Play Audio [Gita Chapter 7 Marathi Mp3]
सातवा अध्याय : ज्ञानविज्ञानयोग [Chapter 7 With meaning in Marathi]
- सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात : ‘मत्परायण होऊन जो श्रद्धा व प्रीतिपूर्वक मला भजतो, तो सर्व योग्यांहून उत्तम योगी आहे.’ परंतु जोपर्यंत मनुष्याला भगवंताचे स्वरूप, गुण व प्रभाव समजत नाही तोपर्यंत त्याच्याद्वारे अंत:करणपूर्वक सतत भजन होणे कठीण आहे. म्हणूनच भगवंत या सातव्या अध्यायात आपल्या गुण-प्रभावासह संपूर्ण स्वरूपाचे व नाना प्रकारच्या भक्तियोगाचे वर्णन करतात. त्यात प्रथम ते एकाग्र चित्ताने ऐकण्याची प्रेरणा देऊन ज्ञानविज्ञान सांगण्याचे वचन देतात.
।। अथ सप्तमोऽध्याय: ।।
- श्रीभगवानुवाच :
मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।1।।
- श्रीभगवान म्हणाले : हे पार्थ ! अनन्य प्रेमाने माझ्या ठायी मन लावून आणि अनन्य भावाने मत्परायण होऊन योगसाधन करीत असता सर्व विभूती, बल, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त व सर्वांचा आत्मरूप अशा मला तू नि:संशयपणे पूर्णत: कसा जाणू शकशील, ते ऐक.
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।2।।
- मी तुला हे रहस्यमय तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगतो, जे जाणल्यानंतर या जगात पुन्हा दुसरे काही जाणायचे शिल्लक राहत नाही.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।3।।
- हजारो मनुष्यांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नशील योग्यांपैकीही एखादाच मत्परायण होऊन मला तत्त्वत: अर्थात् यथार्थरूपाने जाणतो.
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।4।।
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।5।।
- भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारांमध्ये माझी प्रकृती विभागलेली आहे. ही आठ प्रकारचे भेद असणारी ‘अपरा’ अर्थात् माझी जड प्रकृती आहे आणि हे महाबाहू ! हिच्याहून दुसरी, जिने हे संपूर्ण जग धारण केले आहे, तिला माझी जीवरूप ‘परा’ अर्थात् चेतन प्रकृती जाण.
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।6।।
- हे अर्जुन ! तू असे समज की सर्व भूतांची उत्पत्ती या दोन्ही प्रकृतींपासूनच होते आणि मी या सर्व जगाचा उत्पत्तिरूप व प्रलयरूप आहे अर्थात् मी सर्व जगाचे मूळ कारण आहे.
मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।7।।
- हे धनंजय ! माझ्याशिवाय किंचितमात्रही दुसरे काही नाही. दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्या ठायी ओवलेले आहे अर्थात् सर्वकाही माझ्याच आश्रित आहे.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।8।।
- हे कौंतेय ! पाण्यात रस मी आहे, चंद्र व सूर्यात प्रकाश मी आहे, सर्व वेदांमध्ये ओम्कार (ॐ) मी आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषांमधील पुरुषत्व मी आहे.
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।9।।
- पृथ्वीचा नैसर्गिक पवित्र सुगंध मी आहे, अग्नीचे तेज मी आहे, सर्व जीवांचे जीवन मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे.
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।10।।
- हे पार्थ ! सर्व भूतांचे सनातन कारण (बीज) मलाच जाण. सर्व बुद्धिवंतांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे.
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।।11।।
- हे भरतश्रेष्ठ ! बलवानांचे कामना व आसक्ती यांनी रहित बळ मी आहे तसेच सर्व प्राणिमात्रांमध्ये धर्मानुकूल अर्थात् शास्त्रानुकूल (व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण असलेला) काम मी आहे.
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ।।12।।
- आणखीही जे सत्त्वगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत आणि जे रजोगुणापासून व तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सर्वांना तू ‘माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत’, असे जाण. परंतु वास्तविक त्यांच्यामध्ये मी आणि ते माझ्यात नाहीत.
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ।।13।।
- गुणांचे कार्यरूप सात्त्विक, राजस व तामस – या तीन प्रकारच्या भावांनी हे सर्व जग मोहित होत आहे, म्हणून या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या मज अविनाशीला जाणत नाही.
