Skip to content
Milarepa Information, Mahiti, Charitra, Quotes in Marathi

Milarepa Information, Mahiti, Charitra, Quotes in Marathi

Milarepa Information, Mahiti, Quotes in Marathi

  • तिबेटमध्ये अंदाजे 850 वर्षापूर्वी एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले मिलारेपा. वयाच्या सातव्या वर्षीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. काका आणि आत्याने त्यांची सर्व संपत्ती हडप केली. लहान बहीण आणि मातेसह मिलारेपाला खूप दुःख सहन करावे लागले. स्वतःची संपत्ती परत मिळविण्यासाठी त्याच्या आईने खूप प्रयत्न केले, परंतु त्याचे काका व आत्यापुढे तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. तिच्या मनातून कोणत्याही प्रकारे त्या गोष्टीचे दुःख जात नव्हते.
  • एकदा असे झाले. त्यावेळी मिलारेपा जवळ जवळ 15 वर्षाचा होता. तो गुणगुणत घरी आला. गाण्याचा आवाज ऐकून त्याची आई एका हातात काठी व दुसऱ्या हातात राख घेऊन बाहेर आली आणि त्याच्या तोंडावर राख फेकून त्याला काठीने मारत म्हणाली : “कसा कुपुत्र जन्मला आहेस तू ! तुझ्या वडिलांच्या नावाला कलंक लावलास.”
  • त्याला मारता मारता ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर पुन्हा शिव्यांचा भडीमार करीत मिलारेपाला म्हणाली : “धिक्कार आहे तुझा ! शत्रूंचा सूड घ्यायचा विसरून गाणे शिकतोस काय ? शिकायचेच असेल तर असे काही शिक की ज्यामुळे त्यांचे कुळ नष्ट होईल.”
  • बस… मिलारेपाच्या हृदयावर आघात झाला. घर सोडून त्याने तंत्रविद्या शिकविणाऱ्या गुरूंना शोधले आणि संपूर्ण निष्ठा व भावपूर्वक सेवा करून त्यांना प्रसन्न केले. त्यांच्याकडून शत्रूंना नष्ट करण्याची आणि हिमवर्षा करण्याची विद्या शिकला. त्याचा प्रयोग करून त्याने त्याच्या काका व आत्याची शेती नष्ट करून त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारले. काका व आत्याला त्याने जिवंतच ठेवले, जेणेकरून त्यांनी दुःख भोगून तडफडत मरावे. यामुळे लोक मिलारेपाला खूप घाबरू लागले.
  • काळ लोटला. मिलारेपाच्या हृदयाची आग शांत झाली. आता त्याला सूड घेण्याच्या वृत्तीचा पश्चात्ताप होऊ लागला. त्यादरम्यान त्याची एका लामा साधूशी भेट झाली. त्याने सल्ला दिला की : “तुला जर विद्याच शिकायची असेल तर फक्त योगविद्याच शिक. भारतातून ही योगविद्या शिकून आलेले एकमेव गुरू आहेत मारपा.”
  • योगविद्या जाणणाऱ्या गुरूंविषयी ऐकताच त्याचे मन त्यांच्या दर्शनासाठी अधीर झाले. मिलारेपात तर तत्परता होती, त्याचबरोबर दृढतादेखील होती आणि तंत्रविद्या शिकून त्याने गुरूंप्रती निष्ठादेखील सिद्ध करून दाखविली होती. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याबाबत तो दृढनिश्चयी होता. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो तर निघाला मारपांना भेटण्यासाठी.
  • मार्ग विचारत विचारत, निराश न होता मिलारेपा पुढे पुढे चालत राहिला. रस्त्यात एका गावाजवळील शेतात एका शेतकऱ्याला पाहिले, त्याच्याजवळ जाऊन मारपांविषयी विचारले. शेतकरी म्हणाला : “माझ्या शेतात तू काम केलेस तर मी तुला मारपांकडे घेऊन जाईन.’
  • मिलारेपा उत्साहाने सहमत झाला. थोड्या दिवसांनी शेतकऱ्याने रहस्य सांगितले की ते स्वतःच मारपा आहेत.
