संत डायोजिनीस आणि सिकंदर यांची एक छोटी कथा : आता नाही तर मग केव्हा ?

संत डायोजिनीस आणि सिकंदर यांची एक छोटी कथा : आता नाही तर मग केव्हा ?

... तर सिकंदर विजयी झाला असता !

  • सिकंदर जात होता. डायोजिनीस आकाशाकडे न्याहाळत होते, तेथे गेला. संत डायोजिनीसची आत्मधुंदी, आनंद व माधुर्याचे जीवन पाहून सिकंदर म्हणाला : “मला ईर्ष्या होत आहे. तुमच्याकडे काही जास्त साधने नाहीत, तुम्ही जमिनीवर पहुडला आहात तरीही इतके सुखी व प्रसन्न दिसत आहात की मोठमोठे सम्राटही इतके आनंदित आल्हादित नसतात !… मला दुसरा जन्म मिळेल तेव्हा मीसुद्धा या सोडून जाणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणार नाही, मीसुद्धा डायोजिनीस बनणार.
  • डायोजिनीस म्हणाले “बनणार काय ? आता वर्तमान क्षणाला गमवित आहेस, वेडा आहेस. आता बन पहुडण्याची जागा आहे, बसण्याची जागा आहे, खाण्या-पिण्याचेही येते, मिळत राहते… मग कशाला दगदग करीत आहेस ? वर्तमान क्षणाला गमविले आणि विचार केला की भविष्यात येऊ, करू…’ तर मुश्किल आहे येणे, करणे.”
  • “नाही, मी परत येतो, मग भेटतो तुम्हाला….”
  • “तू परतू शकणार नाहीस.”
  • “मी विश्वविजयासाठी जात आहे.”
  • “सिकंदर ! आपल्या प्राकृत स्वभावावर विजय मिळवायचा आहे. इच्छांवर विजय मिळवून आत्मविश्रांती मिळवायची आहे. जे खूप जवळ आहे अशा चंचल आणि वासनेच्या पुंजरूप मनावर विजय मिळवायचा आहे. जो हा खरा विजय सोडून दुसऱ्यांवर आपला प्रभाव जमवून त्यांची लूटमार करून विजयी बनतो, तो हारतच जातो. जो लोकांवर अत्याचार करून दबाव टाकून, काही “डावपेच आखून बाहेरच्या वस्तूंना, व्यक्तींना आपल्या अधीन करतो, तो तर त्या वस्तू, व्यक्तींच्या अधीन होत आहे. तो तर हारत जाईल आणि मृत्यूचा झटका त्याला पराजयात मूर्च्छित करून टाकेल.”
  • “नाही, आता मला जाऊ द्या. मी विजयाच्या, यात्रेवर निघालो आहे.”
  • “सिकंदर ! विजयाच्या यात्रेवर निघाला आहेस तर ये, बस… आपल्या आत्मस्वभावात विश्रांती मिळव, विजय होईल.”
  • “यावेळी तर नाही, मग परतल्यावर करेन.”
  • डायोजिनीस म्हणाले : “सिकंदर ! तू परतू शकणार नाहीस.”
  • आणि झालेही असेच !… तो खरोखर परतू शकला नाही. रस्त्यातच मेला !… या देहाचा कोणताही भरवसा नाही आणि मनुष्याच्या इच्छांचा कोणताही अंत नाही. जो वर्तमान क्षणाला ईश्वरप्राप्तीत लावत नाही तो भविष्यात येऊन ईश्वरप्राप्ती करेल, ही तर शेखचिल्लीचा किल्ला बनविण्यासारखी गोष्ट आहे.
    – ऋषी प्रसाद, सप्टेंबर 2020
  • शिक्षण घेणे, डिग्री मिळविणे तर ठीक आहे पण दीक्षेविना मिळविलेल्या डिग्री (पदव्या) दुसऱ्यांना शोषित करून धनाचे ढीग लावण्यात आयुष्य बरबाद करून टाकतील अथवा मोठमोठ्या पदांवर पोहोचवून आपल्या अहंकाराच्या मोठेपणात फसवून वास्तविक आत्म-ईश्वराच्या मोठेपणापासून वंचित करून टाकतील.

