Bhagavad Gita Chapter 9 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 9 in Marathi PDF Download

नववा अध्याय : राजविद्याराजगुह्ययोग [Chapter 9 With meaning in Marathi]

  • सातव्या अध्यायाच्या आरंभी भगवान श्रीकृष्णांनी विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार त्या विषयाचे वर्णन करून शेवटी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञासह भगवंताला जाणण्याचे आणि अंतकाळी भगवंताच्या चिंतनाचे वर्णन केले. नंतर आठव्या अध्यायात विषय समजावून सांगण्यासाठी अर्जुनाने सात प्रश्न विचारले. त्यांच्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे तर भगवंताने तिसऱ्या व चौथ्या श्लोकात संक्षेपात दिली आहेत परंतु सातव्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ज्या उपदेशाचा आरंभ केला, त्यातच आठवा अध्याय पूर्ण झाला. अशा प्रकारे सातव्या अध्यायात आरंभिलेल्या विज्ञानासह ज्ञानाचे सांगोपांग वर्णन न होऊ शकल्याने त्याविषयी व्यवस्थित समजाविण्यासाठी ते नवव्या अध्यायाचा आरंभ करतात. सातव्या अध्यायात वर्णिलेल्या उपदेशाशी याचा घनिष्ठ संबंध सांगण्यासाठी पहिल्या श्लोकात पुन्हा त्याच विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात.

।। अथ नवमोऽध्याय: ।।

  • श्रीभगवानुवाच :

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ।।1।।

  • श्रीभगवान म्हणाले : हे अर्जुन ! तुझ्यासारख्या दोषदृष्टिरहित भक्तासाठी मी या अत्यंत गोपनीय ज्ञानाचे रहस्योद्घाटन करतो, जे जाणून घेतल्यावर तू दु:खरूप भवबंधनातून मुक्त होशील.

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ।।2।।

  • हे विज्ञानसहित ज्ञान सर्व विद्यांचा आणि सर्व गूढ गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अति उत्तम, प्रत्यक्ष फळ (आत्मज्ञान) देणारे, धर्मयुक्त, आचरण करण्यास अत्यंत सोपे व अविनाशी आहे.

अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ।।3।।

  • हे परंतप ! या तत्त्वज्ञानरूप धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप भवचक्रातच भ्रमण करीत असतात.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ।।4।।

  • मज अव्यक्तस्वरूप सच्चिदानंदघन परमात्म्याद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे आणि सर्व जीव माझ्या ठायी संकल्पाच्या आधाराने स्थित आहेत, परंतु वास्तविक मी त्यांच्यामध्ये स्थित नाही.

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावन: ।।5।।

  • ते सर्व जीव माझ्यात स्थित नाहीत परंतु माझी ईश्वरीय योगमाया आणि माझा प्रभाव तर पहा की सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा आणि सर्व जीवांना उत्पन्न करणारा माझा आत्मा वास्तविकपणे त्या जीवांमध्ये स्थित नाही.

यथाकाशस्थितो नित्यं वायु: सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ।।6।।

  • जसे आकाशापासून उत्पन्न झालेला व सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशातच स्थित असतो, तसेच माझ्या संकल्पाद्वारे उत्पन्न झाल्याने सर्व जीव माझ्यातच स्थित आहेत, असे जाण.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ।।7।।

  • हे कौंतेय ! कल्पाच्या अंती सर्व जीव माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात अर्थात् प्रकृतीत लय पावतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मीच त्यांना पुन्हा उत्पन्न करतो.

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुन: पुन: ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ।।8।।

  • मी आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाने वशीभूत होऊन परतंत्र झालेल्या या संपूर्ण प्राणिसमुदायाला त्यांच्या कर्मांनुसार पुन:पुन्हा उत्पन्न करतो.

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ।।9।।

  • हे धनंजय ! त्या कर्मांमध्ये आसक्तिरहित व उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक ठरत नाहीत.

मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ।।10।।

  • हे अर्जुन ! मज अधिष्ठात्याच्या सान्निध्याने ही प्रकृती अर्थात् माझी माया चराचर (चर व अचर) जगाची उत्पत्ती करते आणि या कारणानेच हे संसारचक्र फिरत आहे.

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ।।11।।

  • माझा परम भाव न जाणणारे अज्ञानी लोक मनुष्यदेह धारण करणाऱ्या मज सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात् आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपाने व्यवहार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य मानतात.

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ।।12।।

  • ज्यांच्या आशा व्यर्थ, ज्यांची कर्मे व्यर्थ व ज्यांचे सर्व ज्ञान व्यर्थ असते, अशा अस्थिर चित्ताच्या अज्ञानी लोकांनी राक्षसी, आसुरी व मोहिनी प्रकृतीला धारण केलेले असते.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ।।13।।

  • परंतु हे पार्थ ! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले जे महात्मे आहेत, ते मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी, अक्षरस्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भजतात.

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ।।14।।

  • ते दृढनिश्चयी भक्तजन नेहमी माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. ते मला वारंवार नमस्कार करीत सदैव माझ्या ध्यानात तन्मय होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात.

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ।।15।।

  • काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्मची ज्ञानयज्ञाद्वारे अभिन्न भावाने पूजा करूनही माझी उपासना करतात आणि दुसरे मनुष्य नाना प्रकारांनी स्थित मज विराटस्वरूप परमेश्वराची पृथक् भावाने उपासना करतात.

अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ।।16।।

  • श्रौतकर्म मी आहे, यज्ञ मी आहे, स्वधा अर्थात पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे, औषधी अर्थात् सर्व वनस्पती मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनरूप क्रियासुद्धा मीच आहे.

पिताहमस्य जगतो माता धाता पितामह: ।
वेद्यं पवित्रमोंकार ॠक्साम यजुरेव च ।।17।।

  • मीच या संपूर्ण जगाचा धारण-पोषणकर्ता व कर्मांचे फळ देणारा तसेच पिता, माता व पितामह आहे. मीच जाणण्यायोग्य, पवित्र ओमकार तसेच ॠग्वेद, सामवेद व यजुर्वेदही मीच आहे.

गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् ।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ।।18।।

  • मीच प्राप्त होण्यायोग्य परम धाम, सर्वांचा भरण-पोषणकर्ता व स्वामी, शुभ-अशुभांना पाहणारा साक्षी, सर्वांचे निवासस्थान, शरण घेण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा मित्र आहे. सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचा कारण, स्थितीचा आधार, निधान (प्रलयकाळी सर्व जीव सूक्ष्मरूपाने ज्यात लय पावतात तो) आणि अविनाशी कारण अर्थात् बीजसुद्धा मीच आहे.

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ।।19।।

  • मीच सूर्यरूप बनून तापतो आणि पाणी शोषून घेतो. नंतर मीच इंद्ररूपाने त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुन ! मीच अमृत आणि मृत्यू आहे तसेच सत् व असत् सुद्धा मीच आहे.

त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम्-
अश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ।।20।।

  • तिन्ही वेदांमध्ये सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरसाचे पान करणारे, पापांपासून शुद्ध झालेले पुरुष यज्ञांद्वारे अप्रत्यक्षपणे माझीच पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते आपल्या पुण्यांच्या फळरूपात स्वर्गात जातात आणि तेथे देवांचे दिव्य भोग भोगतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ।।21।।

  • स्वर्गातील अमर्याद विषयसुखाचा उपभोग घेऊन पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्युलोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गाचे साधनरूप असलेल्या तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांचे आचरण करणारे आणि भोगांची कामना करणारे पुरुष वारंवार जन्म-मृत्यूच्या चक्रात पडतात; अर्थात् पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य क्षीण होताच मृत्युलोकी येतात.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।22।।

  • जे अनन्य प्रेमी भक्तजन मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्कामभावाने मला भजतात, त्या नित्य ऐक्यभावाने माझ्या ठायी स्थित झालेल्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वत: वाहतो (चालवितो).

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ।।23।।

  • हे कौंतेय ! जरी श्रद्धेने युक्त होऊन सकाम भक्त दुसऱ्या देवतांची पूजा करतात, तरी तेसुद्धा माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ती उपासना अविधिपूर्वक अर्थात् अज्ञानयुक्त आहे.

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ।।24।।

  • कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीसुद्धा मीच आहे. परंतु ते मज अधियज्ञस्वरूप परमेश्वराला तत्त्वत: जाणत नाहीत म्हणून च्युत होतात अर्थात् पुनर्जन्म पावतात.

यान्ति देवव्रता देवान्पितृृन्यान्ति पितृव्रता: ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्तिमद्याजिनोऽपि माम् ।।25।।

  • देवतांची पूजा करणारे मृत्यूनंतर देवांना प्राप्त होतात. पितरांची पूजा करणारे पितरांकडे जातात. भूतप्रेतांची उपासना करणारे भूतयोनीत जातात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: ।।26।।

  • जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, जल वगैरे अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताचे प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्रपुष्पादिक मी सगुणरूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रेमाने ग्रहण करतो.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।27।।

  • हे कौंतेय ! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे यज्ञ करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मलाच अर्पण कर.

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ।।28।।

  • असे केले असता शुभाशुभ फळ देणाऱ्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. ही कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्या संन्यासाची सोपी युक्ती (संन्यासयोग) तुला सांगितली आहे. या युक्तीने तू कर्मबंधनातून सुटून अनायास मलाच प्राप्त होशील.

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ।।29।।

  • मी सर्व भूतांच्या ठायी समभावाने व्यापक आहे. मला कोणीही अप्रिय अथवा प्रिय नाही; परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मीसुद्धा त्यांच्यात प्रत्यक्ष प्रगट आहे.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स: ।।30।।

  • जर एखादा अतिशय दुराचारीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त बनून मला भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे. कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे अर्थात् त्याने असा दृढ निश्चय केलेला असतो की परमेश्वराच्या भजनासमान दुसरे काहीही नाही.

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । 
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ।।31।।

  • तो लवकरच धर्मात्मा (सदाचारी) बनतो आणि त्याला शाश्वत परम शांती लाभते. हे कौंतेय ! तू निश्चयपूर्वक हे सत्य जाणून घे की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ।।32।।

  • हे पार्थ ! जे माझा आश्रय घेतात, ज्यांचा माझ्या ठायी सर्वस्वी दृढ भाव आहे, मग ते जरी पापयोनीत जन्मलेले असले अथवा स्त्री, वैश्य, शूद्र असले तरी परमगतीस अर्थात् मलाच प्राप्त होतात.

किं पुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ।।33।।

  • तर मग यात काय सांगावयाचे की पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी भक्तजन मला शरण येऊन परम गतीस प्राप्त होतात. म्हणून तू सुखरहित व क्षणभंगुर अशा या मनुष्य शरीराला प्राप्त झाला असल्याने निरंतर माझेच भजन कर.

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ।।34।।

  • सदैव माझे स्मरण कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रितीने आत्म्याला माझ्यात स्थित करून, मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्याय: ।।9।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘राजविद्याराजगुह्ययोग’ नामक नववा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 9 मराठी