  • मिलारेपाने गुरुदेवांना भक्तिभावाने नमन केले आणि स्वतःची पूर्वकहाणी सांगितली. त्याने आपल्या हातून घडलेल्या मानव-संहाराविषयी सांगितले. सूड घेण्याच्या भावनेने केलेल्या पापांविषयी सांगून पश्चात्ताप व्यक्त केला. मिलारेपाच्या निखालस स्वभावामुळे गुरूचे हृदय प्रसन्न झाले, परंतु त्यांनी स्वतःची प्रसन्नता दाखविली नाही, गुप्तच ठेवली. आता मिलारेपाची परीक्षा घेणे सुरू झाले. गुरुविषयी स्नेह, श्रद्धा, निष्ठा व दृढतेच्या कसोट्या सुरू झाल्या.
  • गुरु मारपा मिलारेपाशी अत्यंत कठोर व्यवहार करीत असत, जणूकाही त्यांना दया काय असते हे माहीतच नव्हते. परंतु मिलारेपाची गुरुभक्ती दृढ होती. तो गुरूंनी सांगितलेले प्रत्येक कार्य अत्यंत तत्परतेने व निष्ठेने करू लागला.
  • काही महिने व्यतीत झाले, तरीही गुरूंनी मिलारेपाला थोडेसुद्धा ज्ञान दिले नाही. त्याने अत्यंत नम्रतेने गुरुजींना ज्ञानासाठी प्रार्थना केली. गुरुजी क्रोधित झाले: “मी माझे सर्वस्व देऊन भारतातून ही योगविद्या शिकून आलो आहे. ही तुझ्यासारख्या दुष्टासाठी आहे काय ? तू जे पाप केले आहेस ते भस्म होऊन गेले तरच मी तुला ही योगविद्या शिकवीन. तू जी शेती नष्ट केली आहेस ती त्यांना परत दे, ज्यांची तू हत्या केली आहेस त्या सर्वांना जिवंत कर…’
  • हे ऐकून मिलारेपा खूप रडला. तरीही त्याने हिंमत सोडली नाही, गुरूंची शरण सोडली नाही. काही दिवस गेले. एके दिवशी मारपा मिलारेपाला म्हणाले : “माझ्या मुलासाठी एक पूर्वमुखी गोलाकार घर बांधून दे; परंतु लक्षात ठेव की ते घर बांधण्यात तू कोणाचीही मदत घेणार नाहीस. घरासाठी लागणारी लाकडेसुद्धा तुलाच तोडावी लागतील, आणावी लागतील आणि घरात जोडावी लागतील.”
  • मिलारेपाला आनंद झाला की ‘चला, गुरुजींच्या सेवेची संधी तर मिळत आहे ना !’ त्याने अत्यंत उत्साहाने कार्य सुरू केले. तो स्वतःच लाकडे तोडत असे आणि ती लाकडे व मोठमोठे दगड स्वतःच्या पाठीवर घेऊन येत असे. स्वतःच दूरवरून पाणी घेऊन येत असे. कोणाचीही मदत घेण्याची मनाई होती ना ! गुरूंच्या आज्ञापालनात तो पक्का होता. घराचे अर्धे काम तर झाले.
  • एके दिवशी गुरुजी घर पहायला आले. ते रागात म्हणाले : “अरेरे! असे घर चालणार नाही. हे घर पाडून टाक आणि याद राख, ज्या वस्तू जेथून घेऊन आला आहेस त्या तेथेच ठेव.”
  • मिलारेपाने कोणतीही तक्रार न करता आज्ञेचे पालन केले. तक्रारीचा ‘त’ सुद्धा तोंडात येऊ दिला नाही. कार्य पूर्ण झाले. मग गुरुजी दुसरी जागा दाखवत म्हणाले : “हं, ही जागा योग्य आहे. येथे पश्चिमेला द्वार असलेले अर्धचंद्राकार घर बांधून दे.”
  • मिलारेपा पुन्हा कामास लागला. खूप परिश्रम केल्यानंतर अर्धे घर तयार झाले. तेव्हा गुरुजी पुन्हा फटकारत म्हणाले : “कसे रे विचित्र वाटते हे ! हे पाडून टाक आणि एक-एक दगड पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी ठेवून ये.”
  • मुळीच न चिडता त्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले. किती विलक्षण होती मिलारेपाची गुरुभक्ती ! थोड्या दिवसांनंतर गुरुजींनी पुन्हा नवीन जागा दाखवत आज्ञा दिली: “येथे त्रिकोणाकार घर बांधून दे.”
  • मिलारेपाने पुन्हा काम सुरू केले. दगड आणता आणता त्याची पाठ आणि खांदे सोलून निघाले तरीही त्याने त्याच्या वेदनेविषयी कोणालाही सांगितले नाही. त्रिकोणाकार घर पूर्ण होण्यास आले, तेव्हा गुरुजी पुन्हा अप्रसन्नता व्यक्त करीत म्हणाले : “हे चांगले वाटत नाही, पाडून टाक आणि सर्व दगड पूर्ववत ठेवून दे.”
  • या स्थितीतही मिलारेपाच्या चेहऱ्यावर असंतोषाची एक रेषही उमटली नाही. प्रसन्न चित्ताने गुरूंची आज्ञा शिरोधार्य करून त्याने सर्व दगड पूर्ववत व्यवस्थित ठेवले.