Milarepa Information, Mahiti, Charitra, Quotes in Marathi

Milarepa Information, Mahiti, Charitra, Quotes in Marathi

Milarepa Information, Mahiti, Quotes in Marathi

  • तिबेटमध्ये अंदाजे 850 वर्षापूर्वी एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले मिलारेपा. वयाच्या सातव्या वर्षीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. काका आणि आत्याने त्यांची सर्व संपत्ती हडप केली. लहान बहीण आणि मातेसह मिलारेपाला खूप दुःख सहन करावे लागले. स्वतःची संपत्ती परत मिळविण्यासाठी त्याच्या आईने खूप प्रयत्न केले, परंतु त्याचे काका व आत्यापुढे तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. तिच्या मनातून कोणत्याही प्रकारे त्या गोष्टीचे दुःख जात नव्हते.
  • एकदा असे झाले. त्यावेळी मिलारेपा जवळ जवळ 15 वर्षाचा होता. तो गुणगुणत घरी आला. गाण्याचा आवाज ऐकून त्याची आई एका हातात काठी व दुसऱ्या हातात राख घेऊन बाहेर आली आणि त्याच्या तोंडावर राख फेकून त्याला काठीने मारत म्हणाली : “कसा कुपुत्र जन्मला आहेस तू ! तुझ्या वडिलांच्या नावाला कलंक लावलास.”
  • त्याला मारता मारता ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर पुन्हा शिव्यांचा भडीमार करीत मिलारेपाला म्हणाली : “धिक्कार आहे तुझा ! शत्रूंचा सूड घ्यायचा विसरून गाणे शिकतोस काय ? शिकायचेच असेल तर असे काही शिक की ज्यामुळे त्यांचे कुळ नष्ट होईल.”
  • बस… मिलारेपाच्या हृदयावर आघात झाला. घर सोडून त्याने तंत्रविद्या शिकविणाऱ्या गुरूंना शोधले आणि संपूर्ण निष्ठा व भावपूर्वक सेवा करून त्यांना प्रसन्न केले. त्यांच्याकडून शत्रूंना नष्ट करण्याची आणि हिमवर्षा करण्याची विद्या शिकला. त्याचा प्रयोग करून त्याने त्याच्या काका व आत्याची शेती नष्ट करून त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारले. काका व आत्याला त्याने जिवंतच ठेवले, जेणेकरून त्यांनी दुःख भोगून तडफडत मरावे. यामुळे लोक मिलारेपाला खूप घाबरू लागले.
  • काळ लोटला. मिलारेपाच्या हृदयाची आग शांत झाली. आता त्याला सूड घेण्याच्या वृत्तीचा पश्चात्ताप होऊ लागला. त्यादरम्यान त्याची एका लामा साधूशी भेट झाली. त्याने सल्ला दिला की : “तुला जर विद्याच शिकायची असेल तर फक्त योगविद्याच शिक. भारतातून ही योगविद्या शिकून आलेले एकमेव गुरू आहेत मारपा.”
  • योगविद्या जाणणाऱ्या गुरूंविषयी ऐकताच त्याचे मन त्यांच्या दर्शनासाठी अधीर झाले. मिलारेपात तर तत्परता होती, त्याचबरोबर दृढतादेखील होती आणि तंत्रविद्या शिकून त्याने गुरूंप्रती निष्ठादेखील सिद्ध करून दाखविली होती. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याबाबत तो दृढनिश्चयी होता. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो तर निघाला मारपांना भेटण्यासाठी.
  • मार्ग विचारत विचारत, निराश न होता मिलारेपा पुढे पुढे चालत राहिला. रस्त्यात एका गावाजवळील शेतात एका शेतकऱ्याला पाहिले, त्याच्याजवळ जाऊन मारपांविषयी विचारले. शेतकरी म्हणाला : “माझ्या शेतात तू काम केलेस तर मी तुला मारपांकडे घेऊन जाईन.’
  • मिलारेपा उत्साहाने सहमत झाला. थोड्या दिवसांनी शेतकऱ्याने रहस्य सांगितले की ते स्वतःच मारपा आहेत.
  • मिलारेपाने गुरुदेवांना भक्तिभावाने नमन केले आणि स्वतःची पूर्वकहाणी सांगितली. त्याने आपल्या हातून घडलेल्या मानव-संहाराविषयी सांगितले. सूड घेण्याच्या भावनेने केलेल्या पापांविषयी सांगून पश्चात्ताप व्यक्त केला. मिलारेपाच्या निखालस स्वभावामुळे गुरूचे हृदय प्रसन्न झाले, परंतु त्यांनी स्वतःची प्रसन्नता दाखविली नाही, गुप्तच ठेवली. आता मिलारेपाची परीक्षा घेणे सुरू झाले. गुरुविषयी स्नेह, श्रद्धा, निष्ठा व दृढतेच्या कसोट्या सुरू झाल्या.
  • गुरु मारपा मिलारेपाशी अत्यंत कठोर व्यवहार करीत असत, जणूकाही त्यांना दया काय असते हे माहीतच नव्हते. परंतु मिलारेपाची गुरुभक्ती दृढ होती. तो गुरूंनी सांगितलेले प्रत्येक कार्य अत्यंत तत्परतेने व निष्ठेने करू लागला.
  • काही महिने व्यतीत झाले, तरीही गुरूंनी मिलारेपाला थोडेसुद्धा ज्ञान दिले नाही. त्याने अत्यंत नम्रतेने गुरुजींना ज्ञानासाठी प्रार्थना केली. गुरुजी क्रोधित झाले: “मी माझे सर्वस्व देऊन भारतातून ही योगविद्या शिकून आलो आहे. ही तुझ्यासारख्या दुष्टासाठी आहे काय ? तू जे पाप केले आहेस ते भस्म होऊन गेले तरच मी तुला ही योगविद्या शिकवीन. तू जी शेती नष्ट केली आहेस ती त्यांना परत दे, ज्यांची तू हत्या केली आहेस त्या सर्वांना जिवंत कर…’