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।।14।।
- कारण ही अलौकिक अर्थात् अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया मोठी दुस्तर (पार करण्यास कठीण) आहे. परंतु जे पुरुष मलाच निरंतर भजतात, ते या मायेचे उल्लंघन करून जातात अर्थात् भवसागरातून तरून जातात.
न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ।।15।।
- मायेने ग्रासल्यामुळे ज्यांचे ज्ञान हरपले आहे, असे आसुरी स्वभावाला धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच (नराधम) आणि दुष्कर्म करणारे मूढ लोक मला भजत नाहीत (माझी उपासना करीत नाहीत).
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।।16।।
- हे भरतश्रेष्ठ ! आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे पुण्यशील भक्तजन मला भजतात. (आर्त हा आपले दु:ख दूर करण्यासाठी, अर्थार्थी धनप्राप्तीसाठी आणि जिज्ञासू माझे ज्ञान होण्यासाठी माझी भक्ती करतो.)
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: ।।17।।
- त्यांच्यापैकी ज्ञानी भक्त नित्य माझ्या ठायी ऐक्यभावाने स्थित (मद्रूप) झालेला असतो तरीही माझी अनन्य भक्ती करतो, म्हणून तो श्रेष्ठ भक्त होय. कारण मला तत्त्वत: जाणणाऱ्या ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे.
उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ।।18।।
- नि:संशय हे सर्व भक्त मला श्रद्धेने भजणारे असल्याने उत्तम आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो मत्परायण मन-बुद्धीचा ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरूप अशा माझ्या ठायीच चांगल्या प्रकारे स्थित असतो.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ।।19।।
- अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मी तत्त्वज्ञान प्राप्त झालेला जो पुरुष ‘सर्वकाही वासुदेवच आहे’ – अशा प्रकारे मला भजत असतो, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे.
कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना: प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ।।20।।
- नाना भोगांच्या कामनेने ज्यांचे ज्ञान हरपले आहे, ते लोक आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन त्या त्या नियमांना धारण करून इतर देवतांना भजतात (अर्थात् ज्या देवतेच्या पूजेसाठी जो जो नियम लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, त्यानुसार त्यांची पूजा करतात).
यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।21।।
- जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा मी त्याच देवतेप्रती स्थिर करतो.
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।22।।
- तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची पूजा करतो आणि त्या देवतेपासून माझ्याकडूनच दिल्या गेलेल्या त्या इच्छित भोगांना नि:संशय प्राप्त करतो.
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।23।।
- परंतु त्या अल्पबुद्धी पुरुषांचे ते फळ नाशवंत आहे तसेच देवतांची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी मला कसेही भजले तरी शेवटी ते मलाच प्राप्त होतात.
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।24।।
- मूढ लोक माझे सर्वश्रेष्ठ असे अविनाशी परम स्वरूप न जाणता मन-इंद्रियांच्याही पलीकडील मज सच्चिदानंद परमात्म्याला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन व्यक्तिभावाला प्राप्त झालेला मानतात.
नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।25।।
- आपल्या योगमायेचे आवरण घेतल्यामुळे मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हा अज्ञानी मनुष्य मज जन्मरहित व अविनाशी परमेश्वराला जाणत नाही अर्थात् मला जन्मणारा व मरणारा समजतो.
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।26।।
- हे अर्जुन ! पूर्वी होऊन गेलेल्या, आता असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राणिमात्रांना मी जाणतो, परंतु मला कोणीही श्रद्धा-भक्तिरहित पुरुष जाणत नाही.
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ।।27।।
- हे परंतप ! हे भारत ! या सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुख-दु:खादी द्वंद्वरूप मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञतेला प्राप्त होत असतात.
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।28।।
- परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते आसक्ती-द्वेषजन्य द्वंद्वरूप मोहातून पूर्णपणे मुक्त झालेले दृढनिश्चयी भक्त मलाच सर्वप्रकारे भजतात.
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।29।।
- जे मला शरण येऊन जरा-मरणापासून सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते पुरुष त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, सर्व कर्मांना जाणतात.
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।30।।
- जे पुरुष अधिभूत व अधिदैव यांच्यासह तसेच अधियज्ञासह सर्वांचे आत्मरूप अशा मला अंतकाळीदेखील जाणतात, ते युक्तचित्त (माझ्या ठायी चित्त स्थिर झालेले) पुरुष मला जाणतात अर्थात् मलाच प्राप्त होतात.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ।।
अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण-अर्जुन संवादात ‘ज्ञानविज्ञानयोग’ नामक सातवा अध्याय संपूर्ण झाला.