तुळशी विवाह
- दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त तुम्ही लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की ‘माते ! जे आपणास प्रिय आहे तेच आम्हालाही प्रिय होवो’ आणि लक्ष्मी मातेला तर भगवान नारायणच प्रिय आहेत. जेव्हा ते परमात्मा तुमचे प्रिय होतील तेव्हा लक्ष्मी मातासुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहीलच ! तुमच्या तर दोन्ही हाती लाडू !!
- प्राचीन काळी जालंधर नामक एक महापराक्रमी आणि महाउपद्रवी राक्षस होऊन गेला. त्याला वृंदा नावाची एक अत्यंत सुंदर आणि परम साध्वी पत्नी होती. वृंदाची निष्ठा होती की ‘जेव्हा माझे पातिव्रत्य अटळ आहे तेव्हा माझ्या पतीच्या केसाला कोण धक्का लावू शकेल ?’ झालेही तसेच. जालंधर वृंदाच्या पातिव्रत्य-बलाने अजिंक्य झाला. तो मनमुखी आचरण करून लोकांना त्रास देऊ लागला. यामुळे दैवी वृत्तीचे लोक दु:खी झाले आणि श्रीहरींचा धावा करू लागले.
- जालंधरने देवलोकावर आक्रमण करून इंद्राशी युद्ध सुरू केले. श्रीविष्णूंना कळून चुकले की जालंधरची ही अजिंक्यता वृंदाच्या पातिव्रत्याचाच प्रभाव आहे. व्रताने निष्ठा येते आणि निष्ठेचा संकल्प जालंधरच्या पाठीशी राहून त्याचे रक्षण करीत आहे. जोपर्यंत वृंदाचे सतीत्व खंडित होत नाही तोपर्यंत हा पापमूर्ती मरणार नाही आणि जोपर्यंत हा मरणार नाही तोपर्यंत समाजाचे दु:ख दूर होणार नाही.
- भगवंताने आपल्या धारणाशक्तीने जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाकडे गेले. आपला पतीच युद्धाहून परत आला आहे असे समजून तिने श्रीविष्णूंना स्पर्श केला. यामुळे तिचे पातिव्रत्य खंडित झाले आणि तिकडे युद्धात जालंधर मारला गेला. जेव्हा वृंदाला ही गोष्ट समजली तेव्हा तिने श्रीविष्णूंना शाप दिला की “तुम्ही माझ्याशी कपट केले आहे. तुमचे हृदय पाषाणवत आहे, म्हणून जा, तुम्ही पाषाण व्हा.”
- श्रीविष्णू वृंदाच्या पातिव्रत्याचा आदर करीत म्हणाले : “मी शालीग्रामच्या रूपात पाषाण होईन आणि तुझे हे शरीर, जे तू सोडून देशील, ते नदीच्या रूपात परिवर्तीत होईल. ती नदी ‘गंडकी’ या नावाने सुप्रसिद्ध होईल. तू तुळशी देवीच्या रूपात माझ्या सोबतच राहशील. तुझ्या केसांपासून उत्पन्न तुळशीच्या पानांशिवाय माझी पूजा अपूर्ण मानली जाईल. तुझ्या व्रताचा, तुझ्या निष्ठेचा आदर होईल. वृंदा ! तू जालंधरच्या दुष्कृत्यांचे कवच बनण्याची चूक केली होती. म्हणून जसे काटा काट्याने निघतो, तसेच बहुजनहिताय- बहुजनसुखायसाठी मला हे करावे लागले, कारण जेव्हा सत्य असत्याचा रक्षक बनतो तेव्हा असत्याचा नाश कठीण होतो.
- वृंदा ! तुझे सतीत्व जालंधरच्या असत्याचे पोषण करीत होते, पापाचे पोषण करीत होते आणि कोणत्याही उपायाने त्याचा मृत्यू होत नव्हता. त्याला मारण्याचा केवळ एकच उपाय होता आणि तो हा की तुझे सतीत्व खंडित व्हावे. तरीही संपूर्ण विश्व तुझ्या सतीत्वाचा आदर करेल. मी माझ्या एका अंशाने शालीग्राम होईन आणि गंडकी नदीकाठी वास्तव्य करीन. माझी पूजा करणारे दरवर्षी आपल्या दोघांचा विवाह करतील. फळस्वरूप त्यांना महापुण्य मिळेल.” भगवंताचे हे वचन ऐकून वृंदा संतुष्ट झाली.
- तेव्हापासून कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत ‘तुळशी विवाह’ केला जातो.
- पातिव्रत्य धर्मसुद्धा सत्याच्या प्राप्तीसाठी आहे. सर्व व्रत आणि नियमांचे फळ आहे ईश्वरप्राप्ती, सत्याची प्राप्ती, आत्मरसाची प्राप्ती. आपल्याला एखादा नियम किंवा व्रत योग्य वाटले की ‘हे बरोबर आहे, ठीक आहे’ मग त्यात दृढतेने संलग्न व्हावे, यालाच व्रत म्हणतात. व्रताचे फळ असते निष्ठा. आपली निष्ठा दृढ असेल तर कोणतीही विघ्न-बाधा किंवा समस्या आपल्या संकल्पबळाने दूर होईल.
-
– ऋषी प्रसाद, नोव्हेंबर 2004
जीवनात कोणते ना कोणते व्रत असावे, नियम असावा. यामुळे मनोबळ दृढ होईल.