  • हे ऐकून मिलारेपा खूप रडला. तरीही त्याने हिंमत सोडली नाही, गुरूंची शरण सोडली नाही. काही दिवस गेले. एके दिवशी मारपा मिलारेपाला म्हणाले : “माझ्या मुलासाठी एक पूर्वमुखी गोलाकार घर बांधून दे; परंतु लक्षात ठेव की ते घर बांधण्यात तू कोणाचीही मदत घेणार नाहीस. घरासाठी लागणारी लाकडेसुद्धा तुलाच तोडावी लागतील, आणावी लागतील आणि घरात जोडावी लागतील.”
  • मिलारेपाला आनंद झाला की ‘चला, गुरुजींच्या सेवेची संधी तर मिळत आहे ना !’ त्याने अत्यंत उत्साहाने कार्य सुरू केले. तो स्वतःच लाकडे तोडत असे आणि ती लाकडे व मोठमोठे दगड स्वतःच्या पाठीवर घेऊन येत असे. स्वतःच दूरवरून पाणी घेऊन येत असे. कोणाचीही मदत घेण्याची मनाई होती ना ! गुरूंच्या आज्ञापालनात तो पक्का होता. घराचे अर्धे काम तर झाले.
  • एके दिवशी गुरुजी घर पहायला आले. ते रागात म्हणाले : “अरेरे! असे घर चालणार नाही. हे घर पाडून टाक आणि याद राख, ज्या वस्तू जेथून घेऊन आला आहेस त्या तेथेच ठेव.”
  • मिलारेपाने कोणतीही तक्रार न करता आज्ञेचे पालन केले. तक्रारीचा ‘त’ सुद्धा तोंडात येऊ दिला नाही. कार्य पूर्ण झाले. मग गुरुजी दुसरी जागा दाखवत म्हणाले : “हं, ही जागा योग्य आहे. येथे पश्चिमेला द्वार असलेले अर्धचंद्राकार घर बांधून दे.”
  • मिलारेपा पुन्हा कामास लागला. खूप परिश्रम केल्यानंतर अर्धे घर तयार झाले. तेव्हा गुरुजी पुन्हा फटकारत म्हणाले : “कसे रे विचित्र वाटते हे ! हे पाडून टाक आणि एक-एक दगड पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी ठेवून ये.”
  • मुळीच न चिडता त्याने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले. किती विलक्षण होती मिलारेपाची गुरुभक्ती ! थोड्या दिवसांनंतर गुरुजींनी पुन्हा नवीन जागा दाखवत आज्ञा दिली: “येथे त्रिकोणाकार घर बांधून दे.”
  • मिलारेपाने पुन्हा काम सुरू केले. दगड आणता आणता त्याची पाठ आणि खांदे सोलून निघाले तरीही त्याने त्याच्या वेदनेविषयी कोणालाही सांगितले नाही. त्रिकोणाकार घर पूर्ण होण्यास आले, तेव्हा गुरुजी पुन्हा अप्रसन्नता व्यक्त करीत म्हणाले : “हे चांगले वाटत नाही, पाडून टाक आणि सर्व दगड पूर्ववत ठेवून दे.”
  • या स्थितीतही मिलारेपाच्या चेहऱ्यावर असंतोषाची एक रेषही उमटली नाही. प्रसन्न चित्ताने गुरूंची आज्ञा शिरोधार्य करून त्याने सर्व दगड पूर्ववत व्यवस्थित ठेवले.
  • या वेळी एका टेकडीवर जागा दाखवत गुरू म्हणाले : “येथे नऊ खांब असलेले चौकोनाकृती घर बांधून दे.”
  • गुरुजींनी तीन-तीन वेळा घर बांधायला सांगून पाडून टाकले होते. मिलारेपाच्या हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. त्याचे अंग-अंग ठणकत होते, तरीही तो गुरूंना तक्रार करीत नसे की ‘गुरुजी! आपल्या आज्ञेनुसारच तर घर बांधत आहे तरीही आपल्याला ते पसंत पडत नाही. पाडायला सांगता आणि पुन्हा दुसरे बांधायला सांगता. माझे परिश्रम आणि वेळ व्यर्थ जात आहे.’
  • मिलारेपा तर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. जेव्हा अर्धे घर बांधून झाले तेव्हा मारपा पुन्हा म्हणाले “याच्या जवळच बारा खांब असलेले दुसरे घर बांध.” कसेही करून बारा खांब असलेले घर पूर्ण झाले. तेव्हा मिलारेपाने गुरूंना ज्ञान देण्यासाठी प्रार्थना केली.
  • गुरुजींनी मिलारेपाचे केस धरून ओढले आणि लाथ मारून हाकलून देत म्हणाले “फुकटचे ज्ञान घ्यायचे आहे काय ?”
  • दयाळू गुरुमातेला (मारपांची पत्नी) मिलारेपाची ही दशा पाहवली नाही. तिने मारपांना त्याच्यावर दया करण्याची विनंती केली. परंतु मारपांनी कठोरता सोडली नाही.
  • अशा प्रकारे मिलारेपा गुरुर्जीचे दटावणे देखील ऐकून घेत असे, मारसुद्धा सहन करीत असे आणि एकांतात बसून रडत असे, परंतु त्याच्या ज्ञानप्राप्तीच्या जिज्ञासेपुढे या सर्व दुःखांना काहीही महत्त्व नव्हते.
  • एकदा तर गुरूंनी त्याला खूप मारहाण केली. आता मिलारेपाचे धैर्य खचले. बारा बारा वर्षे एकट्यानेच स्वतःच्या हातांनी घरे बांधली तरीही गुरुजींकडून काहीही मिळाले नाही. आता तो थकला आणि खिडकीतून उडी मारून बाहेर पळून गेला.
  • गुरुपत्नी हे सर्व पाहत होती. तिचे हृदय कोमल होते. मिलारेपाच्या सहनशक्तीमुळे तिला त्याच्याबद्दल सहानुभूती होती. ती मिलारेपाकडे गेली आणि त्याची समजूत घालून गुपचूप दुसऱ्या गुरूंकडे पाठवून दिले. त्याच्याबरोबर नकली संदेश पत्रदेखील लिहून दिले की ‘आलेल्या युवकास ज्ञान द्यावे.’ हा दुसरा गुरू मारपांचाच शिष्य होता. त्याने मिलारेपाला एकांत साधनेचा मार्ग शिकविला. तरीही मिलारेपाची प्रगती होऊ शकली नाही. मिलारेपाच्या नवीन गुरूंना वाटले की जरूर काही ना काही भानगड आहे. त्याने मिलारेपाला त्याची भूतकाळची साधना आणि त्याने केलेल्या दुसऱ्या गुरूंविषयी माहिती देण्यास सांगितले. मिलारेपाने सर्व गोष्टी अगदी निखालसपणे सांगितल्या.
  • नवीन गुरू रागवत म्हणाले : “एक गोष्ट लक्षात ठेव, गुरू एक असावेत आणि एकदाच करावेत. हा काही सांसारिक व्यापार नाही की एका ठिकाणी आवडले नाही तर निघाला दुसऱ्या ठिकाणी. आध्यात्मिक मार्गात अशा प्रकारे गुरू बदलणारा धोब्याच्या कुत्र्याप्रमाणे न घरचा न घाटचा राहतो. असे केल्याने गुरुभक्तीचा घात होतो. ज्याची गुरुभक्ती खंडित होते त्याला स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी बराच कालावधी लागतो. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. चल, आपण दोघे जाऊया गुरू मारपांकडे आणि त्यांच्याकडे क्षमा मागूया.” असे म्हणून त्या दुसऱ्या गुरूंनी स्वतःची सर्व संपत्ती आपले गुरू मारपा यांना अर्पण करण्यासाठी सोबत घेतली. फक्त एका लंगड्या शेळीलाच घरी ठेवले.
  • दोघेही मारपांजवळ पोहोचले. शिष्याद्वारे अर्पण केलेल्या सर्व संपत्तीचा मारपांनी स्वीकार केला आणि विचारले: “ती लंगडी शेळी का घेऊन आला नाहीस ?” तेव्हा तो शिष्य तेवढेच अंतर चालून पुन्हा घरी गेला. शेळीला खांद्यावर घेऊन आला आणि ती गुरुजींना अर्पण केली. हे पाहून गुरुजी संतुष्ट झाले. मिलारेपाकडे पाहत म्हणाले : “मिलारेपा ! मला अशी गुरुभक्ती पाहिजे. मला शेळीची आवश्यकता नव्हती, परंतु तुला धडा शिकवायचा होता.”
  • मिलारेपानेदेखील स्वतःजवळ जे काही होते ते गुरुचरणी अर्पण केले. त्याच्याद्वारे अर्पण केलेल्या वस्तू पाहून मारपा म्हणाले : “या सर्व वस्तू तर माझ्या पत्नीच्याच आहेत. दुसऱ्यांच्या वस्तू तू कशा काय भेट देऊ शकतोस ?” असे बोलून त्यांनी मिलारेपाला धमकावले..
  • मिलारेपा पुन्हा अत्यंत हताश झाला. त्याने विचार केला की “माझ्यात काहीतरी कमतरता आहे, ज्यामुळे माझे गुरुदेव माझ्यावर प्रसन्न होत नाहीत ?” त्याने मनोमन भगवंताला प्रार्थना केली आणि निश्चय केला की ‘या जन्मात तर गुरुजी प्रसन्न होतील असे वाटत नाही, म्हणून हे जीवनच गुरुजींच्या चरणी अर्पण केले पाहिजे.’ असा विचार करून तो गुरुजींच्या चरणी प्राणत्याग करण्यास तयार झाला. लगेच मारपांना समजले की: ‘हा, आता शिष्य तयार झाला.’
  • उभे राहून मारपांनी मिलारेपाला मिठी मारली. मारपांच्या अमृतदृष्टीचा मिलारेपावर वर्षाव झाला. स्नेहमय शब्दांत गुरुदेव म्हणाले “मुला! मी तुझ्या ज्या कठीण कसोट्या घेतल्या, त्याच्यामागे कारण होते की तू आवेशात येऊन जी पापे केली होती ती सर्व मला या जन्मातच भस्म करायची होती, तुझ्या अनेक जन्मांची साधना मला या जन्मात फलित करायची होती. तुझ्या गुरूंना ना तुझ्या भेटवस्तूंची आवश्यकता आहे ना घराची तुझ्या कर्माच्या शुद्धीसाठीच ही घर बांधण्याची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण होती, सोने शुद्ध करण्यासाठी तापवावे लागते ना! तू माझाच शिष्य आहेस. माझ्या प्रिय शिष्या! तुझी कसोटी पूर्ण झाली. चल, आता तुझी साधना सुरू करवितो.
  • मिलारेपा रात्रंदिवस डोक्यावर दिवा ठेवून एकाच जागी ध्यानस्थ बसत असे. अशा प्रकारे गुरूंच्या सान्निध्यात त्याने अकरा महिने साधना केली. प्रसन्न झालेल्या गुरूंनी देण्यात काही बाकी ठेवले नाही. मिलारेपाला साधनेच्या दरम्यान असे-असे अनुभव झाले, जे त्याच्या गुरू मारपांनाही झाले नव्हते. शिष्य गुरुपेक्षा सवाई निघाला. शेवटी गुरूंनी त्याला हिमालयाच्या दुर्गम गुहांमध्ये जाऊन ध्यान साधना करण्यास सांगितले.
  • गुरुभक्ती, दृढता आणि गुरूंच्या आशीर्वादाने मिलारेपा तिबेटमध्ये सर्वात मोठा योगी म्हणून प्रसिद्ध झाला. बौद्ध धर्माच्या सर्व शाखा मिलारेपाला मानतात. म्हटले जाते की अनेक देवांनी देखील मिलारेपाचे शिष्यत्व स्वीकारून स्वतःला धन्य मानले आहे. तिबटमध्ये आजदेखील मिलारेपाची भजने व स्तोत्रे घरोघरी गायली जातात.
  • मिलारेपाने खरेच म्हटले आहे : “गुरु ईश्वरीय शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असतात. त्यांच्यात शिष्याची पापे भस्मीभूत करण्याची क्षमता असते.”
  • शिष्याची दृढता, गुरुनिष्ठा, तत्परता आणि समर्पणाची भावना त्याला अवश्य सत्शिष्य बनविते. याचे ज्वलंत उदाहरण आहे मिलारेपा. आजकालच्या शिष्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी, योगविद्या शिकण्यासाठी आत्मानुभवी सत्पुरुषाच्या चरणी कशी दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे याची शिकवण देतात- योगी मिलारेपा.
  • – ऋषी प्रसाद, जून 2004

Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi: Mahiti, Story

Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi: Mahiti, Story

Chatrapati Shivaji Maharaj Information, Mahiti in Marathi (For Essay, Speech, Nibandh)

  • सतराव्या शतकात हिंदुस्थानात मुघल शासकांद्वारे अत्याचार, लूटमार वगैरे. वाढतच होती. हिंदूंना बळजबरीने मुस्लीम बनविले जात होते. मुघलांबरोबरच पोर्तुगीज व इंग्रजांनीही भारतभूमीत आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. परिस्थितीपुढे गुडघे टेकत असलेला हिंदू समाज हळूहळू राजनैतिक व धार्मिक दुरावस्थेकडे अग्रेसर होत होता. सर्वांत भयंकर प्रहार आपल्या संस्कृतीवरच होत होता. धन व सत्तेच्या वासनेने बरबटलेले हे हैवान आपल्या आयाबहिणींची अब्रू खुलेआम लुटत होते. अशा विषम परिस्थितीत पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यात फाल्गुन कृष्ण तृतीयेला (इ.स. 1630) शिवरायांचा जन्म झाला.
  • बालपणापासूनच मातोश्री जिजाबाईंनी रामायण, महाभारत, उपनिषद व पुराणांमधील धैर्य, शौर्य, धर्म आणि आपल्या मातृभूमीप्रती प्रेमभावाच्या कथा – गाथा सांगून त्यांच्यात या सद्गुणांबरोबरच एक प्रचंड प्राणबळ फुंकले.. परिणामी वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचा विस्तार करण्याचा दृढ संकल्प केला आणि आपल्या सुखचैनीची, ऐश-आरामाची पर्वा न करता धर्म, संस्कृती व देशवासींचे रक्षण करण्यासाठी नाना जोखिमी पत्करून विधर्मी सत्तेला टक्कर देऊ लागले. त्यांनी प्रबळ पुरुषार्थ, दृढ मनोबळ, प्रचंड उत्साह आणि अद्भुत पराक्रम दाखवित भारतभूमीत पसरत असणाऱ्या मुघल शासकांची पायमुळे हलविण्यास सुरुवात केली. शत्रू त्यांना आपला काळ समजत होते. ते शिवरायांचा सफाया करण्यासाठी नित्यनवीन कट रचत होते. धूर्तता, सामर्थ्य, कपट वगैरे कोणत्याही प्रकारे कुमार्गाचे अनुसरण करण्यात त्यांनी कोणतीच कसर ठेवली नव्हती. परंतु शत्रूंना हे माहीत नव्हते की ज्याचा संकल्प दृढ व इष्ट मजबूत असते त्याचे अनिष्ट जगातील कोणतीच ताकद करू शकत नाही. शिवराय विवेकाच्या ठिकाणी विवेक, सामर्थ्याच्या ठिकाणी सामर्थ्य व या दोहोंच्या पलीकडील परिस्थितीत ईश्वर आणि गुरुनिष्ठेचा आश्रय घेत शत्रूंना सडेतोड उत्तर देत होते.
  • बालपणीच मातेने संतांप्रती श्रद्धेचे जे बीज वीर शिवरायांच्या मन-बुद्धीत पेरले होते, त्यानेच पुढे जाऊन विराट रूप धारण केले. या महान योद्धाच्या मुखमंडलावर शौर्य व गांभीर्य झळकत होते आणि हृदय ईश्वर व संतांप्रती निष्ठेने परिपूर्ण होते. वेळोवेळी ते संत महापुरुषांच्या शरणी जात आणि त्यांच्याकडून ज्ञानोपदेश प्राप्त करीत, जीवनाचे सार काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करीत.
  • एकदा ते संत तुकाराम महाराजांच्या दर्शन-सत्संगासाठी व त्यांचा आर्शीवाद घेण्यासाठी देहू गावी गेले. ते या ईश्वरनिष्ठ महापुरुषाला पाहून इतके प्रभावित झाले की त्यांच्याकडे अनुग्रहाची याचना करू लागले. परंतु दूरदर्शी संत श्री तुकाराम महाराजांनी त्यांना विविध कलांनी संपन्न लोकसंत समर्थ रामदासांना शरण जाण्याचा सल्ला दिला. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात या प्रसंगाचा उल्लेखही येतो.

राजा छत्रपती । ऐकावें वचन ।
रामदासीं मन । लावीं वेगें ॥1॥
रामदास स्वामी । सोयरा सज्जन ।
त्यासी तन मन । अर्पी बापा ॥2॥
मारूती अवतार । स्वामी प्रगटला ।
उपदेश देईल । तुजलागी ॥3॥

  • ‘राजे छत्रपती ! माझे ऐका आणि लगेच समर्थ रामदासांच्या भक्तीत आपले मन लावा. ते शरणागत भक्तांना आश्रय देणारे सज्जन संत आहेत. म्हणून आपले तन-मन-धन अर्थात सर्वस्व त्यांना अर्पण करा.. रामदास स्वामी साक्षात हनुमंतांचे अवतार आहेत. ते तुम्हाला उपदेश देतील, यात कसलीही शंका नाही.’
  • धर्मनिष्ठ शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या श्रीचरणी गेले आणि त्यांच्याकडे अनुग्रहाची याचना केली. समर्थांनी त्यांना विधिवत् मंत्रदीक्षा दिली आणि म्हटले : “या जगी आलेला प्रत्येक जण सच्चिदानंदस्वरूप परमात्मा आहे. म्हणून तुम्हीसुद्धा तोच परमात्मा आहात ! माणसा-माणसात भेदभाव न करता तुम्ही राजधर्माचे पालन केले पाहिजे.”
  • गुरूंचा उपदेश शिरोधार्य करून शिवाजी महाराज ‘मंत्रमूलं गुरोर्वाक्यं’ वर अंतिम क्षणापर्यंत दृढ राहिले. एकदा शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुदेवांकडून राज्यासाठी शुभ चिन्ह मागितले. तेव्हा समर्थांनी अंगावर ओढलेले भगवे वस्त्र त्यांना दिले. महाबुद्धिमान वीर शिवाजी महाराजांनी त्या वस्त्राला आपल्या स्वराज्याचे निशाण बनविले. तो भगवा ध्वज शेवटपर्यंत मराठा साम्राज्याची निशाणी बनून राहिला.
  • शिवाजी महाराजांचे बरेचसे जवळचे व दूरचे नातेवाईक मुस्लीम शासकांच्या सैन्यात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत समर्थ रामदासांनी लोकांमध्ये शिवरायांप्रती विश्वास जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. परिणामी हळूहळू मराठा युवक वीर शिवाजींच्या सैन्यात सामिल होऊ लागले. आपल्या सुख-चैनीची पर्वा न करता कर्मयोगी शिवाजी महाराज अविश्रांतपणे राज्यक्रांतीत संलग्न राहिले. हारलेल्या कित्येक हिंदू राज्यांना पुन्हा जिंकून त्यांनी एकछत्र राज्याची स्थापना केली. असे संघर्षमय जीवन व्यतीत करीत असतानाही त्यांनी आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज व इतर महापुरुषांच्या सेवेत कोणतीच कसर ठेवली नाही !
  • ते शत्रूंसाठी तर अति भयंकर शूरवीर होते, परंतु आपल्या प्रजेसाठी प्रेमावतार होते. त्यांची आपल्या प्रजेप्रती हिताची भावना पाहून गदगद होऊन कधी कधी समर्थ त्यांना ‘प्रजाहितदक्ष’ म्हणून संबोधत असत. या प्रजाहितदक्ष सम्राटाने बिचाऱ्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या हिताकडे खूप लक्ष दिले. युद्धासाठी निघणाऱ्या सैनिकांना ते विशेष सूचना द्यायचे : “मार्गात येणाऱ्या रयतेला कोणत्याही प्रकारचे कष्ट देता कामा नये. शेतातील पिकाच्या एका पानालाही तुमच्यापैकी कोणी स्पर्श करता कामा नये.”
  • त्यांच्याद्वारे परहिताची अगणित कार्ये अविरत होतच राहिली. त्यांच्या राज्यव्यवस्थेत आयाबहिणींची अब्रू, प्रतिष्ठा सुरक्षित राहील याकडे विशेष लक्ष पुरविले जायचे. मनमुख तरुणांना ते कठोर शिक्षा देण्यास चुकत नसत. फारशी भाषेच्या प्रभावामुळे लुप्त होत चाललेला संस्कृत भाषेचा गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संस्कृतचे प्रचलन सुरू केले. जबरदस्तीने मुसलमान बनविल्या गेलेल्या हिंदूंचे शुद्धिकरण करून त्यांना पुन्हा हिंदू समाजात परत घेतले. आपल्या सद्गुरूंची व महापुरुषांची सेवा करीत ते धर्मरक्षण व प्रजेच्या कल्याणाच्या पवित्र कार्यात आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत संलग्न राहिले. आज जवळजवळ साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज केवळ राज्यकर्त्यांसाठीच नव्हे तर विश्वभरातील लोकांसाठी एक अति उज्ज्वल प्रेरणास्रोत बनले आहेत.
  • – ऋषी प्रसाद, मार्च 2007