  • या वेळी एका टेकडीवर जागा दाखवत गुरू म्हणाले : “येथे नऊ खांब असलेले चौकोनाकृती घर बांधून दे.”
  • गुरुजींनी तीन-तीन वेळा घर बांधायला सांगून पाडून टाकले होते. मिलारेपाच्या हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. त्याचे अंग-अंग ठणकत होते, तरीही तो गुरूंना तक्रार करीत नसे की ‘गुरुजी! आपल्या आज्ञेनुसारच तर घर बांधत आहे तरीही आपल्याला ते पसंत पडत नाही. पाडायला सांगता आणि पुन्हा दुसरे बांधायला सांगता. माझे परिश्रम आणि वेळ व्यर्थ जात आहे.’
  • मिलारेपा तर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. जेव्हा अर्धे घर बांधून झाले तेव्हा मारपा पुन्हा म्हणाले “याच्या जवळच बारा खांब असलेले दुसरे घर बांध.” कसेही करून बारा खांब असलेले घर पूर्ण झाले. तेव्हा मिलारेपाने गुरूंना ज्ञान देण्यासाठी प्रार्थना केली.
  • गुरुजींनी मिलारेपाचे केस धरून ओढले आणि लाथ मारून हाकलून देत म्हणाले “फुकटचे ज्ञान घ्यायचे आहे काय ?”
  • दयाळू गुरुमातेला (मारपांची पत्नी) मिलारेपाची ही दशा पाहवली नाही. तिने मारपांना त्याच्यावर दया करण्याची विनंती केली. परंतु मारपांनी कठोरता सोडली नाही.
  • अशा प्रकारे मिलारेपा गुरुर्जीचे दटावणे देखील ऐकून घेत असे, मारसुद्धा सहन करीत असे आणि एकांतात बसून रडत असे, परंतु त्याच्या ज्ञानप्राप्तीच्या जिज्ञासेपुढे या सर्व दुःखांना काहीही महत्त्व नव्हते.
  • एकदा तर गुरूंनी त्याला खूप मारहाण केली. आता मिलारेपाचे धैर्य खचले. बारा बारा वर्षे एकट्यानेच स्वतःच्या हातांनी घरे बांधली तरीही गुरुजींकडून काहीही मिळाले नाही. आता तो थकला आणि खिडकीतून उडी मारून बाहेर पळून गेला.
  • गुरुपत्नी हे सर्व पाहत होती. तिचे हृदय कोमल होते. मिलारेपाच्या सहनशक्तीमुळे तिला त्याच्याबद्दल सहानुभूती होती. ती मिलारेपाकडे गेली आणि त्याची समजूत घालून गुपचूप दुसऱ्या गुरूंकडे पाठवून दिले. त्याच्याबरोबर नकली संदेश पत्रदेखील लिहून दिले की ‘आलेल्या युवकास ज्ञान द्यावे.’ हा दुसरा गुरू मारपांचाच शिष्य होता. त्याने मिलारेपाला एकांत साधनेचा मार्ग शिकविला. तरीही मिलारेपाची प्रगती होऊ शकली नाही. मिलारेपाच्या नवीन गुरूंना वाटले की जरूर काही ना काही भानगड आहे. त्याने मिलारेपाला त्याची भूतकाळची साधना आणि त्याने केलेल्या दुसऱ्या गुरूंविषयी माहिती देण्यास सांगितले. मिलारेपाने सर्व गोष्टी अगदी निखालसपणे सांगितल्या.
  • नवीन गुरू रागवत म्हणाले : “एक गोष्ट लक्षात ठेव, गुरू एक असावेत आणि एकदाच करावेत. हा काही सांसारिक व्यापार नाही की एका ठिकाणी आवडले नाही तर निघाला दुसऱ्या ठिकाणी. आध्यात्मिक मार्गात अशा प्रकारे गुरू बदलणारा धोब्याच्या कुत्र्याप्रमाणे न घरचा न घाटचा राहतो. असे केल्याने गुरुभक्तीचा घात होतो. ज्याची गुरुभक्ती खंडित होते त्याला स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी बराच कालावधी लागतो. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. चल, आपण दोघे जाऊया गुरू मारपांकडे आणि त्यांच्याकडे क्षमा मागूया.” असे म्हणून त्या दुसऱ्या गुरूंनी स्वतःची सर्व संपत्ती आपले गुरू मारपा यांना अर्पण करण्यासाठी सोबत घेतली. फक्त एका लंगड्या शेळीलाच घरी ठेवले.
  • दोघेही मारपांजवळ पोहोचले. शिष्याद्वारे अर्पण केलेल्या सर्व संपत्तीचा मारपांनी स्वीकार केला आणि विचारले: “ती लंगडी शेळी का घेऊन आला नाहीस ?” तेव्हा तो शिष्य तेवढेच अंतर चालून पुन्हा घरी गेला. शेळीला खांद्यावर घेऊन आला आणि ती गुरुजींना अर्पण केली. हे पाहून गुरुजी संतुष्ट झाले. मिलारेपाकडे पाहत म्हणाले : “मिलारेपा ! मला अशी गुरुभक्ती पाहिजे. मला शेळीची आवश्यकता नव्हती, परंतु तुला धडा शिकवायचा होता.”
