नम:
  • या मंत्राच्या उच्चारणासह दिव्याला फुले आणि अक्षता वाहाव्यात.

ॐ गं गणपतये नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत स्वत:ला व कुटुंबीयांना टिळा लावावा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
  • मंत्राचे उच्चारण करीत सर्वांच्या हाताला कांकण बांधावे. पुन्हा याच मंत्राचे उच्चारण करीत आपल्या शेंडीला गाठ मारावी. (शेंडी नसल्यास मनोमन गाठ मारावी.) मग

ॐ केशवाय नम: स्वाहा
ॐ माधवाय नम: स्वाहा
ॐ नारायणाय नम: स्वाहा

  • या तीन मंत्रांचे उच्चारण करीत तीन आचमन घ्यावे. आणि
ॐ गोविन्दाय नम:
  • मंत्र म्हणत हात धुवावे. आपल्या डाव्या हातात जल घेऊन उजव्या हाताने आपल्या अंगावर व पूजा- सामग्रीवर पुढील मंत्राचे उच्चारण करीत जल शिंपडावे.

ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
य:स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि: ।।

  • आपल्या आसनाखाली एक फूल ठेवून ‘ॐ हाँ पृथिव्यै नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मंत्राचे उच्चारण करीत भूमीला व आसनाला मनोमन नमस्कार करावा.
  • मलीन वृत्ती आणि विघ्नबाधांपासून रक्षणासाठी आपल्या चोहीकडे थोडे तांदूळ अथवा मोहरीचे दाणे टाकावे.

ॐ अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: ।
ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया ॥

  • अर्थ : ‘कल्याणकारी देवाच्या कृपेने भूमीवरील विध्वंसक मलीन वृत्तींचा नाश होवो.’
  • आता हातात थोडी फुले घेऊन पुढील मंत्रोच्चारणासह आपल्या गुरुदेवांचे स्मरण करावे.

ॐ आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजभावयुक्तम् ।
योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि ॥

  • अर्थ: ‘आनंदस्वरूप, आनंददाता, सदैव प्रसन्नमुख, ज्ञानस्वरूप, निजस्वभावात स्थित, योगिजन व इंद्रादी देवांद्वारे स्तुत्य आणि भवरोगाचे वैद्य असलेल्या श्रीसद्गुरुदेवांना माझा नित्य नमस्कार असो.’
  • गुरुदेवांना मनोमन नमस्कार करून ती फुले थाळीत ठेवावीत. लाल व पांढऱ्या आसनाच्या मधोमध पुष्पासनावर गुरुदेवांची प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्रीगणपतीचे पुढीलप्रमाणे मानसिक ध्यान करावे :

ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ: निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

  • अर्थ : ‘कोटी सूर्यांसमान महातेजस्वी, विशालकाय, वक्रतुंड गणराया ! तुझ्या कृपेने माझ्या सर्व कार्यांतील विघ्नांचे निवारण होवो.’
  • श्रीगणपतीची मूर्ती थाळीत ठेवून ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मूर्तीला स्नान घालावे. स्वच्छ वस्त्राने मूर्ती पुसून गव्हाच्या स्वस्तिकावर दुर्वांचे आसन बनवून त्यावर गणरायाला स्थानापन्न करावे.

ॐ गं गणपतये नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत गणरायाला टिळा लावून फुले, दुर्वा व गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. मग धूप-दीप लावून आरती करावी.
ॐ भूर्भुव: स्व: रिद्धि सिद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नम:
  • मंत्र म्हणत मानसिक नमस्कार करावा. आता श्रीविष्णूंसहित लक्ष्मीमातेचे अशा प्रकारे ध्यान करावे :

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी ।
हरिप्रिये महादेवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते ॥
नमस्तेऽस्तु महामाये सर्वस्यार्तिहरे देवि ।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते ॥
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे ॥

  • अर्थ : ‘हे सिद्धी- बुद्धी प्रदात्री, भुक्ती- मुक्ती दात्री, विष्णुप्रिया महादेवी महालक्ष्मी ! तुला नमस्कार असो. हे सर्वदुःखहारी महादेवी, महामाया ! तुला नमस्कार असो. शंख-चक्र-गदाधारी महालक्ष्मी ! तुला नमस्कार असो. ज्यांच्या स्मरणमात्राने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो, त्या सर्वसमर्थ श्रीविष्णूंना नमस्कार असो.’
  • लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम : यानंतर थाळीत लक्ष्मीदेवीची मूर्ती किंवा चांदीचे श्रीयंत्र अथवा चांदीचे नाणे ठेवून श्रीनारायणासह लक्ष्मीदेवीचे ध्यान व पुढील मंत्राचे उच्चारण करीत त्यांना स्नान घालावे :

गंगा सरस्वति रेवा पयोषणी नर्मदा जलै: ।
स्नापितोऽसि महादेवी ह्यत: शांतिं प्रयच्छमे ।।

  • दिवाळी लक्ष्मीपूजन मांडणी : मग लक्ष्मीदेवीची मूर्ती अथवा श्रीयंत्र तांदळाच्या अष्टदल कमळावर स्थापित करावे.

श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा ।

  • मंत्राचा जप करीत कुंकवाचा टिळा लावावा, लक्ष्मीनारायणाला कांकण बांधावे, हार घालावा, कर्पूर- आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. विड्याच्या पानावर सुपारी, वेलची, लवंग वगैरे ठेवून ते पान लक्ष्मीनारायणास अर्पण करावे. फळे व दक्षिणासुद्धा याच मंत्रोच्चारणासह अर्पण करावी.
  • आता पुढील मंत्राचे उच्चारण करीत क्षमा-याचना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम् ।
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरि ॥

  • यानंतर पुढील मंत्राची 1 माळ करावी.

ॐ नमो भाग्यलक्ष्म्यै च विद्महे ।
अष्टलक्ष्म्यै च धीमहि ।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।

  • आता ओंजळीत जल घेऊन संकल्प करावा की ‘भगवंत व गुरूंची भक्ती लाभावी या उद्देशाने तसेच सत्कर्मांच्या सिद्धीसाठी आम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा व जप केला आहे, ते सर्व परमात्मचरणी अर्पण करीत आहोत.’ मग आरती करून

ॐ तं नमामि हरिं परम्

  • मंत्राचे तीनदा उच्चारण करावे.
  • जेथे लक्ष्मीपूजन केले जाते, तेथे कलश पूजा अवश्य करावी.

कलश पूजेचा विधी :

  • पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशाला हळदी-कुंकू लावलेले कच्चे सूत बांधून त्यावर पिंपळाची पाच पाने व एक नारळ ठेवावे. पुढील मंत्रोच्चारण करून सर्व तीर्थनद्यांचे आवाहन करावे.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥

  • नंतर श्रीसूर्यनारायणाला प्रार्थना करावी की या कलशाला तीर्थत्व प्रदान करावे :

ब्रह्माण्डो कर तीर्थानि करे स्पृष्टानि ते रवै ।
तेन सत्येन मे देव तीर्थं देहि दिवाकर ॥

  • यानंतर त्या कलशाला चोहीकडून टिळा लावावा. नारळालाही टिळा व अक्षता लावून जमिनीवर कुंकवाचे स्वस्तिक बनवावे. त्यावर कलशाची स्थापना करावी. मग श्रीविष्णूंना प्रार्थना करावी की ‘पाण्याने भरलेल्या कलशाच्या रूपात आपण विद्यमान आहात. आपल्या कृपेने आमच्या कुटुंबात शांती व सात्त्विक लक्ष्मीची वृद्धी होवो.’ मग हातात फुले घेऊन पुढील मंत्रोच्चारणासह सरस्वती मातेचे मानसिक ध्यान करून श्वेत आसनावर अर्पण करावी.

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम् ।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ॥

  • अर्थ : ‘जी श्वेत वर्णाची आहे, जी ब्रह्मविचाराचे परम तत्त्व आहे, जी संपूर्ण सृष्टीत व्याप्त आहे, जी वीणा व पुस्तकधारिणी आहे, जी अभयदान देऊन अज्ञानांधकाराचा नाश करते, जी हाती स्फटिक माळ धारण करते, जी कमलासनावर विराजमान असून बुद्धिदायी आहे, त्या आद्य परमेश्वरी भगवती सरस्वती मातेला माझा नमस्कार असो. ‘ मग

ॐ कुबेराय नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत कुबेराचे ध्यान करावे आणि आपल्या दागिन्यांवर, तिजोरीत हळद, दक्षिणा, दुर्वा इ. ठेवावे.
    ॥ ॐ शुभमस्तु ॥
    – लोक कल्याण सेतू, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2005