Sant Eknath Ji Information, Charitra, Mahiti, Abhang in Marathi

Sant Eknath Ji Information, Charitra, Mahiti, Abhang in Marathi

Sant Eknath Maharaj Information Mahiti in Marathi​

  • श्री एकनाथ महाराज एकनिष्ठ गुरुभक्त होते. एकनाथ महाराजांचा जन्म चैत्र कृष्ण षष्ठी शके 1455 (इ.स. 1533) मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मानंतर काही काळाने त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचे पालनपोषण केले. एकनाथ बाल्यावस्थेपासूनच अतिशय बुद्धिमान व श्रद्धाळू होते. संध्या, हरिभजन, पुराणांचे श्रवण, ईश्वरपूजा इत्यादींची त्यांना फार आवड होती. ते आनंदमग्न होउ कधीकधी हाती चिपळ्या घेऊन किंवा खांद्यावर मोठी पळी वा अशीच एखादी वस्तू वीणेप्रमाणे ठेवून भजन करायचे. कधी दगड समोर ठेवून त्यावर फूल अर्पण करायचे आणि भगवन्नाम संकीर्तन करीत नृत्य करायचे. जेव्हा गावात भागवत कथा असायची तेव्हा ते ती अगदी तन्मयतेने ऐकायचे. इतक्या कोवळ्या वयातही ते त्रिकाळ संध्यावंदन करण्यास कधी चुकत नव्हते. स्तोत्रपाठ, सकाळ-सायंकाळ भगवंत व गुरुजनांना नमस्कार करणे वगैरे नियम-निष्ठेतही ते तत्पर रहायचे.
  • या सर्व गोष्टींचा परिणाम हा झाला की भगवद्प्रेमाच्या रसाने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या जीवनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत झाली. त्यांच्या बालमनात वारंवार हा विचार येऊ लागला की ‘जसे ध्रुव व प्रल्हादला भगवंताची प्राप्ती करविणारे सद्गुरू देवर्षी नारद भेटले, तसे समर्थ सद्गुरू मला केव्हा भेटतील ?’ एके दिवशी 12 वर्षांचे एकनाथ शिवालयात हरिगुण गात बसले होते. रात्रीचा चौथा प्रहर सुरू झाल्यावर त्यांच्या हृदयात अंतःप्रेरणा झाली की ‘देवगडला जनार्दन पंत नावाचे एक सत्पुरुष राहतात. त्यांच्याकडे जा, ते ‘तुला कृतार्थ करतील !’
  • एकनाथ देवगडला गेले. तेथे त्यांना श्री जनार्दन स्वामींचे दर्शन झाले. गद्गद होऊन नाथांनी आपला देह गुरुचरणी अर्पण केला. ते क्षण संसाराचे अत्यंत सोनेरी क्षण असतात जेव्हा सद्गुरूंचे सशिष्याशी मिलन होते, कारण या संगमाने जनहिताच्या पावन गंगेचा उदय होतो.
  • गुरुद्वारी राहून एकनाथ गुरुसेवेत संलग्न झाले. गुरुजी झोपून उठण्याआधीच ते उठायचे. जी सेवा समोर दिसायची ती आज्ञेची वाट न पाहताच करून टाकायचे ! रात्री गुरुजींचे पाय चेपायचे, कधी पंख्याने वारा घालायचे. गुरुजी जेव्हा समाधीत बसायचे तेव्हा द्वाराजवळ उभे राहून पहारा करायचे. गुरुदेवांच्या समाधीत कोणतीही बाधा येऊ नये याकडे लक्ष द्यायचे. गुरूंच्या द्वारी आणखीही काही सेवक होते पण नाथ कोणाचीच वाट न पाहता स्वतःच मोठ्या प्रेमाने, उत्साहाने व तत्परतेने सेवाकार्यात मग्न रहायचे. त्यांच्यासाठी गुरूंचा संतोषच स्वसंतोष होता, गुरूंचे शब्दच शास्त्र होते, गुरुद्वारच नंदनवन होते आणि गुरूंची मूर्तीच परमेश्वराचा श्रीविग्रह होता. ‘गुरुर्साक्षात् परब्रह्म…’ यात त्यांची दृढ निष्ठा होती. निरंतर सहा वर्षेअविश्रांत सेवेने प्रसन्न होऊन गुरूंनी एके दिवशी त्यांना अनुष्ठान करण्याची आज्ञा दिली. ती शिरोधार्य करून एकनाथांनी अनुष्ठान सुरू केले.
  • एके दिवशी ते समाधीत लीन होते. एका भयंकार सापाने फुत्कार करीत त्यांच्या देहाला विळखा घातला. नाथांच्या स्पर्शाने तो त्याचा हिंसक भाव विसरला आणि त्यांच्या मस्तकावर फणा पसरवून डोलू लागला. ज्यांचे चित्त सम झाले आहे, त्यांच्यासमोर साप, विंचू चित्ते, सिंह वगैरे हिंसक पशूसुद्धा क्रूरता विसरून आनंदमग्न होऊ लागतात. स्वामी रामतीर्थांचे जीवनही या गोष्टीची साक्ष देते.
  • तो साप मग नाथांचा सोबती बनला. तो नेहमी त्यांच्या जवळ येऊ लागला. ते समाधिस्थ व्हायचे तेव्हा तो त्यांच्या शरीराला विळखा घालून डोक्यावर फणा पसरवून डोलू लागायचा आणि ते समाधितून जागे होण्याचा संकेत मिळताच निघून जायचा. नाथांना हे माहीतच नव्हते. त्यांच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने एक दिवस नाथांना विळखा घातलेल्या सापाला पाहिले तेव्हा तो ओरडला. ताबडतोब नाथ समाधितून उठले, तेव्हा त्यांनी सापाला निघून जाताना पाहिले.
  • या प्रसंगाचा उल्लेख करताना एकनाथांनी एक अभंग लिहिला, त्याचा भावार्थ : ‘मला दंश करण्यासाठी काळ आला होता, पण येताच कृपाळू झाला. आता चांगली ओळख पटली. त्यामुळे चित्त अच्युतात जाऊन मिळाले. देहात जो संशय होता तो दूर झाला आणि काळापासून कायमची मुक्ती मिळाली. ‘एका’ची श्री जनार्दन स्वामींशी जी भेट झाली, त्यामुळे आवागमनाच्या चक्रातूनच सुट्टी मिळाली.’
  • अनुष्ठान पूर्ण करून त्यांनी मग सर्व परिस्थिती गुरूंना सांगितली. खूप प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वादरूपी पुष्पांचा वर्षाव केला. गुरूंना हे समजण्यास वेळ लागला नाही की आता माझा ‘एका’ निद्वंद्व नारायणात पूर्णतः प्रतिष्ठित झाला आहे.
  • यानंतर एकनाथ ‘संत एकनाथ महाराज’ म्हणून पूजले जाऊ लागले. त्यांनी ‘एकनाथी भागवत’ सारख्या ग्रंथाची रचना करून समाजात परमात्मरसाची गंगा प्रवाहित केली. ते म्हणतात : ‘गुरूच माता, पिता, स्वामी आणि कुळदेवता आहेत. गुरूंशिवाय आणखी दुसऱ्या देवतेचे स्मरण होत नाही.
  • शरीर, मन, वाणी व प्राणाने गुरूंचेच अनन्य ध्यान होणे, हीच गुरुभक्ती आहे. तहान पाण्याला विसरावी, भूक मिष्ठान्नाला विसरावी आणि गुरुचरणांची सेवा करताना झोपही उडून जावी. मुखी सद्गुरूंचे नाम असावे, हृदयात सद्गुरूंचे प्रेम असावे, देहात सद्गुरूंचेच अहर्निश अविश्रांत कर्म असावे.
  • गुरुसेवेत मन असे लागावे की पत्नी, पुत्र व धनाचेही विस्मरण व्हावे, आपल्या मनाचेही विस्मरण व्हावे, हेसुद्धा लक्षात राहू नये की मी कोण आहे ?’ सद्गुरूंचे सामर्थ्य आणि सद्सेवेचे सुख कसे असते, याविषयी एकनाथ महाराज म्हणतात :
  • ‘सद्गुरू जेथे वास्तव्य करतात ती सुखाची सृष्टी असते. ते जेथे बोलतात तेथेच महाबोध (ब्रह्मज्ञान) स्वानंदाने राहतो. अशा सद्गुरूंच्या चरणारविंदाच्या दर्शनाने त्याच क्षणी तहान-भूक पळून जाते. मग कोणतीही कल्पना मनात उठत नाही. आपले वास्तविक सुख गुरुचरणांतच आहे.’
  • गुरुसेवेचा महिमा गाताना ते आपला अनुभव सांगतात : ‘सेवेप्रती असे प्रेम जडले की त्यातून अर्धा तासही वेळ मिळत नसायचा. सेवेत आळस तर अजिबात नसायचाच, कारण या सेवेमुळे विश्रांतीच्या स्थानाने घशाच गुंडाळला. तहान पाण्यालाच विसरली, भूक मिष्ठान्नाला विसरली. जांभई घेण्याचीही फुरसत राहिली नाही. सेवेत मन असे रमून गेले की ‘एका’ जनार्दन स्वामींच्या शरणी लीन झाला.’
  • ➢ ऋषि प्रसाद, मार्च 2007