  • मिलारेपानेदेखील स्वतःजवळ जे काही होते ते गुरुचरणी अर्पण केले. त्याच्याद्वारे अर्पण केलेल्या वस्तू पाहून मारपा म्हणाले : “या सर्व वस्तू तर माझ्या पत्नीच्याच आहेत. दुसऱ्यांच्या वस्तू तू कशा काय भेट देऊ शकतोस ?” असे बोलून त्यांनी मिलारेपाला धमकावले..
  • मिलारेपा पुन्हा अत्यंत हताश झाला. त्याने विचार केला की “माझ्यात काहीतरी कमतरता आहे, ज्यामुळे माझे गुरुदेव माझ्यावर प्रसन्न होत नाहीत ?” त्याने मनोमन भगवंताला प्रार्थना केली आणि निश्चय केला की ‘या जन्मात तर गुरुजी प्रसन्न होतील असे वाटत नाही, म्हणून हे जीवनच गुरुजींच्या चरणी अर्पण केले पाहिजे.’ असा विचार करून तो गुरुजींच्या चरणी प्राणत्याग करण्यास तयार झाला. लगेच मारपांना समजले की: ‘हा, आता शिष्य तयार झाला.’
  • उभे राहून मारपांनी मिलारेपाला मिठी मारली. मारपांच्या अमृतदृष्टीचा मिलारेपावर वर्षाव झाला. स्नेहमय शब्दांत गुरुदेव म्हणाले “मुला! मी तुझ्या ज्या कठीण कसोट्या घेतल्या, त्याच्यामागे कारण होते की तू आवेशात येऊन जी पापे केली होती ती सर्व मला या जन्मातच भस्म करायची होती, तुझ्या अनेक जन्मांची साधना मला या जन्मात फलित करायची होती. तुझ्या गुरूंना ना तुझ्या भेटवस्तूंची आवश्यकता आहे ना घराची तुझ्या कर्माच्या शुद्धीसाठीच ही घर बांधण्याची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण होती, सोने शुद्ध करण्यासाठी तापवावे लागते ना! तू माझाच शिष्य आहेस. माझ्या प्रिय शिष्या! तुझी कसोटी पूर्ण झाली. चल, आता तुझी साधना सुरू करवितो.
  • मिलारेपा रात्रंदिवस डोक्यावर दिवा ठेवून एकाच जागी ध्यानस्थ बसत असे. अशा प्रकारे गुरूंच्या सान्निध्यात त्याने अकरा महिने साधना केली. प्रसन्न झालेल्या गुरूंनी देण्यात काही बाकी ठेवले नाही. मिलारेपाला साधनेच्या दरम्यान असे-असे अनुभव झाले, जे त्याच्या गुरू मारपांनाही झाले नव्हते. शिष्य गुरुपेक्षा सवाई निघाला. शेवटी गुरूंनी त्याला हिमालयाच्या दुर्गम गुहांमध्ये जाऊन ध्यान साधना करण्यास सांगितले.
  • गुरुभक्ती, दृढता आणि गुरूंच्या आशीर्वादाने मिलारेपा तिबेटमध्ये सर्वात मोठा योगी म्हणून प्रसिद्ध झाला. बौद्ध धर्माच्या सर्व शाखा मिलारेपाला मानतात. म्हटले जाते की अनेक देवांनी देखील मिलारेपाचे शिष्यत्व स्वीकारून स्वतःला धन्य मानले आहे. तिबटमध्ये आजदेखील मिलारेपाची भजने व स्तोत्रे घरोघरी गायली जातात.
  • मिलारेपाने खरेच म्हटले आहे : “गुरु ईश्वरीय शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असतात. त्यांच्यात शिष्याची पापे भस्मीभूत करण्याची क्षमता असते.”
  • शिष्याची दृढता, गुरुनिष्ठा, तत्परता आणि समर्पणाची भावना त्याला अवश्य सत्शिष्य बनविते. याचे ज्वलंत उदाहरण आहे मिलारेपा. आजकालच्या शिष्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी, योगविद्या शिकण्यासाठी आत्मानुभवी सत्पुरुषाच्या चरणी कशी दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे याची शिकवण देतात- योगी मिलारेपा.
  • – ऋषी प्रसाद, जून 2004

इतरांना शेयर करा...

थोडक्यात - हेही वाचा

नियमित महत्वाची माहिती हवी आहे ?

Must Read

सर्वाधिक वाचलेले

आमच्याशी जुडा

पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा