तिसरा अध्याय : कर्मयोग
- दुसऱ्या अध्यायाच्या 11 ते 30व्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आत्मतत्त्व समजावून सांख्ययोगाचे निरूपण केले. नंतर 39 ते 53व्या श्लोकांत समत्वबुद्धिरूप कर्मयोगाद्वारे परमात्मप्राप्ती झालेल्या सिद्ध पुरुषाची लक्षणे, आचरण व महत्त्व प्रतिपादित केले. यात कर्मयोगाचा महिमा सांगताना 47 व 48व्या श्लोकात कर्मयोगाचे स्वरूप सांगून भगवंताने अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले. 49व्या श्लोकात समत्वबुद्धिरूप कर्मयोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगितले. 50व्या श्लोकात समतावान पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनाला कर्मयोगात संलग्न होण्यास सांगितले आणि 51व्या श्लोकात सांगितले की समतावान ज्ञानी पुरुषाला परम पद प्राप्त होते. हा प्रसंग ऐकून अर्जुन योग्य निर्णय घेऊ शकला नाही. म्हणून त्याविषयी आणखी स्पष्टीकरण करण्याबद्दल व निश्चितपणे कल्याण कशात आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुन भगवंताला विचारतो.
।। अथ तृतीयोऽध्याय: ।।
- अर्जुन उवाच :
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ।।1।।
- अर्जुनाने विचारले : हे जनार्दन ! कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, असे जर तुमचे निश्चित मत आहे, तर हे केशव ! युद्धासारखे घोर कर्म माझ्याकडून का करवित आहात ?
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ।।2।।
- तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळेनासे झाले आहे. म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे, ते कृपया निश्चितपणे मला सांगा.
- श्रीभगवानुवाच :
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ।।3।।
- श्रीभगवान म्हणाले : हे निष्पाप अर्जुन ! या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोग्यांसाठी कर्मयोग असे दोन प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितले आहेत.
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ।।4।।
- मनुष्य कर्मांच्या न करण्याने निष्कर्मतेला अर्थात् योगनिष्ठेला प्राप्त होत नाही तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवद्-साक्षात्काररूप सिद्धीस अर्थात् सांख्यनिष्ठेस प्राप्त होत नाही.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवश: कर्म सर्व: प्रकृतिजैर्गुणै: ।।5।।
- नि:संशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतिजन्य गुणांनी पराधीन होऊन कर्म करीतच असतो.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचार: स उच्यते ।।6।।
- जो मूढबुद्धी पुरुष सर्व इंद्रियांना हट्टाने वरवर संयमित करून मनातून त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला मिथ्याचारी अर्थात् दांभिक म्हटले जाते.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियै: कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ।।7।।
- परंतु हे अर्जुन ! जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ होय.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण: ।।8।।
- शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म तू फलाकांक्षा सोडून कर. कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोक्त कर्म करणे श्रेष्ठ आहे. शिवाय कर्म केल्यावाचून तुझे शरीर-व्यवहारही चालणार नाहीत.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन: ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग: समाचर ।।9।।
- स्वधर्माचरण हाच नित्ययज्ञ आहे. या यज्ञासाठी (अर्थात् भगवद्प्रीत्यर्थ) केलेल्या कर्मांशिवाय इतर कर्मांमध्ये गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात पडतो. म्हणून हे अर्जुन ! तू आसक्ती सोडून या यज्ञासाठीच उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति: ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ।।10।।
- कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवांनी नित्ययज्ञासह सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तुम्ही सर्व या यज्ञाद्वारे वृद्धीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणारा होवो.
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु व: ।
परस्परं भावयन्त: श्रेय: परमवाप्स्यथ ।।11।।
- तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना उन्नत (संतुष्ट) करा आणि ते देव तुम्हाला उन्नत करोत. याप्रकारे नि:स्वार्थभावाने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता: ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव स: ।।12।।
- यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागताही सर्व इष्ट भोग तुम्हाला निश्चितच देत राहतील. अशाप्रकारे त्या देवांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वत:च उपभोगतो, तो चोरच होय.
यज्ञशिष्टाशिन: सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: ।
भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ।।13।।
- यज्ञ करून शिल्लक उरलेले अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांतून मुक्त होतात. याउलट जे पापी लोक केवळ स्वत:च्या शरीराच्या पोषणासाठीच अन्न खातात, ते तर पापच भक्षण करतात.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव: ।।14।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।।15।।
- सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. यज्ञ शास्त्रोक्त कर्मांपासून उत्पन्न होतो. कर्म वेदांपासून व वेद साक्षात् अविनाशी परब्रह्मपासून उत्पन्न झालेले आहेत, असे जाण. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञांत प्रतिष्ठित असतो.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह य: ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।16।।
- हे पार्थ ! अशा रितीने इहलोकी सुरू केलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून जो वागत नाही अर्थात् शास्त्रानुसार कर्म करीत नाही, तो इंद्रियसुखांतच निमग्न पापी पुरुष व्यर्थच जगतो.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ।।17।।
- परंतु जो मनुष्य आत्म्यातच निरंतर रमलेला, आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही.
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रय: ।।18।।
- या जगात त्या आत्मतुष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानी नाही तसेच कोणत्याही प्राणिमात्रापासून त्याला कोणताही स्वार्थ साधावयाचा नसतो.
तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ।।19।।
- म्हणून तू कर्मफळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर्तव्यकर्मांचे चांगल्या प्रकारे आचरण कर. कारण अनासक्त भावाने स्वकर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: ।
लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ।।20।।
- हे अर्जुन ! जनकादिक ज्ञानी पुरुषांनीही अनासक्त होऊन शास्त्रोक्त कर्म करूनच परम सिद्धी प्राप्त केली आहे; शिवाय लोकसंग्रहाकडे पाहूनही (अर्थात् लोकांना शिकवण मिळावी म्हणून) तू कर्म करणेच योग्य आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।21।।
- कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याप्रमाणेच वागतात. तो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो, तिचेच अनुकरण इतर लोकही करतात.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ।।22।।
- हे पार्थ ! जरी मला तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि न मिळालेले काही मिळवावयाचे आहे, असेही नाही तरीही मी निरिच्छपणे स्वकर्माचे आचरण करीतच असतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रित: ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।।23।।
- जर मी दक्षतेने कर्मांचे आचरण केले नाही तर मोठी हानी होईल, कारण हे पार्थ ! सर्व लोक सर्वप्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत असतात.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमा: प्रजा: ।।24।।
- जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक नष्ट-भ्रष्ट होतील तसेच मी वर्णसंकर प्रजेच्या उत्पत्तीस कारणीभूत आणि या संपूर्ण प्रजेचा घात करणारा होईन.
सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ।।25।।
- हे भारत ! ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मांमध्ये आसक्त राहून कर्म करतात, त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानानेही समाजव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त राहून शास्त्रानुसार कर्मे करावीत.
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् ।।26।।
- परमात्मस्वरूपात दृढतेने स्थित ज्ञानी पुरुषाने शास्त्रोक्त कर्मांत आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम अर्थात् कर्मांत अश्रद्धा उत्पन्न करू नये. याउलट सर्व शास्त्रोक्त कर्मांचे स्वतः यथायोग्यरित्या आचरण करून त्यांनाही आचरण करायला लावावे.
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ।।27।।
- वास्तविक सर्व कर्मे सर्वप्रकारे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारेच केली जातात, परंतु ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे, असा अज्ञानी पुरुष ‘मी कर्ता आहे’ असे मानतो.
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयो: ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ।।28।।
- परंतु हे महाबाहू ! गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्त्व (अर्थात् गुण व कर्म यांच्याहून आत्मा भिन्न असून तो निर्लेप आहे असे) जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणांमध्ये वर्तत आहेत अर्थात् इंद्रियेच विषयांत वावरतात, असे समजून त्यांत आसक्त होत नाही.
प्रकृतेर्गुणसम्मूढा: सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ।।29।।
- प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यांत आसक्त होत असतात. त्या पूर्णपणे समज नसलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानी पुरुषाने त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: ।।30।।
- हे अर्जुन ! मज अंतर्यामी परमात्म्यात चित्त लावून सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित, ममतारहित होऊन तसेच नि:शंक होऊन युद्ध कर.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवा: ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभि: ।।31।।
- जे कोणी पुरुष दोषबुद्धिरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून वागतात, ते सर्व कर्मांतून मुक्त होतात.
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतस: ।।32।।
- परंतु जे माझ्यात दोषारोपण करीत माझ्या या मताप्रमाणे वागत नाहीत, त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तू कल्याण-मार्गापासून भ्रष्ट झालेलेच समज.
सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह: किं करिष्यति ।।33।।
- सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतात. ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावानुसारच आचरण करतो. मग याविषयी कोणी बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे ?
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ।।34।।
- प्रत्येक इंद्रियांच्या भोग्य विषयांमध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहे, मनुष्याने त्या दोहोंच्या अधीन होऊ नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत.
श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।।35।।
- उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अति उत्तम आहे. स्वधर्मात मरण पावणेही कल्याणकारक आहे; पण दुसऱ्यांचा धर्म भीतिदायक आहे.
- अर्जुन उवाच :
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष: ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित: ।।36।।
- अर्जुनाने विचारले : हे वार्ष्णेय ! तर मग इच्छा नसतानाही बळेच करावयास लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्मे करतो ?
- श्रीभगवानुवाच :
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव: ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ।।37।।
- श्रीभगवान म्हणाले : रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. यालाच तू याविषयी शत्रू जाण.
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ।।38।।
- जसे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वारेने गर्भ आच्छादिलेला असतो, तसेच या कामाद्वारे हे ज्ञान आच्छादिलेले आहे.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ।।39।।
- हे कौंतेय ! ज्ञानी पुरुषांचा नित्य शत्रू असलेल्या या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. हा अग्नीप्रमाणेच कधीही तृप्त होत नाही.
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ।।40।।
- इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची आश्रयस्थाने म्हटली जातात. यांच्याद्वारे हा काम ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहात पाडतो.
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।।41।।
- म्हणून हे भरतर्षभ ! तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाक अर्थात् त्याचा पूर्णपणे त्याग कर.
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मन: ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे: परतस्तु स: ।।42।।
- इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडचे अर्थात् श्रेष्ठ, बलवान व सूक्ष्म म्हटले जाते. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे, तो आत्मा आहे.
एवं बुद्धे: परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ।।43।।
- अशाप्रकारे बुद्धीच्याही पलीकडचा अर्थात् सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीद्वारे मनाला वश करून हे महाबाहू ! तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्याय: ।।3।।
अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘कर्मयोग’ नामक तिसरा अध्याय संपूर्ण झाला.