Eklavya Chi Goshta | Eklavya Moral Story in Marathi

Eklavya Chi Goshta | Eklavya Moral Story in Marathi
  • द्वापर युगातील गोष्ट आहे. एकलव्य नामक भिल्ल जातीचा एक मुलगा होता. एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव-पांडवांचे गुरु श्री द्रोणाचार्यांकडे गेला. परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाहीत. एकलव्याने मनोमन द्रोणाचार्यांना आपले गुरू मानले होते. म्हणून त्यांनी नकार दिल्यावरही त्याच्या मनात गुरूंप्रती तक्रार वा दोषदर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरूप्रती श्रद्धासुद्धा कमी झाली नाही.
  • तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला. तेथे त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली. तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा, मग त्या मूर्तीकडे एकटक पाहत-पाहत ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा. स्वस्तिक अथवा इष्टदेव वा गुरुदेवांच्या श्रीचित्राकडे एकटक पाहिल्याने एकाग्रता वाढते. एकाग्रता आल्याने तसेच गुरुभक्ती, आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली. अशा प्रकारे अभ्यास करीत करीत तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला.
  • एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव-पांडवांना घेऊन जंगलात गेले. त्यांच्यासोबत एक कुत्रासुद्धा होता, तो पळत पळत पुढे निघून गेला. जेथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता तेथे तो पोहोचला. एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला.
  • कुत्र्याला इजाही होऊ नये आणि त्याचे भुंकणेसुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले. जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की “कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही !”
  • अर्जुनाने गुरू द्रोणाचार्यांना विचारले : “गुरुदेव ! तुम्ही तर म्हटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही, परंतु अशी विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही.”
  • द्रोणाचार्यही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धर कोण असेल ? पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्यधनूचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला. द्रोणाचार्यांनी विचारले: “वत्स ! तू ही विद्या कोठून शिकलास ?”
  • एकलव्य : “गुरुदेव ! आपल्या कृपेनेच शिकलो आहे.”
  • द्रोणाचार्यांनी तर अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही. परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला. एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले : “माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा…?”
  • एकलव्य म्हणाला : “गुरुदेव ! आपण जे मागाल.”
  • द्रोणाचार्य म्हणाले : “तुझ्या उजव्या हाताचा अंगठा…”
  • एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला.
  • द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले : “वत्स ! अर्जुन धनुर्विद्येत सर्वांत पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे; परंतु जोपर्यंत सूर्य-चंद्र आणि नक्षत्र राहतील, तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील.”
  • एकलव्याची गुरुभक्ती आणि एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत तर यश मिळवून दिलेच, त्याचबरोबर संतांच्या हृदयातही त्याच्याप्रती आदर प्रगट केला. धन्य आहे एकलव्य ! ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळविले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस, त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला.
    – ‘चला सुसंस्कारी होऊया’ सहित्यातून