Skip to content
Bhagavad Gita Chapter 8 in Marathi PDF Download

Bhagavad Gita Chapter 8 in Marathi PDF Download

आठवा अध्याय : अक्षरब्रह्मयोग [Chapter 8 With meaning in Marathi]

  • सातव्या अध्यायाच्या पहिल्या ते तिसऱ्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्यस्वरूपाचे तत्त्व ऐकण्यासाठी सावध करून ते सांगण्याची प्रतिज्ञा केली. नंतर ते जाणणाऱ्यांची प्रशंसा करून 27व्या श्लोकापर्यंत ते तत्त्व नाना प्रकारे समजाविले आणि अखेरिस ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांच्यासह भगवंताचे समग्र स्वरूप जाणणाèया भक्तांचा महिमा सांगून तो अध्याय समाप्त केला. परंतु ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या सहा गोष्टींचे व मरणकाळी भगवंताला जाणण्याचे रहस्य समजले नाही, म्हणून अर्जुन विचारतो.

।। अथाष्टमोऽध्याय: ।।

  • अर्जुन उवाच :

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ।।1।।

  • अर्जुन म्हणाला : हे पुरुषोत्तम ! ज्याचे तुम्ही वर्णन केले ते ब्रह्म काय आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत नावाने काय सांगितले जाते आणि अधिदैव कशाला म्हणतात ?

अधियज्ञ: कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभि: ।।2।।

  • हे मधुसूदन ! येथे अधियज्ञ कोण आहे आणि या देहात तो कसा निवास करतो ? युक्तचित्ताचा पुरुष अंतकाळी तुम्हाला कसे जाणू शकतो ?
  • श्रीभगवानुवाच :

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ।।3।।

  • श्रीभगवान म्हणाले : परम अक्षर अर्थात् ज्याचा कधीच नाश होत नाही असा सच्चिदानंदघन परमात्मा ‘ब्रह्म’ आहे आणि त्याची जी सहज स्वरूपस्थिती आहे तिला ‘अध्यात्म’ असे म्हणतात. प्राणिमात्रांच्या भावांना उत्पन्न करणारा जो शास्त्रविहित त्याग आहे, त्याला ‘कर्म’ असे नाव आहे.

अधिभूतं क्षरो भाव: पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ।।4।।

  • उत्पत्ती व विनाशशील धर्माचे सर्व पदार्थ ‘अधिभूत’ आहेत. ज्याला जीव या नावाने संबोधतात, तो या पंचभूतात्मक देहातील ‘अधिदैव’ समजावा आणि हे नरश्रेष्ठ ! या देहात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने ‘अधियज्ञ’ आहे.

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।5।।

  • जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीर सोडतो, तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।6।।

  • हे कौंतेय ! अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीर सोडतो, त्या त्या भावालाच तो प्राप्त होतो. कारण मनुष्य सदैव ज्या भावाचे (अर्थात् गोष्टीचे) चिंतन करीत असतो, अंतकाळीही बहुधा त्याचेच स्मरण त्याला होत असते.

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।7।।

  • म्हणून हे अर्जुन ! तू नेहमी माझेच स्मरण कर आणि युद्धरूपी स्वधर्मदेखील कर. तू आपली मन-बुद्धी माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर नि:संदेह मलाच प्राप्त होशील.

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।8।।

  • हे पार्थ ! हा नियम आहे की भगवद्ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर माझे चिंतन करणारा पुरुष परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात् मज परमेश्वरालाच प्राप्त होतो.

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तात् ।।9।।
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रूवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।10।।

  • जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहूनही अति सूक्ष्म, सर्वांचे धारण-पोषण करणारा, अचिंत्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप, अविद्येच्या अगदी पलीकडील अशा शुद्ध परब्रह्म परमात्म्याचे स्मरण करीत असतो; तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीदेखील योगबळाने भृकुटीच्या मध्यभागी प्राणाला चांगल्या रितीने स्थापन करून निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यस्वरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो.

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।11।।

  • वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनरूप परम पदाला अक्षर (अविनाशी) म्हणतात, आसक्तिरहित प्रयत्नशील संन्यासी महात्मा ज्यात प्रवेश करतात आणि ज्या परम पदाचे इच्छुक ब्रह्मचर्याचे आचरण करतात, त्या परम पदाविषयी आता तुला थोडक्यात सांगतो.

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।12।।
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।13।।

  • सर्व इंद्रियांच्या द्वारांना संयमित करून व मनाला हृदयात स्थिर करून, मग त्या जिंकलेल्या मनाद्वारे प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थित होऊन जो पुरुष ‘ॐ’ या एक अक्षररूप ब्रह्मचे उच्चारण करीत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्मचे चिंतन करीत देहाचा त्याग करतो, तो पुरुष परम गतीस प्राप्त होतो.

अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।
तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।14।।

  • हे पार्थ ! जो माझ्या ठायी अनन्य चित्ताने स्थित होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे अखंड स्मरण करतो, त्या नित्य-निरंतर माझ्याशी एकरूप झालेल्या योग्याला मी सुलभ आहे अर्थात् त्याला मी सहजच प्राप्त होतो.

मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।
नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।15।।

  • परम सिद्धी पावलेल्या महात्म्यांना माझी प्राप्ती झाल्यावर दु:खांचे माहेरघर असलेले विनाशी शरीर पुन्हा प्राप्त होत नाही.

आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।16।।

  • हे अर्जुन ! ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत अर्थात् त्यांची प्राप्ती झाली तरी पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत. परंतु हे कौंतेय ! मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. कारण मी कालातीत आहे आणि हे ब्रह्मादिकांचे सर्व लोक काळाद्वारे सीमित असल्याने अनित्य आहेत.

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।
रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।17।।

  • ब्रह्मदेवाचा जो एक दिवस आहे, तो एक हजार चतुर्युगांचा कालावधी आहे आणि रात्रदेखील एक हजार चतुर्युगांच्या कालावधीची असते. याला जे पुरुष तत्त्वत: जाणतात, ते योगिजन काळाचे तत्त्व जाणणारे आहेत.

अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।18।।

  • आसर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच पुन्हा अव्यक्त नामक ब्रह्मदेवाच्या शरीरातच लीन होतो.

भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।19।।

  • हे पार्थ ! तोच हा भूतसमुदाय (जीव) उत्पन्न होऊन प्रकृतिवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो.

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।
य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।20।।

  • परंतु त्या अव्यक्ताहून अति पलीकडचा दुसरा अर्थात् विलक्षण असा जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही.

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।21।।

  • जो अव्यक्त ‘अक्षर’ या नावाने संबोधला जातो, त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परम गती म्हणतात तसेच ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता जीवाचा पुनर्जन्म होत नाही, तेच माझे परम धाम होय.

पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।22।।

  • हे पार्थ ! ज्या परमात्म्यात सर्व भूतसमुदाय वास्तव्य करतो आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे, तो सनातन अव्यक्त परम पुरुष तर अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो.

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।23।।

  • हे भरतश्रेष्ठ ! ज्या काळात शरीराचा त्याग करून गेलेले योगिजन परत न येणाऱ्या गतीला तसेच ज्या काळात गेलेले परत येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, ते दोन्ही काळ अर्थात् दोन्ही मार्ग मी तुला सांगतो.
अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।24।।
  • ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीचा अधिपती देव आहे, दिवसाचा अधिपती देव आहे तसेच शुक्लपक्षाचा अधिपती देव आहे आणि उत्तरायणच्या सहा महिन्यांचा अधिपती देव आहे, त्या मार्गांत मृत्यू होऊन गेलेले ब्रह्मवेत्ते योगिजन वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन ब्रह्मला प्राप्त होतात.

धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।25।।

  • ज्या मार्गात धूम्राचा अधिपती देव आहे, रात्रीचा अधिपती देव आहे तसेच कृष्णपक्षाचा अधिपती देव आहे आणि दक्षिणायनच्या सहा महिन्यांचा अधिपती देव आहे, त्या मार्गांत मृत्यू होऊन गेलेले सकाम कर्मयोगी वरील देवांद्वारे क्रमाने नेले जाऊन चंद्रज्योतीस प्राप्त होतात आणि स्वर्गात आपल्या शुभकर्मांचे फळ भोगून परत इहलोकी येतात.

शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।26।।

  • जगातील हे दोन प्रकारचे – शुक्ल व कृष्ण अर्थात् देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यांपैकी एका मार्गाने गेलेला – ज्यामुळे परत यावे लागत नाही, त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो अर्थात् जन्म-मृत्यूला प्राप्त होतो.

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।27।।

  • हे पार्थ ! याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्त्वत: जाणले असता कोणताही योगी मोहित होत नाही. म्हणून हे अर्जुन ! तू सर्वकाळी समत्वबुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात् निरंतर माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो.

वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।28।।

  • योगी पुरुष या रहस्याला तत्त्वत: जाणून वेदाध्ययन, होम-हवन, तपश्चर्या, दानधर्म यांचे जे पुण्यफळ शास्त्रांनी सांगितले आहे, त्या सर्वांचे नि:संशय उल्लंघन करून जातो आणि सनातन परम पदास प्राप्त होतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्याय: ।।1।।

अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘अक्षरब्रह्मयोग’ नामक आठवा अध्याय संपूर्ण झाला.

Free Download भगवत गीता अध्याय 8 मराठी

इतरांना शेयर करा...

थोडक्यात - हेही वाचा

नियमित महत्वाची माहिती हवी आहे ?

Must Read

सर्वाधिक वाचलेले

आमच्याशी जुडा

पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा